Maharashtra News : राज्यात पाऊस न पडल्याने १६ जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आली आहे. यामुळे पाणी, तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. या दुष्काळी परिस्थितीत सर्व संकटांना सामोरे जावे लागणार आहे, असे प्रतिपादन सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले.
आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी येथे गणेश चतुर्थी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या किर्तनाने झाली. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी सपत्नीक गणरायाचे दर्शन घेत आरतीचा मान स्वीकारला.
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, पूर्वा वळसे-पाटील, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनिल बाणखेले, माजी पंजायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले,
सरपंच बाळासाहेब मेंगडे, युवासेना जिल्हा समन्वयक सुनील गवारी, गणेश देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भरत मेंगडे, उपाध्यक्ष भास्कर मेंगडे, जिजाभाऊ मेंगडे, भरत फल्ले, तुकाराम भोर, दिलीप रणपिसे, देवस्थानचे विश्वस्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आढळराव-पाटील म्हणाले, शिरूर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येक गावागावात विकासाची कामे करण्यात आली. रात्रंदिवस मी जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मेंगडेवाडी गावाच्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही.
भविष्यात डिंभे धरणाच्या पाण्याचा अवघड प्रश्न उभा रहाणार आहे. बोगदा पाडून डिंभे धरणाचे पाणी माणिकडोह धरणात नेण्याचा प्रयत्न आहे. तो यशस्वी झाल्यास डिंभे धरणातील पाणीसाठा तीन महिन्यांत संपून जाऊ शकतो.
या मुळे नदीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा कसा करायचा, हा प्रश्न निर्माण होणार आहे. या संदर्भात मी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. हा लढा एकट्याचा नसून, सर्वांचा आहे. हे भविष्यातील मोठे संकट थांबवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. – दिलीप वळसे-पाटील, – सहकार मंत्री