Maharashtra News:स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली. स्वातंत्र्याच्या लढ्यात योगदान दिले. सावरकरांचा त्याग, तपस्या माहीत नाही अशा लोकांनी सावरकरांवर केलेली टीका हि व्यर्थ आहे.
या शब्दात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील वक्तव्याचा समाचार घेतला. तसेच ज्यांनी “स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाशी प्रतारणा ज्यांनी केली, त्यांच्यावरच गोमूत्र शिंपडायला हवे’ असे सांगत शिवसेना उद्धव ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे गुरुवारी जिल्हा दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान माहीत नाही,
सावरकर यांची त्याग, तपस्या माहित नाही अशांनी केलेली टीका व्यर्थ आहे. सावरकर माहीत नाहीत त्यांनी काय टीका करावी, असे दानवे म्हणाले. तसेच स्वर्गीय हिंदुह्र्दय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे सर्वचजण ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळी जातात,
त्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा-शिंदे गट शिवसेनेचे पदाधिकारी देखील स्मृतीस्थळी अभिवादनासाठी गेले होते.
मात्र, त्यानंतर काहीजणांनी या जागेवर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरणाचा प्रयत्न केला. स्वर्गीय ठाकरे यांच्या संपत्तीचे वारस अन विचारांचे वारस वेगळे आहेत. स्वर्गीय शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्वाचा विचार सोडून बाळासाहेबांना शिव्याशाप देणाऱ्यांसोबत जे गेले, त्यांच्यावरच खऱ्या अर्थाने गोमूत्र शिंपडले पाहिजे,अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी केली.