जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

अहमदनगर :- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम करताना बीएड अथवा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या शिक्षकांना प्राथमिक शिक्षण विभागाने नोटिसा पाठवल्या आहेत. नोटीस पाठवलेल्या १३३ जणांवर कारवाईची टांगती तलवार असून, या शिक्षकांकडून पुराव्यासह लेखी खुलासा प्रशासनाच्या वतीने मागवण्यात आला आहे.

पदोन्नती, वेतनश्रेणीत वाढ होण्यासाठी शिक्षकांना बीएड, पदवीची आवश्यकता असते. अनेकदा शिक्षक त्यासाठी मुक्त विद्यापीठ अथवा महाविद्यालयात नियमित अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. नियमित प्रवेश घेतला असल्यास संबंधित शिक्षकाने शाळेवर रजा टाकणे आवश्यक आहे. शाळेवर रजा न टाकता अनेक शिक्षकांनी नियमित अभ्यासक्रम पूर्ण केल्याबाबत तक्रारी झाल्या होत्या.

गेल्या काही वर्षांपासून अशा शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. मध्यंतरी झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत अशा शिक्षकांवर कारवाई करण्याचा ठरावही घेण्यात आला होता. बहि:स्थ अभ्यासक्रमाला प्रवेश असल्यास शिक्षकांना काही अडचण येत नाही. मात्र, नियमित अभ्यासक्रमाद्वारे शिक्षण घेऊन शाळेवरही कामावर असल्याचे काही शिक्षकांनी दाखवले आहे.

शिक्षण विभागाने संबंधित महाविद्यालयांना माहिती विचारल्यावर नियमित अभ्यासक्रम असल्यास संबंधितांची किमान ७० ते ८० टक्के हजेरी आवश्यक असल्याची माहिती मिळाली. या १३३ शिक्षकांपैकी १२५ शिक्षकांनी रीतसर रजा घेतली आहे.

परंतु त्यांची संबंधित विद्यालयातील हजेरी ७० ते ८० टक्क्यांच्या दरम्यान आहे का? याची पडताळणी करण्यात येणार आहे. तसेच बीएड अभ्यासक्रमाला नियमितपणे प्रवेश घेऊनही ३ शिक्षकांनी रजा घेतलेली नाही, तर ५ शिक्षकांच्या रजा अनियमित आहेत. रजा घेऊनही काही शिक्षक महाविद्यालयात शिक्षणासाठी गेलेच नसल्याचा प्रशासनाला संशय आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts