Pune Ring Road : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांमध्ये विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत. विविध महामार्गांची प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळाने पूर्ण केली आहे.
यातील सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांबीचा आहे. याचे आतापर्यंत 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे आणि हा 525 किलोमीटर लांबीचा टप्पा अर्थातच नागपूर ते इगतपुरीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू आहे.
उर्वरित काम म्हणजेच इगतपुरी ते आमने हा टप्पा जुलै 2024 अखेर पूर्ण होईल आणि तो देखील मार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे. याशिवाय राज्य रस्ते विकास महामंडळाने अनेक प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. यामध्ये समृद्धी महामार्गाचा विस्तार करणे देखील प्रस्तावित आहे.
समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्यासाठी नांदेड ते जालना द्रुतगती महामार्ग तयार केला जाणार आहे. तसेच पुणे रिंग रोड आणि विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गीका प्रकल्प देखील प्रस्तावित करण्यात आला आहे.
दरम्यान, या तिन्ही प्रकल्पासंदर्भात नुकतीच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पुणे अन पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे रिंग रोड हा प्रकल्प हाती घेतला आहे. पुणे रिंग रोड अंतर्गत १७२ किलोमीटर लांबीचा मार्ग तयार होणार आहे. हा मार्ग पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी अतिशय महत्त्वाचा असा प्रकल्प आहे.
याचे दोन टप्प्यात विभाजन करण्यात आले आहे. पूर्व रिंग रोड आणि पश्चिम रिंग रोड असे याचे विभाजन केले आहे. त्यानुसार सध्या स्थितीला भूसंपादनाचे काम सुरु आहे. दुसरीकडे विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पांतर्गत 128 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार होणार आहे.
याशिवाय समृद्धी महामार्गाचा विस्तार करत जालना ते नांदेड दरम्यान द्रुतगती महामार्ग तयार होणार आहे. याची लांबी 190 किलोमीटर एवढी राहणार आहे. दरम्यान, हे तिन्ही प्रकल्प मार्गी लावण्यासाठी वर्षभरापूर्वी राज्य रस्ते विकास महामंडळाने एकत्रितरित्या 26 टप्प्यात स्वारस्य निविदा मागवल्या होत्या.
पुणे रिंग रोड साठी 9 टप्प्यात, मुंबई-जालना महामार्गासाठी सहा टप्प्यात आणि विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गीकासाठी 11 टप्प्यात निविदा मागवल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार या निविदा प्रक्रियेला 26 कंपन्यांनी प्रतिसाद दाखवला आणि यामधून 18 कंपन्या पात्र ठरवल्या गेल्या आहेत.
दरम्यान आता या निविदा 5 एप्रिलला खुल्या होतील अशी शक्यता आहे. त्यामुळे या तिन्ही प्रकल्पांचे काम आता आचारसंहिता झाल्यानंतरच सुरू होणार असे चित्र तयार होत आहे.