Business Idea:- सध्या नोकऱ्यांची उपलब्धता खूपच कमी असल्यामुळे स्वतःचा काहीतरी व्यवसाय करणे ही काळाची गरज आहे. व्यवसाय म्हटले म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्या डोळ्यासमोर येते ती त्यासाठी लागणारी गुंतवणूक. कारण आपला समज असा असतो की व्यवसाय करण्यासाठी बऱ्याच प्रमाणात जास्त पैशांची आवश्यकता असते.
परंतु जर आपण बारकाईने अभ्यासले तर असे अनेक व्यवसाय असतात की अगदी आपल्याला दहा ते वीस हजार रुपयांच्या गुंतवणुकीत देखील सुरू करता येतात व त्या माध्यमातून आपण महिन्याला वीस ते तीस हजार रुपये पर्यंत देखील कमाई करू शकतो.
फक्त आपल्याला त्या व्यवसायाची मार्केटिंग करता येणे खूप जास्त गरजेचे असते. असे छोट्या गुंतवणुकीतून सुरू होणाऱ्या व्यवसायांची यादी खूप मोठी होते. परंतु यामधून चांगली मागणी असणारा व्यवसाय उभा करणे खूप गरजेचे असते. याच मुद्द्याला धरून आपण या लेखांमध्ये केळी पावडरच्या व्यवसायाबद्दल माहिती घेणार आहोत. हा व्यवसाय तुम्हाला कमीत कमी गुंतवणुकीमध्ये खूप चांगला पैसा देऊ शकतो.
केळी पावडर बनवण्याचा व्यवसाय देईल तुम्हाला चांगला नफा
जर तुम्ही केळी उत्पादक शेतकरी असाल तर त्यासोबत तुम्ही केळी पावडरचा व्यवसाय सुरू करून चांगला आर्थिक नफा मिळवू शकतात. या व्यवसायामध्ये साधारणपणे तुम्हाला दहा ते पंधरा हजार रुपयांची गुंतवणूक करणे गरजेचे असते. या व्यवसायामध्ये तुम्हाला काही यंत्रांची आवश्यकता भासते.
साधारणपणे दोन प्रकारचे मशीन यासाठी लागतात. यामध्ये केळी ड्रायर मशीन आणि दुसरे म्हणजे मिश्रण अथवा मिक्सर मशीन हे होय. हे मशीन तुम्ही इंडिया मार्टवरून खरेदी करू शकतात. तसेच तुम्ही तुमच्या जवळच्या बाजारातून देखील ऑफलाइन पद्धतीने या मशीनची खरेदी करू शकतात.
केळी पावडर कशी बनवली जाते?
यासाठी हिरवी केळी तोडून ती सोडियम हायपोक्लोराइटच्या द्रावनाने स्वच्छ करणे गरजेचे असते. नंतर हाताने केळी सोलून घ्यावी व लगेच सायट्रिक ऍसिडच्या द्रावणामध्ये पाच मिनिटे बुडवावी. त्यानंतर केळीच्या फळाचे लहान लहान तुकडे करावेत हे तुकडे साठ अंश सेल्सिअस तापमानामध्ये गरम हवेच्या ओव्हनमध्ये 24 तास सुकवण्यासाठी ठेवावेत.
यामुळे केळीचे तुकडे पूर्णपणे कोरडे होतात व हे तुकडे कोरडे झाल्यानंतर मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्यावेत. अतिशय बारीक पावडर तयार होईपर्यंत मिक्सरमध्ये हे तुकडे बारीक करावेत. अशा साध्या पद्धतीने तुम्ही केळीची पावडर तयार करू शकतात.
केळी पावडर विक्रीतून किती नफा मिळू शकतो?
केळीपासून तुम्ही जी काही पावडर तयार करतात ती फिकट पिवळ्या रंगाची असते. ही पावडर पॉलिथिनच्या पिशवीत किंवा काचेच्या बाटलीमध्ये पॅकिंग करता येते. जर आपण केळी पावडर बनवण्याचा खर्च पाहिला तर तो अतिशय कमी आहे.
बाजारामध्ये मात्र 800 ते हजार रुपये प्रतिकिलो दराने केळीची पावडर विकली जाते. म्हणजेच तुम्ही साधारणपणे दररोज पाच किलो केळीची पावडर जरी विकली तरी तुम्ही दररोज साडेतीन ते साडेचार हजार रुपये कमवू शकतात.
आरोग्याच्या दृष्टिकोनातून केळी पावडरचा विचार केला तर ही ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत करतेस परंतु लहान मुलांसाठी देखील केळीची पावडर खूप फायद्याची आहे. पचनशक्ती मजबूत करण्यासाठी केळीची पावडर फायदेशीर ठरते व त्वचेसाठी देखील ती फायद्याची आहे.