Cibil Score Tips:-क्रेडिट स्कोर अर्थात सिबिल स्कोर हा बँकिंग व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असून जर तुम्हाला कधीही कर्ज घेण्याची वेळ आली आणि तुम्ही जर बँकेत गेलात तर सगळ्यात आधी तपासला जातो तो तुमचा सिबिल स्कोर होय. या सिबिल स्कोरच्या आधारे बँकांना कळते की तुमची आर्थिक पत किंवा तुम्ही कर्जाची परतफेड करण्यासाठी सक्षम आहात की नाही.
सिबिल स्कोर हा 300 ते 900 या अंकांच्या दरम्यान गणला जातो. साधारणपणे 750 च्या पुढे जर सिबिल स्कोर असेल तर तो उत्तम मानला जातो. या सिबिल स्कोर असलेल्या व्यक्तींना बँका ताबडतोब कर्ज उपलब्ध करून देतात. परंतु बऱ्याच व्यक्तींचा सिबिल स्कोर हा घसरलेला असतो व अशा वेळेस जर तुम्ही बँकेकडे कर्ज घ्यायला गेले तर तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळणे दुरापास्त होते किंवा जास्त व्याज दरात तुम्हाला ते कर्ज दिले जाते.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही कधीही कर्ज घेतले नसेल आणि क्रेडिट कार्ड देखील वापरले नसेल तरी देखील तुमचा क्रेडिट हिस्ट्री म्हणजे सिबिल स्कोर हा एक असतो. म्हणजेच तो शून्य क्रेडिट स्कोर मानला जातो. अशा क्रेडिट स्कोर असलेल्या व्यक्तींना देखील बँकेच्या माध्यमातून कर्ज मिळणे कठीण जाते.
कारण अशावेळी ती व्यक्ती कर्ज परतफेड करण्यास सक्षम आहेत की नाही याबाबत बँकेला संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे बँक कर्ज देण्या टाळाटाळ करू शकते किंवा कधी कर्ज नाकारू देखील शकते. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर तुमचा सिबिल स्कोर घसरला असेल तर तो सुधारण्याकरिता तुम्हाला काही महत्त्वाच्या बाबी पाळणे खूप गरजेचे आहे.
या गोष्टींची काळजी घ्या आणि घसरलेला सिबिल स्कोर वाढवा
1- घेतलेल्या कर्जाचे वेळेवर पेमेंट करणे– तुम्हाला जर तुमचा सिबिल स्कोर मजबूत ठेवायचा असेल तर वेळेवर पेमेंट करणे गरजेचे आहे. जर तुम्ही वेळेवर पेमेंट केले नाही किंवा उशिरा केले किंवा डिफॉल्ट केले तर त्याचा विपरीत परिणाम तुमच्या सिबिल स्कोर वर होतो.
तसेच तुम्ही जर क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर कालावधी पूर्वी क्रेडिट कार्डचे बिल भरणे खूप गरजेचे आहे. यामुळे तुमचा सिव्हिल स्कोर मजबूत होतो. परंतु जर क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही तर त्याचा खूप विपरीत परिणाम हा सिबिल स्कोर घसरण्यावर होतो.
2- वारंवार कार्ड बदलू नये– तसेच क्रेडिट कार्ड वारंवार बदलणे देखील योग्य नसल्याचे मत आर्थिक तज्ञांचे आहे. जोपर्यंत तुम्हाला एखाद्या कार्ड कंपनीकडून चांगली ऑफर मिळत नाही तोपर्यंत तुम्ही क्रेडिट कार्ड स्विच करू नये. याशिवाय तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीमध्ये काही चुकीची माहिती दिसली तर ती पटकन दुरुस्त करण्याला प्राधान्य द्यावे.
सिबिल स्कोर सुधारण्याकरिता तुम्हाला योग्य पुरावा देणेदेखील गरजेचा असतो. जर तुमच्या क्रेडिट हिस्टरीशी संबंधित काही समस्या आली तर ती प्रथम बँकेमध्ये जाऊन सोडवण्याचा प्रयत्न करावा. असं केले नाही तरी तुमचा सिबिल स्कोर कमी होऊ शकतो.
3- सुरक्षित कार्डचा वापर करावा– तुमचा सिबिल स्कोर जर कमी असेल तर तुम्ही क्रेडिट कार्डच्या ऐवजी सुरक्षित कार्ड वापरणे गरजेचे आहे. असे सुरक्षित कार्ड तुमच्या मुदत ठेवी किंवा इतर ठेवींवर जारी केली जाते.
या सुरक्षित कार्डचे अनेक फायदे तुम्हाला मिळतात. समजा तुम्ही देय तारखेपर्यंत जर परतफेड करू शकत नसाल तरी बँक तुमच्या ठेवीतून निधी जारी करते व यामुळे तुमच्या सिबिल स्कोरवर कुठल्याही प्रकारचा वाईट परिणाम होत नाही.
अशाप्रकारे या तीन छोट्याशा परंतु महत्त्वाच्या गोष्टी पाळल्या तरी तुमचा सिबिल स्कोर वेगात वाढू शकतो.