Railway News : मुंबईत मोठ्या प्रमाणात येणाऱ्या-जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्या, प्रवाशांची वाढती गर्दी आणि लोकलच्या वेळापत्रकावर होणारा परिणाम टाळण्यासाठी मध्य रेल्वेद्वारे पनवेल येथे टर्मिनस आणि कळंबोलीत देखभाल-दुरुस्ती केंद्र उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
यामुळे प्रवाशांना पनवेल स्थानकात गर्दीचा सामना करावा लागणार नसून सध्याच्या इतर टर्मिनसवरील भार हलका होणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले. पनवेल येथे टर्मिनसबरोबर कळंबोली येथे मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी केंद्र उभारण्यात येत आहे.
२०१६-१७ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळताच टर्मिनसचे काम सुरू झाले. कोरोनाच्या प्रादुर्भाव काळात या कामाला कासवगती मिळाली. मात्र नंतर या गुंतागुंतीच्या प्रकल्पाला वेग आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे प्रकल्पांना अधिक सक्षम करण्यासाठी गतिशक्ती युनिट उभारण्याच्या सूचना केल्या.
त्यानुसार हा प्रकल्पदेखील या विशेष युनिटच्या देखरेखीखाली पूर्णत्वास जात आहे. सद्यस्थितीत प्रकल्पाचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून, सरासरी १५४ कोटी खर्च प्रकल्पासाठी होणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मेल-एक्स्प्रेस गाड्यांनी प्रवेश केल्यानंतर सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस,
दादर येथे थांबा आहे. तसेच येथून गाड्याही सोडण्यात येतात. गेल्या काही वर्षांत या तिन्ही स्थानकांत लांब पल्ल्याच्या गाड्यांचा भार वाढला आहे. दिवसाला २०० हून अधिक मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांची ये-जा सुरू असते. परिणामी मेल-एक्स्प्रेसला प्राधान्य द्यायचे की लोकलना, असा प्रश्न निर्माण होतो. परिणामी वेळापत्रक विस्कळीत होते. त्यामुळे मध्य रेल्वेने पनवेल येथे टर्मिनस उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
कळंबोली येथे देखभाल कोचिंग केंद्र
आतापर्यंत देखभालीसाठी दक्षिण मुंबईतील वाडीबंदर किंवा माझगाव यार्डपर्यंत मेल- एक्स्प्रेसना जावे लागायचे. मात्र कळंबोली येथे देखभाल कोचिंग केंद्र उभारण्यात येत असल्याने वाडीबंदर येथे जाण्याची गरज भासणार नसल्याचे मध्य रेल्वेने सांगितले. कळंबोली कोचिंग केंद्र ते पनवेल ये-जा करण्यासाठी स्वतंत्र ५ किमीचा मार्ग उभारण्यात येत आहे. ज्यामुळे रिकाम्या मेल-एक्स्प्रेस देखभालीसाठी इतर गाड्यांना विस्कळीत न करता या मार्गावरून स्वतंत्र वाहतूक करणार आहेत.
प्रवाशांना असा होणार लाभ
<< पनवेल स्थानकातील गर्दी कमी होणार
<< पनवेल येथूनही मोठ्या प्रमाणात मेल, एक्स्प्रेस गाड्या सुटणार
<< २४ आणि २६ डब्यांच्या गाड्यांसाठी दोन नवीन फलाट होणार 44 पादचारी पूल, अन्य सुविधा नव्या टर्मिनस ठिकाणी सुरू होणार
पूर्ण झालेली कामे
■ या मार्गावरील सिग्नलिंग कामे पूर्ण
■ नव्या इमारतीची उभारणी पूर्ण
■ कळंबोली- पनवेलमधील ट्रैक फाऊंडेशन आणि छोटे पूल पूर्ण
■ नव्या २ मार्गिका स्टेबलिंग काम सुरू