Maharashtra News : वन्यप्राण्यांकडून शेतपिकांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई शासन देते, ही समाधानाची गोष्ट आहे. सामान्य शेतकरी मात्र या भरपाईला पोरकाच ठरत असल्याचे चित्र आहे. कारण भरपाई मागणी अर्जासोबत शेत नकाशा जोडण्याच्या सक्तीने बहुतेक शेतकरी हैराण दिसतात. कारण अनेकांकडे हा नकाशा नाही. त्यामुळे भरपाईसाठी शेतकरी अर्ज करत नसल्याचे वास्तव दिसते.
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, राधानगरी, आजरा, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, करवीर, गडहिंग्लज या तालुका परिसरात वन क्षेत्र आहे. या वन क्षेत्रामध्ये बिबटे, गवे, काळवीट, डुक्कर, ससे यासह मोर अशा अनेक वन्यजीवांचा अधिवास आहे. वन क्षेत्राला लागूनच शेतकरी शेती करतो.
वन्यजीवांनी केलेल्या नुकसानीची भरपाई शासनाकडून केली जाते. ही योजना किमान शेतकऱ्याला आधार देणारी आहे; पण या योजनेतील नकाशा जोडण्याच्या अटीने मात्र बळीराजा या भरपाईपासून वंचित होत असल्याचे वास्तव आहे.
कारण बहुतांशी शेतकऱ्यांकडे असा नकाशा नाही. बहुतेक शेतीचा गट एक आणि शंभर शेतकरी असाच सर्रास प्रकार दिसतो. दुर्गम खेड्यात राहणारा शेतकरी तालुक्यात येऊन नकाशा काढण्याच्या फंदात पडताना दिसत नाही. कारण भरपाई टिचभर आणि नकाशा काढण्याचा खर्च जास्त अशी बिचाऱ्याची अवस्था होते.
त्यामुळे अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहात आहेत. स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, रीतसर अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून झालेला पंचनामा गृहीत धरून भरपाई द्यावी, वन विभागाने ही नकाशाची अट शिथिल करावी, अशी मागणी बळीराजाकडून केली जात आहे.
वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानीचा रीतसर पंचनामा केला जातो. महसूल आणि वन विभागातील अधिकाऱ्यांसह स्थानिक यंत्रणा यावेळी उपस्थित असते. त्यामुळे या पंचनाम्याचा आधार घेऊनच भरपाई दिली गेली पाहिजे. भरपाई शेतकऱ्यांना देणार असाल तर थेट द्या, कसलीही अडवणूक करू नका अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होते आहे.