अहमदनगर Live24 टीम, 05 मे 2022 Maharashtra Politics :- राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या
या जागेवर चव्हाण यांची नियुक्ती केल्याची घोषणा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष खासदार फौजिया खान यांनी केली.
मनसेमधून अलीकडेच राष्ट्रवादीत आलेल्या आणि आल्यापासून पक्षाच्यावतीने भाजप तसेच मनसेवरही जोरदार टीका करणाऱ्या रुपाली पाटील ठोंबरे यांना हे पद दिले जाईल, असा काहींचा अंदाज होता, तो चुकीचा ठरला.
प्रदेशाध्यक्षपदी चव्हाण यांची नियुक्ती झाल्यानंतर सध्या राज्यातील जिल्हा कमिट्या तशाच राहणार आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभागीय अध्यक्षपद देण्याचा निर्णय पहिल्यांदाच झाल्याचे खान यांनी सांगितले.
त्यानुसार नागपूर विभाग अध्यक्षा शाहीन हकीम (गडचिरोली), अमरावती विभाग अध्यक्षा वर्षा निकम (यवतमाळ), मराठवाडा विभाग अध्यक्षा शाजिया शैख (जालना), वैशाली मोटे (उस्मानाबाद), पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता म्हेत्रे (सातारा), वैशाली नागवडे (पुणे), कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे (सिंधुदुर्ग), ठाणे विभाग अध्यक्षा ऋता आव्हाड (ठाणे), उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता परदेशी अशा नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या आहेत.