महाराष्ट्र

Toll Rule: प्रवास करताना टोल का घेतला जातो? काय आहेत टोलसाठीचे नियम? टोल आणि रोड टॅक्समधील फरक काय? वाचा माहिती

Toll Rule:- आपण जेव्हा राष्ट्रीय महामार्गांवरून किंवा महत्त्वाच्या एखाद्या मार्गावरून प्रवास करत असतो तेव्हा आपल्याला टोल द्यायला लागतो तेव्हाच आपल्याला पुढे जाता येते. सध्या टोल दरवाढ आणि टोल विषयी असलेल्या अनेक  समस्यांच्या बाबतीत राजकीय वातावरण तापले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या विरोधात आवाज उठवण्यात आलेला आहे.

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये या विषयावर चर्चा झाली. 9 ऑक्टोबर रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल प्रश्न संबंधी आक्रमक भूमिका घेतली होती व हा एक महाराष्ट्रातील मोठा घोटाळा आहे असे देखील म्हटले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर टोल टॅक्स का लावला जातो? काय असतात टोलसंबंधीचे नियम? टोल मधून कुणाला सुट मिळते? इत्यादी संबंधी महत्त्वाची माहिती या लेखात घेणार आहोत.

 रोड टॅक्स आणि टोल टॅक्स यामधील

फरक काय?

रोड टॅक्स आणि टोल टॅक्स या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. त्यामधील जर रोड टॅक्सचा विचार केला तर जेव्हा आपण एखादी नवीन गाडी किंवा वाहन विकत घेतो त्यावेळेस तुम्हाला त्यावर जीएसटी आकारला जातो व तो तुम्हाला भरावा लागतो. यासोबत तुम्हाला काही अतिरिक्त टॅक्स देखील देणे गरजेचे असते. त्यामध्ये वाहनांचे जेव्हा आपण आरटीओकडे रजिस्ट्रेशन करतो तेव्हा रोड टॅक्स हा वसूल केला जातो व तो राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये जातो.

आपल्या भारतामध्ये सगळ्यात वाहनांवर रोड टॅक्स आकारला जातो. दुचाकी असो किंवा चार चाकी तसेच कमर्शियल व खाजगी वाहने इत्यादींवर राज्य सरकार टॅक्स लावत असते. रोड टॅक्स किती घेतला जाईल हे त्या गाडीची किंमत किती आहे व तिचा प्रकार कोणता आहे यावर सगळं अवलंबून असतं. रोड टॅक्सच्या बाबतीत लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे तुम्हाला हा फक्त एकदा भरावा लागतो. पुन्हा पुन्हा भरण्याची गरज नसते.

जेव्हा तुम्ही वाहन खरेदी करतात तेव्हाच तुम्हाला रोड टॅक्स हा भरावा लागतो. अगदी साध्या पद्धतीने या दोघांमधील फरक समजून घेतला तर जेव्हा आपण गाडी विकत घेतो तेव्हा राज्य सरकारकडून जो टॅक्स आकारला जातो तो रोड टॅक्स असतो. ही विकत घेतलेली गाडी जेव्हा तुम्ही रस्त्यावर चालवता व त्याच्यावर जेव्हा टॅक्स घेतला जातो तेव्हा तो टोल टॅक्स असतो. टोल टॅक्स हा काही ठराविक रस्ते आणि महामार्गांवर लावला जातो व तो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून गोळा केला जातो.

 टोलबाबतचे हे आहेत महत्त्वाचे नियम

1- जर आपण टोलबाबतचे किंवा टोल नाक्यावर असलेल्या नियमांचा विचार केला तर कुठल्याही वाहनाला टोल नाक्यावर दहा सेकंदापेक्षा जास्त वेळ प्रतीक्षा करायला लागू नये असा एक महत्त्वाचा नियम आहे. समजा यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा टोल न देता त्या ठिकाणाहून जाऊ शकता.

2- दुसरे महत्त्वाचे म्हणजे टोल नाक्यावर 100 मीटर पेक्षा जास्त लांब गाड्यांची रांग लागायला नको. जर तुम्ही एखाद्या वेळेस 100 मीटर पेक्षा जास्त  रांगेत प्रतीक्षा करत असाल तर तुम्ही टोल न देता देखील जाऊ शकतात.

3- टोलबूथ पासून 100 मीटरच्या अंतरावर यलो स्ट्रीप अर्थात पिवळी पट्टी असणे गरजेचे आहे.

4- जर टोल वर गर्दी असेल तर एका रांगेमध्ये प्रत्येक लेनला वाहनांची संख्या सहा पेक्षा जास्त नसावी.

5- तसेच दोन टोलनाक्यांमध्ये 60 किलोमीटरचे अंतर असणे गरजेचे आहे. परंतु या बाबतीत जर आपण नवीन नियमानुसार विचार केला तर आत्ता 60 किलोमीटरच्या मध्ये किंवा परिघात एकच टोलनाका सुरू असणार आहे.

 या व्यक्तींना टोल टॅक्समधून दिली जाते सूट

टोल टॅक्स मधून काही व्यक्तींना सूट दिली जाते. यामध्ये देशाचे राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपती, पंतप्रधान, खासदार तसेच संरक्षण दलातील  व्यक्ती, पोलीस, अग्निशमन दल तसेच ॲम्बुलन्स, विविध विभागांचे सचिव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी इत्यादींना टोल टॅक्स मध्ये सूट देण्यात आली आहे.

 टोल टॅक्स का घेतला जातो?

रस्ते बांधणी झालेल्या खर्चाची भरपाई करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून टोल टॅक्स घेतला जातो. हा टोल टॅक्स चार चाकी किंवा कार, बसेस किंवा ट्रक अशा मोठ्या वाहनांकडून वसूल केला जातो व जमा झालेला टोल टॅक्स रस्त्यांचे बांधकाम व देखभालीसाठी वापरला जातो. राष्ट्रीय महामार्ग किंवा बोगदे, एक्सप्रेसवे आणि इतर मार्गांचा वापर जेव्हा व्यक्ती त्यांच्या वाहनांच्या माध्यमातून करतात तेव्हा त्यांच्याकडून सरकार टोलकर वसूल करत असते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts