UPI Credit Line:- आयुष्यामध्ये बऱ्याचदा आपत्कालीन परिस्थिती उद्भवते व अशावेळी आपल्याला पैशांचे मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासते. परंतु नेमके आपल्याकडे हवे तितके पैसे नसतात व अशावेळी कर्जाचा पर्याय अवलंबला जातो. कर्ज म्हटले म्हणजे मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडून घेतले जाते किंवा हात उसने पैसे घेतले जातात.
या व्यतिरिक्त बँकांच्या किंवा इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून कर्जाचा पर्याय शिल्लक राहतो व त्याकरिता अर्ज वगैरे करून कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न केला जातो. परंतु बँकांकडून कर्ज मिळण्याची जर प्रक्रिया पाहिली तर ती जरा वेळ खाऊ आणि तितकीच किचकट असल्याने बऱ्याचदा वेळेला कर्ज उपलब्ध होत नाही व त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.
बरेच दिवस बँकांच्या चकरा माराव्या लागतात. परंतु आता ही समस्या मिटणार असून रिझर्व बँक ऑफ इंडियाने एक सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता घरबसल्या कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आवश्यक वेळी वेळेत पैसा उपलब्ध होऊ शकणार आहे.
आता सर्वसामान्य ग्राहकांना घरबसल्या मिळेल कर्ज
सर्वसामान्य नागरिकांना अडचणीच्या कालावधीमध्ये सहजपणे व घरबसल्या पैसे उपलब्ध व्हावेत याकरिता भारतीय रिझर्व बँकेने आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून बँकेने स्मॉल फायनान्स बँकांना त्यांच्या ग्राहकांना क्रेडिट लाईन प्रदान करण्याची परवानगी दिली असून यामुळे आता ग्रामीण आणि निमशहरी भागातील लघुउद्योजक व सूक्ष्म उद्योजक आणि इतर घटकांना सहजपणे परवडणाऱ्या दरात कर्ज मिळणार आहेत.
यूपीआयचा विचार केला तर यावर प्री अप्रुड म्हणजे पूर्व मंजूर क्रेडिट लाईन हे एक आर्थिक उत्पादन आहे व सामान्य नागरिकांना सहज कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी हे खास पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे.
त्यामुळे एखाद्या व्यक्तीला किंवा लहान व्यवसाय असतील त्यांना बँकांच्या माध्यमातून पूर्व मंजूर क्रेडिट लाईन मिळवण्याची परवानगी मिळेल व या मिळालेल्या क्रेडिट लाईनचा वापर यूपीआयच्या माध्यमातून ताबडतोब व्यवहारांसाठी केला जाऊ शकतो.
यूपीआय क्रेडिट लाईन ही वापरकर्त्याच्या युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच युपीआय खात्याशी लिंक केलेली पूर्व मंजूर क्रेडिट मर्यादा आहे व या सुविधेमुळे युजर्स त्यांच्या बँक खात्यातून पैसे घेऊ शकतात. या पद्धतीने जे काही कर्ज घेतले जाईल ते सुलभ हप्त्यांमध्ये किंवा बिलिंग सायकलच्या शेवटी परत केले जाऊ शकते.
कशा पद्धतीने वापराल यूपीआय क्रेडिट लाईन?
या सुविधेद्वारे कर्ज घेताना यूपीआय वापरणारे त्यांचे ट्रांजेक्शन हिस्ट्री आणि क्रेडिट स्कोर यांच्या आधारे कर्ज घेऊ शकतात. ही सुविधा वापरण्यापूर्वी युजर्स यूपीआय पिनच्या माध्यमातून व्यवहार प्रमाणित करू शकतात व यानंतर ते क्यूआर कोड द्वारे देखील कुठेही पेमेंट करू शकता.
ही सुविधा एक प्रकारे डिजिटल क्रेडिट कार्ड प्रमाणे काम करते व क्रेडिट कार्ड प्रमाणे ग्राहकाला खर्च करण्याची मर्यादा यामध्ये मिळते. तुम्हाला जर या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रथम बँकेमध्ये जाऊन अर्ज करावा लागेल व बँकेकडून जेव्हा मंजुरी मिळेल तेव्हा तुमच्या खात्यात पैसे असले किंवा नसले तरी तुम्हाला दिल्या गेलेल्या लिमिट पर्यंत युपीआयच्या माध्यमातून पेमेंट करू शकतात.