जीवनामध्ये बऱ्याचदा काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवते व मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता भासते व यामध्ये प्रमुख आपत्कालीन परिस्थितीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हॉस्पिटलचा खर्च हा कधी कोणाच्या आयुष्यामध्ये अचानकपणे येईल याची कुठल्याही प्रकारची शाश्वती नाही.
त्यामुळे बरेच व्यक्ती आरोग्य विमा घेण्यासाठी प्रयत्नशील असतात व आरोग्य विमा घेऊन ठेवतात. त्यामुळे अशा आरोग्यविषयक अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये या आरोग्य विम्याचा खूप मोठा फायदा होतो.
परंतु आजही देशात बहुसंख्य लोकसंख्या अशी आहे की त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा विमा कव्हर नाही व अशावेळी जर अचानक हॉस्पिटलमध्ये जाण्याची पाळी आली तर मात्र खूप धावपळ होते. त्यामुळे या सगळ्या समस्येवर उपाय म्हणून कॅनरा बँकेने एक मार्ग शोधला असून त्याचा फायदा अशा परिस्थितीत होऊ शकतो.
कॅनरा बँकेने सुरू केली नवीन योजना
दवाखान्याचा खर्च पूर्ण करता यावा याकरिता कॅनरा बँकेच्या माध्यमातून आता कर्ज देण्यासाठीची नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. कॅनरा बँकेने कॅनरा हिल नावाने आरोग्यासाठी कर्ज योजना आणली असून यामुळे आता हॉस्पिटलमध्ये लागणारा पैसा जर संपला आणि उपचार दरम्यान काही रक्कम कमी पडण्याची शक्यता निर्माण झाली तर कॅनरा बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या आरोग्य कर्ज योजनेचा फायदा होऊ शकतो.
बँकेच्या माध्यमातून रुग्णालयातील खर्च पूर्ण करता यावा याकरिता कर्जाचे दोन प्रकार उपलब्ध करून दिलेली आहेत. यामध्ये पहिला फ्लोटिंग अर्थात बदलत्या व्याजदर आधारे कर्ज आणि दुसरा म्हणजे स्थिर व्याजदराच्या आधारे कर्ज असे ते पर्याय आहेत. यामध्ये फ्लोटिंग व्याजदराच्या आधारे घेतल्या जाणाऱ्या कर्जावर 11.55% वार्षिक व्याजदर निश्चित करण्यात आला आहे
तर निश्चित व्याजदरावर आधारित घेतलेल्या कर्जासाठी 12.30% इतका व्याजदर निश्चित करण्यात आलेला आहे. या आरोग्य विमा योजना अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांच्या उपचाराचा खर्च हा त्यांच्या मंजूर विमा रकमेपेक्षा अधिक आहे.
महिलांसाठी कॅनरा बँकेच्या सुविधा
कॅनरा बँकेच्या माध्यमातून या सोबतच महिलांसाठी देखील अनेक सुविधा देण्यासाठी पाऊल उचलण्यात आलेले आहे व यामध्ये महिलांकरिता बचत खाते, कॅनरा एंजल इत्यादी सादर केले आहे. यामध्ये अगोदर मंजूर व्यक्तिगत कर्ज तसेच ऑनलाईन कर्ज इत्यादी सुविधा देण्यात येणार आहेत.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महिलांना जर बचत खाते उघडायचे असेल तर संपूर्णपणे निशुल्क खाते उघडता येणार आहे. तसेच सध्या महिला ग्राहक या सुविधेचा लाभ घेण्यासाठी त्यांचे अगोदरचे खाते या नवीन पर्यायामध्ये हस्तांतरित देखील करू शकतात. तसेच रिझर्व बॅंकेच्या नवोन्मेष केंद्रांच्या मदतीने बचत गटांसाठी अविरत डिजिटल सेवा देणारी सहयोग करणारी कॅनरा बँक ही पहिली बँक ठरली आहे.