महाराष्ट्र

राज्यात मास्क मुक्त होणार का? कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :- राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्य मास्कमुक्त करण्यासंदर्भात चर्चा झाली. त्यामुळे राज्य लवकरच मास्कमुक्त होणार असल्याचं बोललं जाऊ लागलं.

यावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. यासंदर्भात नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी मास्कविषयीचा मुद्दा स्पष्ट केला आहे .

मास्कसक्तीपासून मुक्ती मिळेल हा गैरसमज असल्याचं यावेळी आदित्य ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं. “आपण हा गैरसमज काढून टाकला पाहिजे की मास्कची सक्ती हटवण्यात येईल.

आत्तापर्यंत आपण जे काही निर्णय घेतलेत ते सगळे डॉक्टर्स, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घेतले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं अजूनही ही करोनाची साथ संपलीये असं कुठेही जाहीर केलेलं नाही.

ओमायक्रॉनचा कोणताही व्हेरिएंट हा सौम्य किंवा गंभीर आहे असंही सांगितलेलं नाही. व्हेरिएंट हा व्हेरिएंट असतो. आपल्याला स्वत:ला वाचवायचं असेल तर आतापर्यंतचं सर्वात चांगलं शस्त्र हे मास्क आहे.

27 जानेवारी रोजी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मास्क संदर्भात चर्चा झाली. युरोप, इंग्लंड आणि फ्रान्ससह अनेक देशांनी मास्क न वापरण्यासंदर्भात भूमिका घेतलेली असताना आपणही भूमिका घेणार का?

अशी चर्चा मंत्रिमंडळात झाली. राज्यात मास्क वापरणे आता गरजेचे नसणार अशी चर्चा यावेळी झाली. मास्क संदर्भात लवकरच टास्क फोर्सशी चर्चा करणार आहे. टास्क फोर्सच्या निर्णयानंतर मास्क बाबतीत धोरण होणार आहे.

पण आता मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राज्यातील मास्कची सक्ती हटवली जाणार की नाही? हे येत्या काळातच स्पष्ट होईल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts