महाराष्ट्र

पुणेकरांना मिळणार मोठा दिलासा! लवकरच पुणे मेट्रो धावणार ‘या’ स्थानकापर्यंत, महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिली माहिती

राज्यातील मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकल्प सुरू असून मुंबईमध्ये देखील अनेक रस्ते प्रकल्प तसेच सागरी मार्ग व मेट्रो प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आलेले आहेत. त्याच पद्धतीने महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात देखील आता वाहतुकीच्या अनेक पायाभूत अशा आधुनिक सोयी सुविधा उभारल्या जात आहेत.

पुणे हे शहर वेगाने विकसित होणारे शहर असल्यामुळे वाढती लोकसंख्या व त्याचा होणारा विपरीत परिणाम इत्यादी बाबींमुळे या पायाभूत प्रकल्पांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यामध्ये वाहतुकीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर पुणे मेट्रो खूप महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसून येत आहे व आतापर्यंत पुण्यात मेट्रोचे दोन टप्पे सुरू करण्यात आलेले आहेत.अजून देखील काही मेट्रो मार्गीकांचे काम सुरू असून त्यातीलच महत्त्वाचे म्हणजे रुबी हॉल स्थानक ते रामवाडी स्थानक या मेट्रोची शुक्रवारी चाचणी घेण्यात आली होती यशस्वी झाली.

 पुणे मेट्रो आता धावणार रामवाडी स्थानकापर्यंत

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पुणे मेट्रोने रुबी हॉल स्थानक ते रामवाडी स्थानकापर्यंत मेट्रोची चाचणी घेतली व ही चाचणी यशस्वी झाली असून यामुळे आता वनाज येथून ते रामवाडी स्थानकापर्यंत मेट्रो सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या या मार्गावर रुबी हॉल पर्यंत मेट्रो सुरू आहे. त्याच्यानंतर या मार्गावरील जी काही कामे अपूर्ण होती ती पूर्ण केल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी रुबी हॉल स्थानक ते रामवाडी स्थानका दरम्यान मेट्रोची चाचणी घेण्यात आली व एक फेरी पूर्ण केली.

या चाचणीमध्ये ट्रॅक, सिग्नल व्यवस्था तसेच वीज आणि ऑपरेशनसह  पुणे मेट्रोच्या सर्व विभागांनी महत्वाची कामे केली व गेल्या आठवडाभरापासून जे काही प्रयत्न सुरू होते त्या प्रयत्नांना ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर यश मिळाले. ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे आता वनाज ते रामवाडी दरम्यान मेट्रोचे सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 काय म्हणाले महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक?

याबाबतीत बोलताना महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक यांनी म्हटले की रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो स्टेशन पर्यंतची चाचणी यशस्वी झाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत असून हे यश पुणे मेट्रोचे व्यवस्थित आणि सूक्ष्म नियोजन व संबंधित विभागांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे अधोरेखित करते. पुण्यातील नागरिकांना कार्यक्षम आणि आधुनिक वाहतूक पर्याय देण्याचा आमचा निर्धार आहे. पुणे मेट्रोचे रुबी हॉल स्थानक ते रामवाडी स्थानक या मार्गावर आता लवकरच मेट्रो ट्रेन सेवा सुरू होईल असं देखील त्यांनी म्हटले.

 पुणे मेट्रोला मिळत आहे उत्तम प्रतिसाद

पुणेकरांकडून पुणे मेट्रोला उत्तम प्रतिसाद मिळत असून गणेशोत्सवामध्ये पुणेकरांनी पुणे मेट्रोचा भरभरून वापर केला व कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न पुणे मेट्रोला मिळाले. तसेच प्रवासी आकर्षित व्हावेत याकरिता पुणे मेट्रोच्या माध्यमातून अनेक योजना देखील सुरू करण्यात आल्याने पुणेकरांचा खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. यामध्ये आता ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे वनाज स्थानक ते रामवाडी स्थानकापर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे पुणेकरांना आणखीन दिलासा मिळणार आहे.

Ajay Patil

Recent Posts