Maharashtra News : अयोध्या येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या २ अमृत भारत एक्स्प्रेस आणि ६ वंदे भारत ट्रेनना हिरवा झेंडा दाखवला. याचवेळी जालना येथेदेखील रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते जालना येथून मुंबईसाठी धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
या ट्रेनमुळे मराठवाड्यातून मुंबईपर्यंतचा प्रवास सुखकर आणी वेगवान होणार असल्याने जालनावासीयांमध्ये आनंदोत्सव पाहायला मिळाला. सध्या जालना येथून मुंबईला जाण्यासाठी सीएसएमटी-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस ही वेगवान गाडी आहे.
मात्र नव्या वर्षात या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सर्वांत वेगवान गाडी ठरणार आहे. मुंबई-जालना हे अंतर वंदे भारत ५ तास २० मिनिटांत पार करणार आहे. जनशताब्दीला हे अंतर पार करण्यासाठी ७ तास ४५ मिनिटे लागतात.
जालना-मुंबई वंदे भारत विशेष ट्रेनला एकूण ८ डबे देण्यात आले आहेत. दरम्यान, या ट्रेनसाठी तिकिटाचे दर ९०० ते १००० च्या आसपास असण्याची शक्यता आहे. लवकरच रेल्वेकडून याबाबत माहिती दिली जाणार असून १ जानेवारीपासून ही रेल्वे प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.