Maharashtra News : विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणाऱ्या शाळेंना प्रोत्साहन मिळावे तसेच शाळांची गुणवत्ता वाढावी यासाठी विविध उपक्रम शासन राबवत असते. आता याच पार्श्वभूमीवर शासनाने शाळेंसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा,
सुंदर शाळा अभियान राबविण्यास सुरवात केली आहे. या योजनेत उत्कृष्ट ठरणाऱ्या शाळांना १ लाखापासून ते ५१ लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे.
योजनेविषयी माहिती –
आदर्श शाळा योजनेत राज्यातील ४७८ शाळांचा समावेश असलेला पहिला टप्पा सध्या कार्यान्वित असून त्याच योजनेत आता ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान राबवले जाणार आहे. या अभियानासाठी ४५ दिवसांचा या अवधी आहे.
या योजनेत उत्कृष्ट ठरणाऱ्या शाळांना १ लाखापासून ते ५१ लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि इतर व्यवस्थापनाच्या शाळा अशा दोन गटात हे अभियान असेल.
या अभियानात ज्या शाळा सहभागी होतील त्यांना १ लाखांपासून ते ५१ लाख रुपयांपर्यंत बक्षिसे असतील. त्यात तालुकास्तरावरील स्पर्धेत शासकीय व जिल्हा परिषदेच्या शाळांना प्रथम क्रमांकासाठी ३ लाख, द्वितीयसाठी २ लाख,
तर तृतीयसाठी १ लाख रुपये पारितोषिक असून जिल्हास्तरासाठी प्रथम बक्षीस ११ लाख, द्वितीय ५ लाख, तृतीय ३ लाख, विभागस्तरावर प्रथम २१ लाख, द्वितीय ११ लाख आणि तृतीयसाठी ७ लाख रुपये, तर राज्य पातळीवर प्रथम ५१ लाख, द्वितीय २१ लाख आणि तृतीयसाठी ११ लाख रुपये असे बक्षिसाचे स्वरूप आहे. खासगी व्यवस्थापनाच्या शाळांनाही हीच बक्षीस पद्धती असणार आहे.
का सुरू केले आहे शासनाने हे अभियान?
ही योजना हे अभियान राबवण्यामागे शासनाचे मोठे उद्दिष्ट आहे. यामागे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन, अध्यापन व प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे,
शिक्षणासाठी पर्यावरणपूरक व आनंददायी वातावरणाची निर्मिती करणे, शाळेचे शिक्षक, माजी विद्यार्थी व पालक यांच्यात शाळेविषयी कृतज्ञतेची व उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे असा उद्देश शासनाचा आहे.
कसे होणार मूल्यांकन?
या अभियानामध्ये सहभाग घेणाऱ्या शाळांना वेगवेगळ्या प्रकारात १०० गुण दिले जातील. यासाठी समित्या असतील त्यात केंद्र स्तरावर केंद्र प्रमुखाच्या अध्यक्षतेखाली समिती, तालुका स्तरावर गटविकास अधिकारी,
गटशिक्षणाधिकारी आणि सेवाज्येष्ठ विस्तार अधिकाऱ्यांची समिती, जिल्हास्तरावर सीईओंच्या अध्यक्षतेखाली ‘डायट’चे प्राचार्य, प्राथमिक शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकाऱ्यांची समिती, विभागीय पातळीवर शिक्षण उपसंचालक,
सहायक संचालकांची समिती आणि राज्य पातळीवर शिक्षण आयुक्त्तांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक, सहसंचालकांची समिती असणार आहे. या समित्यांमार्फत मूल्यांकन केले जाणार असून बक्षीस वाटप होईल.