आर्थिक

Agri Business Idea: ड्रोनने फवारणी करण्याचा व्यवसाय करा आणि लाखात कमवा! वाचा या व्यवसायाची माहिती

Agri Business Idea:- शेती निसर्गावर अवलंबून असल्याने नक्कीच नैसर्गिक परिस्थितीचा चांगला किंवा वाईट परिणाम हा शेती उत्पादनावर होत असतो. गेल्या काही वर्षाचा विचार केला तर सातत्याने अवकाळी पाऊस, वादळी वारे तसेच गारपीट इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे  शेती व्यवसाय आर्थिकदृष्ट्या खूप नुकसानीचा ठरत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी आता शेतीसंबंधी इतर व्यवसायांमध्ये उतरणे खूप गरजेचे आहे. जर आपण उदाहरण घ्यायचे म्हटले तर शेती संबंधित आपण शेती प्रक्रिया उद्योगांचा यामध्ये विचार करू शकतो. तसेच शेतीच्या आवश्यक इतर कामांशी संबंधित अनेक व्यवसाय यांच्या माध्यमातून आपण चांगला पैसा मिळवू शकतो.

यामध्ये जर आपण पिकांवर करण्यात येत असलेल्या फवारणीचा विचार केला तर पिकांवर येणाऱ्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांना विविध कीटकनाशकांची फवारणी करणे गरजेचे असते. यामध्ये आता फवारणीसाठी ड्रोन सारख्या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला असून येणारा काळ हा फवारणीसाठी ड्रोनच्या वापरासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे.

कमीत कमी वेळेत व कमी खर्चात जास्तीत जास्त क्षेत्राची फवारणी ड्रोनच्या माध्यमातून शक्य होते. त्यामुळे ड्रोनच्या माध्यमातून फवारणी हा शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचा एक स्त्रोत होऊ शकतो. नेमकं ड्रोन फवारणी हा व्यवसाय कशा पद्धतीने करता येईल? याबद्दलची काही माहिती आपण या लेखात घेऊ.

 ड्रोनद्वारे फवारणी व्यवसायाचे स्वरूप

सध्या जर आपण ड्रोनचा विचार केला तर त्याच्या किमती या जास्त असल्यामुळे एका शेतकऱ्याला ड्रोन खरेदी करणे जवळपास अशक्य आहे किंवा परवडणारे नाही. कारण ड्रोन तंत्रज्ञान नवीनच आल्यामुळे ते एक नवखे तंत्रज्ञान आहे व त्यामुळे त्याच्या किमती देखील जास्त आहे.

उदाहरणच घ्यायचे झाले तर दहा लिटर क्षमतेचे जर ड्रोन तुम्हाला घ्यायचे असेल तर त्याची किंमत आज सात ते दहा लाख रुपयांच्या दरम्यान आहे. परंतु बाजारात अशा अनेक कंपन्या उपलब्ध आहेत ज्या शेती करिता ड्रोन पुरवठा करतात.

म्हणजेच पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी किंवा पिकांवर कुठल्या रोगाचा प्रादुर्भाव आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही या कंपन्यांच्या माध्यमातून एका फोनवर त्यांची सेवा मिळवू शकतात. या कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून फवारणी व इतर कामांसाठी एकर नुसार काही रक्कम आकारली जाते.

 या व्यवसायातून किती पैसा मिळू शकतो?

या कंपन्यांसारखाच तुम्ही देखील ड्रोन खरेदी करून त्याचा वापर स्वतःच्या शेतीत करू शकतातच परंतु इतर शेतकऱ्यांना देऊन देखील त्या माध्यमातून पैसा मिळवू शकतात. जर आपण ड्रोन कंपन्यांचा विचार केला तर शेतकऱ्यांकडून पाचशे रुपये प्रति एकर फवारणीसाठी शुल्क आकारतात.

त्यामध्ये तुम्ही जर ड्रोन चालवण्याचे ट्रेनिंग घेतले व त्या माध्यमातून जर तुमच्या गावात शेतकऱ्यांकडून एकरी मोबदला घेऊन कीटकनाशक फवारणी ड्रोनच्या माध्यमातून सुरू केली तर हा चांगला व्यवसाय होऊ शकतो. ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण तुम्हाला या कंपन्यांच्या माध्यमातून घेता येऊ शकते.

 तुम्हाला देखील ड्रोन खरेदी करायचे असेल तर या ठिकाणाहून करता येईल

तुम्हाला देखील ड्रोन खरेदी करायचे असेल तर तुम्ही या क्षेत्रातील नामांकित कंपनीकडे चौकशी करून शेती करिता ड्रोन ची खरेदी करू शकतात. वैयक्तिक पातळीवर सध्या तरी ड्रोनचा वापर शक्य नाही. परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये या माध्यमातून औषध फवारणी करून चांगला व्यवसाय उभारता येऊ शकतो व चांगला आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत देखील निर्माण केला जाऊ शकतो.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts