Bank Update : एकीकडे नवीन वर्ष सुरु झाले आहे, दुसरीकडे बँकांनी एकापेक्षा एक ऑफर्स आणायला सुरुवात केली आहे. या प्रकरणात बँक ऑफ बडोदाचे देखील नाव जोडले गेले आहे. याआधी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कोटक महिंद्रा बँकेने ग्राहकांसाठी ऑफर आणल्या होत्या. या बँकांनी आपल्या मुदत ठेवींमध्ये वाढ करून ग्राहकांना न्यू ईयर गिफ्ट दिले आहे. कोणत्या बँकांनी आपल्या एफडीवर किती व्याजदर वाढवलेत आहेत चला पाहूया.
बँक ऑफ बडोदा
वर्षाच्या शेवटच्या महिन्यात ज्या बँकांनी मुदत ठेवींच्या दरात वाढ केली आहे त्यांच्याबद्दल बोलायचे तर अलीकडेच बँक ऑफ बडोदाने त्यांच्या व्याजदरात वाढ जाहीर केली आहे. BoB ने वेगवेगळ्या मुदतीच्या मुदत ठेवींवरील व्याजदर 10 बेसिस पॉइंट्सने 125 बेसिस पॉइंट्स किंवा 0.10 टक्के ते 1.25 टक्के वाढवले आहेत. ही वाढ 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या FD साठी करण्यात आली आहे, जी 29 डिसेंबर 2023 पासून लागू आहे.
डीसीबी बँक
DCB बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर वेगवेगळ्या कालावधीसाठी त्यांचे व्याजदर बदलले आहेत. हे बदल 13 डिसेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. वाढीव दरांतर्गत, सात दिवसांपासून ते १० वर्षांच्या मुदतीच्या एफडीवर आता ३.७५ टक्के ते ८ टक्के व्याज दिले जात आहे. या कालावधीसाठी, बँक ज्येष्ठ नागरिकांना 4.25 टक्के ते 8.60 टक्के व्याज देत आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया
स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरातही वाढ केली आहे. या अंतर्गत 7-45 दिवसांच्या FD वर 0.50 टक्के वाढ झाली आहे. त्याचबरोबर 46-179 दिवसांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 0.25 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. 180-210 दिवसांच्या FD वर व्याजदर देखील 0.50 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेतील बदलांनंतर नवीन दर 27 डिसेंबर 2023 पासून लागू झाले आहेत.
फेडरल बँक
फेडरल बँकेने 500 दिवसांच्या मुदत ठेवी करणाऱ्या ग्राहकांसाठी व्याजदर वाढवले आहेत. बँकेने 5 डिसेंबर 2023 पासून नवीन दर लागू केले आहेत. या अंतर्गत आता कमाल 7.50 टक्के व्याजदर दिला जात आहे. त्याच वेळी, बँक या कालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 8.15 टक्के व्याज देत आहे. तर 21 महिने ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर सामान्य ग्राहकांना 7.30 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.80 टक्के व्याज मिळत आहे.
कोटक महिंद्रा बँक
एफडीवरील व्याजदर वाढवणाऱ्या बँकांच्या यादीतील पुढील नाव कोटक महिंद्रा बँकेचे आहे, जिथे तीन ते पाच वर्षांत परिपक्व होणाऱ्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. आता बँकेत मुदत ठेवी करणाऱ्या ग्राहकांना सामान्य ग्राहकांसाठी 2.75 टक्के ते 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.35 टक्के ते 7.80 टक्के अशा वेगवेगळ्या कालावधीसाठी व्याज दिले जात आहे.