Credit Card:- आपल्यापैकी बरेच व्यक्ती क्रेडिट कार्ड वापरतात. क्रेडिट कार्डचा वापर हा फार काळजीपूर्वक रीतीने करणे गरजेचे असते. उदाहरणच घ्यायचे झाले तर तुम्हाला जो काही क्रेडिट कार्डचा लिमिट दिलेला असतो तो लिमिट पूर्ण न करणे हे तुमच्या फायद्याचे असते.
साधारणपणे तुमच्या लिमिटच्या 40% इतका खर्च क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करणे हे तुमचा क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी देखील फायद्याचे ठरते. क्रेडिट कार्ड हे जितके फायद्याचे आहे तितके त्याचा वापर जर व्यवस्थित केला नाही तर ते तोट्याचे देखील होऊ शकते. व्यवस्थित नियोजनाने वापर न केल्यास अनेक जण क्रेडिट कार्डच्या कर्जात अडकतात.
परंतु या व्यतिरिक्त जर आपण क्रेडिट कार्डचे फायदे पाहिले तर ते देखील व्यक्तीला खूप लाभदायी असे आहेत. त्यामुळे या लेखात आपण क्रेडिट कार्डचे फायदे नेमके कोणते आहेत याबद्दलची महत्त्वाची माहिती घेणार आहोत.
क्रेडिट कार्डचे ग्राहकांना होणारे फायदे
1- पेमेंट करण्यासाठी तुम्हाला जास्तीचा वेळ मिळतो– क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जर तुम्हाला पेमेंट करायचे असेल तर तुम्हाला जास्तीचा वेळ या माध्यमातून दिला जातो. समजा तुम्ही आज शॉपिंग किंवा इतर वस्तू खरेदी केल्या तर तुम्हाला जवळपास पेमेंट करण्यासाठी 30 ते 45 दिवस मिळतात. त्यामुळे जास्त आर्थिक ताण न येता आरामात व्यक्ती पेमेंट करू शकते.
2- सेलमध्ये डिस्काउंट बेनिफिट मिळतो– आपल्यापैकी बऱ्याच जणांना ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून शॉपिंग करण्याची आवड असते. अशा ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर अनेक डिस्काउंट ऑफर मिळतात. अशा ऑफर क्रेडिट कार्डच्या माध्यमातून देण्यात येतात. तसेच बऱ्याच प्रकारांमध्ये तुम्हाला क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कॅशबॅक देखील मिळतो व यासोबतच कॅशबॅक वर रिवार्ड पॉईंटचा फायदा देखील तुम्ही सेलच्या माध्यमातून वस्तू खरेदी केल्यानंतर तुम्हाला मिळू शकतो.
3- चांगली क्रेडिट हिस्ट्री तयार होण्यासाठी फायद्याचे– तुमचा सिबिल स्कोर अथवा क्रेडिट हिस्ट्री ही तुमच्यासाठी भविष्यात कर्ज घेण्यासाठी खूप उपयुक्त असणारी बाब आहे. क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचे कर्जच आहे. क्रेडिट कार्डचा वापर तुम्ही जितका जास्त कराल व व्यवस्थित त्यामध्ये आर्थिक नियोजन ठेवाल तर तुमची उत्तम क्रेडिट हिस्ट्री तयार होण्यासाठी याची मदत होते. तुमची क्रेडिट हिस्टरी चांगली असेल तर तुम्हाला भविष्यात लोन आवश्यक असेल तर बँक तुम्हाला झटक्यात लोन उपलब्ध करून देते.
4- ईएमआय सुविधा मिळते– तुम्हाला क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ईएमआयची सुविधा देखील मिळते. तुम्ही क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कुठलीही वस्तू खरेदी करू शकतात आणि तुमचे बिल इएमआयमध्ये रूपांतरित करू शकता. तसेच तुम्हाला क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट ईएमआयची सुविधा देखील मिळते म्हणजेच तुम्हाला कोणत्याही प्रकारचे व्याज देखील द्यावे लागत नाही.
5- अचानकपणे पैशांची निकड पडली तर– समजा तुम्हाला अचानक पणे पैशांची गरज पडली तर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करू शकतात हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. बऱ्याचदा मोठी समस्या निर्माण होते व आपल्या खात्यामध्ये पैसे नसतात अशा वेळी तुमच्याकरिता क्रेडिट कार्ड धावून येऊ शकते.
अशा पद्धतीने जर पाहिले तर क्रेडिट कार्डचे जेवढे तोटे माहिती आहेत तेवढे फायदे देखील आहेत. फक्त तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर कसा करता यावर ते सगळे अवलंबून आहे.