Monsoon Tourism : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात निसर्गाने मुक्त हस्ते केलेली सौंदर्याची उधळण पाहावयास मिळते. येथे कसारा घाट, घाटघर, आजा पर्वत, किल्ले माहुली जांभे धरण,
अशोका धबधबा तसेच भातसा, तानसा, मोडक सागर ही धरणे असा डोळ्यांचे पारणे फेडणारा निसर्गरम्य परिसर आढळतो. यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, गुजरातकडील पर्यटकांची पावले वळतात ती शहापूरकडे.
यातच आता भर पडली आहे ती तानसा अभयारण्यातील टॅगो धबधब्याची. हा धबधबा पर्यटकांना खुणावतो आहे. या ठिकाणी ३० ते ३५ फुटांवरून कोसळणारा फेसाळलेला धबधबा तसेच या ठिकाणी निसर्गनिर्मित तयार झालेला दगडी स्विमिंग पूल, विशेष म्हणजे गर्द झाडी आणि अंगावर उडणारे पाण्याचे तुषार, अगदी मन मोहून टाकतात.
तानसा अभयारण्यात मोडकसागर ते तानसा असा जो रस्ता जातो, त्या ठिकाणी बेलवड गावाच्या पुढे घनदाट झाडीमध्ये हा धबधबा जणू काही लपलेला आहे. या रस्त्याने जाताना या धबधब्याच्या आवाजानेच वाहन चालकांचा गाडीला ब्रेक लागतो व हा धबधबा पाहण्याचा मोह त्यांना आवरता येत नाही.
अभयारण्य असल्यामुळे पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज कानी येतात. कधीही न पाहिलेले पक्षी नजरेस पडतात तसेच मोडकसागर व तानसा ही दोन धरणे देखील पर्यटकांना पाहण्याची संधी मिळते. तानसा धरणाच्या बॅक वॉटरला मासेमारी करणाऱ्या आदिवासींच्या तराफ्यावरून धरणात फेरफटका मारण्याचा आनंद घेता येतो.
कसे पोहोचाल
■ आपण जर मध्य रेल्वेने किंवा मुंबई- आग्रा महामार्गाने प्रवास करत असाल तर खर्डी किंवा आठगाव स्थानकावर उतरावे. आठगाव येथून प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपने आठगाव ते अघई असा प्रवास करून रस्त्यात तानसा धरण व या धरणाचे बॅक वॉटर पाहता येते. या ठिकाणावरून पुन्हा अघई ते बैलनाला प्रवास केल्यावर या ठिकाणी पोहोचता येते.
■ आठगाव ते टैंगो धबधबा हे अंतर २८ किमी आहे. तसेच खर्डीवरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपने टेंभा येथे जावे लागते व या ठिकाणी असलेल्या मोडकसागर धरणाला भेट देऊन पुन्हा टेंभा, बेलवड, मार्गे टँगो धबधब्यावर पोहोचता येते. खर्डी ते टैंगो धबधबा अंतर २० किलोमीटर आहे तसेच पालघर मार्गे येणाऱ्या पर्यटकांना वाडा मार्गे सोनाळे, कलंभे, बेलवड असा प्रवास करून पोहोचता येते.
■ वाडा ते टैंगो धबधबा अंतर हे २४ किलोमीटर आहे. हे ठिकाण जंगलात असल्यामुळे खाण्या-पिण्याची व्यवस्था या ठिकाणी नाही, म्हणून पर्यटकांनी दिवसभराचे खाद्यपदार्थ आपल्या सोबत घेऊन जावे.