Atal Setu Traffic : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण करण्यात आलेल्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा सागरी सेतू मार्गावरून पहिल्याच दिवशी ९ हजारहून अधिक वाहनांनी प्रवास केला.
मात्र अनेकांनी सेतूवरील प्रवासाचे नियम धाब्यावर बसवत गाडीतून उतरून सेल्फी काढण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. या सर्व गोंधळामुळे सेतूवर आणि सेतूच्या दोन्ही टोकांना वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.
अटल सेतू शनिवारी सकाळी ८ वाजता सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. सेतूवरून प्रवास करण्यासाठी या वेळेस सकाळपासून वाहनांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली होती.
शनिवार असल्याने अनेक जण कुटुंबासह वाहनांमधून प्रवास करीत असल्याचे दिसून आले. शनिवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत ९ हजारांहून अधिक वाहनांनी प्रवास केल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. पहिल्या दिवशी किती टोल जमा केला, याबाबतची माहिती नसल्याचेही प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
सुमारे १७ हजार ८०० कोटी रुपयांचा प्रकल्प असणाऱ्या अटल सेतूवर प्रवास करणे किंवा देशातील सर्वात लांब सेतूवरून प्रवास केल्याचा आब मिरवण्यासाठी अनेक प्रवाशांनी आपली वाहने सेतूवर थांबवल्याचे दिसून आले.
मात्र सागरी सेतूवर वाहन थांबवणे किंवा सेल्फी घेणे प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते यामुळेच वाहतूक पोलिसांनी तसेच सुरक्षा रक्षकांनीही प्रवाशांना अटकाव केल्याचे चित्र दिसून आले. वाहतूक कोंडी झाल्यामुळे चिलें किंवा शिवडी या दोन्ही टोकांना वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.