मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष संघटनेतील बहुमत येत्या ८ ऑगस्टपर्यंत कागदोपत्री सिद्ध करा, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. यावरुन ठाकरे गटाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका करताना, ‘वडील आणि पक्ष चोरायला निघाले, तुम्ही मर्द नव्हे तर दरोडेखोर’ असा टोला लगावला आहे. माजी मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
वडील चोरण्याच्या वक्तव्य करत उद्धव यांनी केलेल्या टीकेवरुन शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला असताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे हे बंडखोरांसाठी वडिलांप्रमाणेच असल्याचे म्हटले. “मला या बाबतीत कोणावरही टीका करायची नाही. बाळासाहेब हे आम्हाला कुटुंबप्रमुखाप्रमाणे होते ते आमच्या वडिलांसारखेच होते. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार आम्ही पुढे घेऊन चाललोय. त्या विचारांना आम्ही पुढे नेतोय हे महाराष्ट्रातील जनतेने स्वीकारले आहे. त्यामुळेच आम्हाला राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आणि तालुक्यांमधून येऊन लोक समर्थन देत आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
आम्ही बाळासाहेबांच्या विचारांची जी भूमिका घेतलेली आहे ती राज्याला पुढं घेऊन जाईन, एवढेच मी या प्रसंगी सांगतो बाळासाहेब आमचे कुटुंबप्रमुख होते. शिवसेनेकडे ते कुटुंब म्हणून पाहत होते. म्हणून आम्ही त्यांच्याकडे कुटुंबप्रमुख या नात्याने पाहतोय. बाळासाहेब एक महापुरुष होते. त्यांच्या आशीर्वादामुळेच हे सरकार स्थापन झालेले आहे, असेही शिंदे म्हणाले आहेत.