अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शेवगांव – पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून सलग दुसर्यांदा निवडून आलेल्या आमदार मोनिका राजळे यांनी मागील सरकारच्या काळात मंजूर झालेल्या लेखाशीर्ष 2515 तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पाणीपुरवठा योजना या सारख्या लोकाभिमुख योजनांना सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारने दिलेली स्थगिती उठविण्यासाठी तसेच मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे होण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दिनांक 20 व 21 डिसेंबर रोजी मागणी केली.
यावर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील 137 गावे बाधित झाली. झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी पाथर्डी तालुक्याला 50 कोटी रुपयांच्या मागणीपैकी 19 कोटी तर शेवगाव तालुक्यातील 48 कोटी रुपयांच्या मागणी पैकी 18 कोटी रुपये मिळाले आहेत.
त्यामुळे शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी उर्वरीत रक्कम सरकारने लवकरात लवकर द्यावी. आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, मागील शासनाचे काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच लोकनेत्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून लेखाशीर्ष 2015 अंतर्गत गावांतर्गत रस्ते, स्मशानभूमी, समाजमंदिर आदी कामे झाली.
तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जलयुक्त शिवार योजना या माध्यमातून अनेक कामे झाली तर काही कामांना मंजुरी मिळून निधी मिळाला. जी कामे होणे बाकी आहेत अशा कामांना शासनाने स्थगिती देऊ नये. शेवगाव तालुक्यातील 4 व पाथर्डी तालुक्यातील 5 पाणी योजनांनावरील दिलेली स्थगिती उठवावी अशी मागणी त्यांनी केली.