Cibil Score:- जीवन जगत असताना बऱ्याचदा व्यक्तीला आर्थिक अडचण येतात किंवा काहीतरी घरामध्ये आजारपण किंवा लग्न समारंभ इत्यादी कार्यक्रमांमध्ये देखील पैशांची गरज भासते. प्रत्येक वेळेस माणसाच्या हातात पैसा असतो असे नाही. बऱ्याचदा व्यक्तीला बँकेतून कर्ज घ्यावे लागते किंवा क्रेडिट कार्ड इत्यादीच्या माध्यमातून पैशांची तजवीज करावी लागते.
परंतु तुम्ही बँकेत गेलात व बँकेने लगेच तुम्हाला कर्ज दिले असं कधीच होत नाही. कर्ज घेण्यासाठी कागदपत्रांची जेवढी आवश्यकता असते तेवढी आवश्यकता तुमचा क्रेडिट हिस्ट्री किंवा क्रेडिट स्कोर किंवा सिबिल स्कोर कसा आहे याला असते व सर्वप्रथम बँक किंवा कुठलीही एनबीएफसी वित्तीय कंपनी तुमची क्रेडिट हिस्ट्री म्हणजे सिबिल स्कोर तपासते व त्यानंतरच तुम्हाला कर्ज द्यायचे की नाही हे ठरवले जाते.
सिबिल स्कोर कसा मोजला जातो?
क्रेडिट हिस्ट्री अर्थात सिबिल स्कोर हा तीनशे ते नऊशे या आकडेवारीच्या दरम्यान मोजला जातो. सर्वसाधारणपणे 750 पेक्षा जास्त सिबिल स्कोर हा उत्तम मानला जातो. तुमचा सिबिल स्कोर जर साडेसातशे पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला बँकेकडून सहजपणे कर्ज मिळते आणि क्रेडिट कार्ड देखील मिळू शकते.
एवढेच नाही तर बँकांच्या माध्यमातून तुम्हाला कमीत कमी व्याजदरात होम लोन तसेच कार लोन तसेच बिझनेस लोन देखील मिळते. सिबिल स्कोरच्या माध्यमातून यापूर्वी तुम्ही किती कर्ज घेतले आहे व त्याची परतफेड कशी केली आहे याची सर्व माहिती कळते. तसेच तुमची पर्सनल डिटेल्स तसेच तुमचा नोकरीचा तपशील, बँक खात्याचा तपशील व मागील कर्जाचा तपशील देखील स्कोर अहवालामध्ये नोंदवला जातो.
सिबिल चांगला ठेवल्यास काय होतो फायदा?
जेव्हा तुम्ही बँकेमध्ये कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी जातात तेव्हा सर्वात आधी तुमचा सिबिल स्कोर बँकेच्या माध्यमातून तपासला जातो व त्यानंतरच कर्ज द्यावे की नाही याबाबतचा निर्णय बँक घेत असते. तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कमीत कमी व्याजदरामध्ये कर्ज मिळू शकते.
तसेच इतर अनावश्यक बँक कागदपत्र देण्याची देखील गरज तुम्हाला भासत नाही. तुम्ही घेतलेल्या कर्जाचे सर्व हप्ते वेळेवर भरणे चांगल्या सिबिल साठी खूप महत्त्वाचे आहे. तसेच क्रेडिट कार्डचे बिल योग्य वेळेला भरणे देखील महत्त्वाचे आहे. तुम्ही जर क्रेडिट कार्डचे बिल किंवा घेतलेल्या कर्जाचे हफ्ते वेळेवर भरण्यामध्ये अपयशी ठरला तर त्याचा नकारात्मक परिणाम सिबिल स्कोर वर होतो.
सिबिल स्कोर कसा तपासावा?
तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर तपासायचा असेल तर तुम्ही अगदी आरामात तो तपासू शकता. तुम्हाला जर विनामूल्य सिबिल स्कोर चेक करायचा असेल तर त्याकरिता तुम्ही https://www.cibil.com या संकेतस्थळावर क्लिक करू शकता.या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा सर्व तपशील आणि पॅन कार्ड क्रमांक टाकून सिबिल स्कोर तपासू शकता.