Ration Card in Maharashtra : पालघर जिल्ह्यातील १२ हजार रेशनकार्डावरून दुबार नावांची नोंद आढळली असून या नोंदी पुरवठा विभागाने रद्द केल्या आहेत. एक नाव दोन ठिकाणी असून अशी सुमारे १२ हजार व्यक्तींची दुबार नावे आहेत.
पुरवठा विभागाने दुबार नावे वगळण्याची मोहीम हाती घेऊन ही नावे वगळली आहेत. शासनाने दिलेल्या यादीनुसार, जिल्ह्यात बारा हजारांच्या जवळपास रेशनकार्डमधील व्यक्तींची नावे दुबार नोंद आहेत. सर्वेक्षण मोहीम राबवून ही नोंद एकाच ठिकाणी ठेवण्याचे आवाहन केले गेले.
त्यानुसार दुबार नावे पोर्टलवर वगळण्यात आली आहेत. एक घर एक रेशन योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून जिल्ह्यातील रेशनकार्ड छाननी व तपासणी केली जात आहे. त्यामध्ये एकाच व्यक्तीच्या दोन ठिकाणी नोंदी असल्याचे आढळून आले आहे.
ही नावे राज्यमधील व राज्याबाहेरील आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये आठ तालुक्यांत एकूण १८ लाख ९४ हजार २८९ रेशनकार्डधारक आहेत. त्यापैकी राज्यांतर्गत १४१, तर राज्याबाहेरील आशा दुबार नाव नोंदणीचे ११ हजार ९७६ रेशनकार्डधारक निदर्शनास आले.
दुबार नोंदणी पालघर व वसई तालुक्यांत सर्वाधिक असून ती संख्या दहा हजारांच्या पुढे आहे. इतर सहा तालुक्यांमध्ये हा आकडा दोन्ही तालुक्यांच्या तुलनेत कमी आहे. असे असले तरी असे रेशनकार्ड किंवा त्यातील दोन ठिकाणच्या नोंदी कायमच्या रद्द केल्या जाणार आहेत, असे पुरवठा विभागामार्फत सांगण्यात आले आहे.
एक घर एक रेशनकार्ड योजनेअंतर्गत देशात कुठेही एकच रेशनकार्ड चालणार असून त्याचा वापर पीओएस यंत्रणा असलेल्या कोणत्याही रास्त धान्य दुकानात करता येणार आहे. गरीब व गरजू व्यक्तीला अनुदानित अन्न धान्य व खाद्य पदार्थापासून वंचित राहावे लागू नये,
हे उद्दिष्ट एक रेशनकार्ड योजनेचे आहे. सध्या रास्त दुकानांवर पिवळे कार्डधारक दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना दोन रुपये प्रति किलो दराने गहू आणि तीन रुपये प्रति किलो दराने तांदूळ असे दरमहा ३५ किलो धान्य वाटप केले जाते. केशरी कार्डाच्या प्राधान्य गट कुटुंबामधील प्रत्येक व्यक्तीला दरमहा पाच किलो धान्याचे वाटप होते.