Village Tourism:- महाराष्ट्राला निसर्गाने खूप भरभरून दिले असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अनेक ठिकाणे आहेत. महाराष्ट्रामध्ये पसरलेल्या डोंगर रांगा, त्यामधून वाहणाऱ्या नद्या आणि धबधबे, हिवाळ्याच्या कालावधीत धुक्याची चादर पांघरून हिरवाईने नटलेली पर्वत शिखरे अशी अनेक पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून ठिकाणे महाराष्ट्रात आहेत.
तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यातील गावांना देखील पर्यटनाचा वारसा लाभलेला आहे. अनेक जिल्ह्यांमधील बरीच खेडी ही डोंगर रंगांच्या पायथ्याशी असून निसर्ग सौंदर्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणाचे दृश्य किंवा परिसर हा खूप समृद्ध आहे. फक्त अशा ठिकाणांचा विकास होणे गरजेचे असून पर्यटन स्थळ विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून जर सरकारने अशा ठिकाणांचा विकास केला तर नक्कीच पर्यटन वाढून गावांच्या तसेच पर्यायाने राज्याच्या तिजोरीत भर पडेल हे मात्र नक्की.
याच दृष्टिकोनातून आता राज्याच्या माहिती पर्यटन संचालनालयाकडून नासिक जिल्हासह संपूर्ण नाशिक विभागांमध्ये सर्वात्कृष्ट पर्यटन गाव ही स्पर्धा राबविण्यात येत आहे. याचेच माहिती या लेखात आपण बघणार आहोत.
काय आहे नेमकी सर्वात्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्यातील नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण नाशिक विभागामध्ये पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातून सर्वात्कृष्ट पर्यटन गाव ही स्पर्धा राबविण्यात येत असून या अंतर्गत नासिक विभागामध्ये जे पाच जिल्हे येतात त्यामधून विविध आठ श्रेणीमध्ये प्रत्येकी पाच अर्ज याकरिता मागविण्यात आलेले आहेत.
यामध्ये जवळच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळाच्या गावातील ग्रामपंचायती किंवा त्या गावच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या अशासकीय सामाजिक संस्थेकडून अर्ज करून ऑनलाईन नोंदणी करता येणार असल्याची माहिती देखील पर्यटन संचालनालयाकडून देण्यात आली आहे.
जर आपण ग्रामीण भागाचा विचार केला तर त्या ठिकाणी अनेक गावे सध्या पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला येऊ लागली आहेत. अशा गावांच्या ठिकाणी असलेले निसर्गरम्य वातावरण, त्या ठिकाणी असलेले धबधबे इत्यादींमुळे पर्यटक अशा गावांकडे आकर्षित झाल्याचे आपल्याला दिसून येते.
याच मुद्द्याला धरून गावागावांमध्ये पर्यटन वाढावे व पर्यटनाला चालना मिळावी, त्या ठिकाणाची पर्यटन स्थळे तसेच कला संस्कृती, परंपरा, असलेली वारसा स्थळे, त्या ठिकाणाची लोकसंस्कृती इत्यादीची माहिती सगळीकडे पोहोचावी याकरिता केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून बेस्ट टुरिझम व्हिलेज आणि बेस्ट होम स्टे स्पर्धा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धांच्या माध्यमातून राज्य,
राष्ट्रीय आणि जिल्हास्तरावर सर्वात्कृष्ट पर्यटन गावांची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून तीन गावे वारसा, कृषी, हस्तकला, जबाबदार पर्यटन, पर्यटन, सहासी पर्यटन, वेलनेस आणि व्हायब्रेट अशा आठ प्रकारच्या श्रेणींमधून गावांची निवड करण्यात येणार आहे. याकरिता नामांकने दाखल करण्याचे आवाहन नाशिकच्या पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई राठोड यांनी केले आहे.
निवड झालेल्या गावांना होईल फायदा
या स्पर्धेमध्ये सर्वात्कृष्ट गाव म्हणून निवड झालेल्या गावाला पर्यटन मंत्रालयाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे व एवढेच नाही तर ज्या गावाला पुरस्कार मिळेल ते गाव भारत सरकारच्या विविध पोर्टल्स व संकेतस्थळावर देखील झडकताना आपल्याला दिसेल.
या माध्यमातून तुमच्या गावाला भारताच्या नकाशावर पर्यटनाकरिता उत्कृष्ट म्हणून पुढे आणण्याची ही एक संधी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तुम्हाला देखील या स्पर्धेमध्ये तुमच्या गावाची नोंदणी करायची असेल तर डिसेंबर अखेरपर्यंत तुम्ही ती करू शकतात.
काय आहे बेस्ट रुरल होम स्टे स्पर्धेचे स्वरूप?
गावाच्या पातळीवर पर्यटन करणाऱ्या पर्यटकांना त्या गावातील स्थानिक रुचकर जेवणासह राहण्याची व्यवस्था व्हावी जेणेकरून त्या ठिकाणी पर्यटकांना मुक्कामी थांबता येईल व ग्रामीण भागामध्ये स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील याकरिता बेस्ट रुरल होम स्टे स्पर्धा घेण्यात येणार आहे.
याकरिता ज्या ठिकाणी कमीत कमी एक वर्षापासून निवास व्यवस्था कार्यरत आहे त्या निवास व्यवस्थेचे संचालक एकूण 14 पैकी जास्तीत जास्त तीन श्रेणीमध्ये यासाठी अर्ज करून स्पर्धेत सहभाग नोंदवू शकतात असे देखील पर्यटन संचालनालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आलेले आहे.