Business Success Story:- एखादे व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणावर हाय लेवलचे शिक्षण घेतात व या उच्च शिक्षणाच्या जोरावर कुठेही गेले तरी त्यांना भरपूर प्रमाणात वार्षिक पॅकेजच्या नोकरी देखील उपलब्ध असतात. पण काही व्यक्तींच्या डोक्यामध्ये व्यवसायाचा किडा इतका पक्का असतो ते विविध प्रकारच्या चांगल्या पगाराच्या नोकऱ्या धुडकावून लावतात व एखाद्या व्यवसायामध्ये पडतात.
या व्यवसायामध्ये ते खूप मोठ्या प्रमाणावर कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर अभ्यासपूर्ण रीतीने यशस्वी देखील होतात व नोकरीत कमावला नसता त्याच्यापेक्षा दुप्पट व तिप्पट पैसा कमावतात. साधारणपणे भारतातल्या युवकांची काही वर्षांपूर्वीची जी मानसिकता होती ती म्हणजे उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळवणे व आयुष्यामध्ये स्थिरस्थावर होणे.
परंतु आता ही मानसिकता हळूहळू बदलत असून अनेक उच्चशिक्षित तरुण आता वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये स्वतःचे नशीब आजमावत आहेतच व त्यामुळे आता अनेक प्रकारचे स्टार्टअप देखील उभे राहताना आपल्याला दिसून येत आहेत.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण केरळ राज्यातील अलाप्पुझा येथील रहिवासी असलेले मानस मधु यांची यशोगाथा पाहिली तर ती या मुद्द्याला अगदी तंतोतंत जुळते. मानसने देखील एमबीएमध्ये पदवी मिळवली आहे व एका कार्पोरेट क्षेत्रातील नोकरी सोडून केळी चिप्स उद्योगात पाऊल ठेवले व आज त्यांची ही कंपनी संपूर्ण देशामध्ये नावारूपाला आलेली आहे. त्याचीच यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
केरळच्या मानस मधूने उभारली बीऑन्ड स्नॅक्स नावाची कंपनी
केरळ मधील अलाप्पुझा येथील रहिवासी असलेला मानस मधु केळी चिप्स उद्योगातून करोडो रुपये कमावत असून एमबीए पदवीधर असलेल्या मानसने 2018 मध्ये कार्पोरेट नोकरी सोडली आणि बीऑन्ड स्नॅक्स नावाची कंपनी सुरू करून या कंपनीचा विस्तार आज केरळच्या बाहेर संपूर्ण देशांमध्ये केलेला आहे.
अशाप्रकारे सुचली व्यवसायाची कल्पना
जर आपण चिप्स बनवण्याच्या उद्योगामागे मानस यांची कल्पना पाहिली तर जेव्हा ते अभ्यास किंवा इतर कामांसाठी घराच्या बाहेर जात असे तेव्हा त्यांची आई त्यांच्या बॅगेमध्ये केळीचे चिप्स खाण्यासाठी ठेवायची. तेव्हाच मानस यांच्या मनामध्ये चिप्सची कंपनी सुरू करावी असा विचार यायला लागलेला होता. सध्या केळीची चिप्स विकणारे ब्रँड भारतात खूपच कमी आहेत असे मानसला कायम वाटायचे.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आधीपासूनच त्याच्या मनात होती व जो व्यवसाय असेल तो खाद्य उद्योगाशी निगडित असेल हे देखील त्याने ठरवलेले होते. त्या दिवशी यासंबंधीचा लेख वाचत असताना या व्यवसायाची कल्पना त्यांना सुचली व त्यातूनच बियोन्ड स्नॅक्स कंपनीची मुहूर्तमेढ रोवली गेली.
आज या कंपनीच्या माध्यमातून पेरी पेरी,देसी मसाला तसेच मीठ व मिरपूड, हॉट अँड स्वीट चिल्ली तसेच सॉर क्रीम ओनियन व नमकीन इत्यादी वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये केळीची चिप्स तयार केली जातात व त्याची विक्री केली जाते.
ही कंपनी हंगामी केळीच्या उपलब्धतेवर आधारित दक्षिण भारतातील राज्यातील शेतकऱ्यांकडून केरळ केळी म्हणजेच नेंद्रन खरेदी करते व ही ताजी कच्ची केळी स्वच्छ करून त्याचे तुकडे केले जातात व शुद्ध तेलामध्ये तळून त्याचे चिप्स बनवून योग्य ती पॅकिंग केली जाते.
असा केला आहे बियोन्ड स्नॅक्सचा विस्तार
हे चिप सध्या बिग बास्केटस,इंडिया मार्ट व ॲमेझॉन सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर किरकोळ आणि सुपर मार्केटमध्ये देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आज या चिप्स चे ग्राहक बंगलोर, पुणे तसेच म्हैसूर, मुंबई आणि दिल्ली सारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर असून मानस यांनी तयार केलेली उत्पादने मुंबई आणि पुण्यासारख्या शहरातील 3500 पेक्षा अधिक आउटलेटच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
इतकेच नाही तर या कंपनीने कतार, अमेरिका तसेच नेपाळ व मॉरिशस सारख्या देशांमध्ये देखील उत्पादने विकण्याच्या प्रमाणात वाढ केलेली आहे. सध्या मानसच्या कंपनीचे उत्पादने द गुड स्टफ आणि जिओ मार्ट सारख्या प्लेटफॉर्मर देखील उपलब्ध असून महिन्याला या उत्पादनांची एक कोटी रुपयांच्या आसपास विक्री होते.