Dragon Fruit Farming:- शेती जरी निसर्गावर अवलंबून आहे आणि निसर्गाचा जरी शेतीवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असला तरी देखील आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अनेक गोष्टींवर मात करता येणे शक्य झाले आहे. याचीच परिणीती म्हणून जर आपण विचार केला तर अनेक वेगवेगळ्या पद्धतीची पिके आता भारतातल्या कुठल्याही भागात पिकवणे शक्य झाले आहे.
उदाहरणच घ्यायचे झाले तर सफरचंद हे उत्तर भारतात पिकणारे फळ म्हणून आणि त्यातल्या त्यात जम्मू काश्मीर आणि हिमाचल सारख्या राज्यात तिथे असा एक समज होता. कारण या पिकाला थंड वातावरण मानवते. परंतु सफरचंदामध्ये देखील आता उष्ण वातावरणात देखील येऊ शकेल असे वाण विकसित झाल्यामुळे महाराष्ट्रात देखील शेतकरी छोट्या प्रमाणात का होईना सफरचंदाची लागवड यशस्वी करत आहेत.
म्हणजेच सांगायचा मुद्दा असा की तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण बऱ्याच गोष्टी आता सुलभ केलेल्या आहेत. तसेच पारंपरिक पिकांच्या ऐवजी आता शेतकरी मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवडीकडे वळल्यामुळे देखील वेगवेगळ्या प्रकारचे फळबागांचे लागवड होऊ लागली आहे.
यामध्ये जर आपण ड्रॅगन फ्रुटचा विचार केला तर अगदी काही वर्षं अगोदर पासून ड्रॅगन फ्रुट भारतात आले आणि पाहता पाहता आता भारतातील शेतकरी अगदी सहजतेने याचे भरघोस असे उत्पादन मिळवत आहेत. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण हिमाचल प्रदेश राज्यातील उना या जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यातील आंब या गावचे रहिवासी असलेले मुश्ताक गुजर यांनी ड्रॅगन फ्रुट शेतीतून खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्रगती साधली आहे.
ड्रॅगन फ्रुटने दिली आर्थिक समृद्धी
याबद्दलचे सविस्तर वृत्त असे की, हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील आंब या गावचे शेतकरी मुस्ताक गुजर यांनी नोकरी न करता शेतीची निवड केली आणि त्यामध्ये सातत्याने प्रगती ते करत आहे. गहू तसेच मका आणि धान यासारख्या पारंपारिक पिकांऐवजी मुश्ताक यांनी ड्रॅगन फ्रुट लागवड केली व त्या माध्यमातून लाखो रुपये कमवले आहेत.
सध्या त्यांनी पाच हजार ड्रॅगन फ्रुटची रोपांची लागवड केली असून त्यातील एक हजार तीनशे झाडांपासून त्यांना उत्पादन मिळायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये 1300 ड्रॅगन फ्रुटच्या झाडांपासून त्यांना सुमारे दोन टन ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन मिळाले आहे. या उत्पादनाला त्यांना बाजारामध्ये 250 ते 300 रुपये प्रति किलो इतका दर मिळाला असून त्या माध्यमातून त्यांना भरपूर असा नफा मिळाला आहे.
याबद्दल मुस्ताक यांनी म्हटले की बाजारात ड्रॅगन फुटला खूप मोठी मागणी असल्यामुळे ते तीनशे रुपये किलो पर्यंत देखील विकले जात आहे. 2019 मध्ये मुस्ताक याने 500 ड्रॅगन फ्रुटच्या रोपांची लागवड केली. सध्या त्यांच्या शेतामध्ये 5000 झाडे असून यामध्ये अमेरिकन ब्युटी, रेड सीमा तसेच रेड रॉयल आणि व्हिएतनामी इत्यादी वाणांची लागवड केलेली आहे.
एवढेच नाही तर त्यांनी तब्बल साडेतीन एकर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रुट ची रोपवाटिका देखील तयार केली असून स्थानिक बाजारपेठ व बिलासपूर तसेच हमीरपुर, चंदीगड आणि जालंदर मध्ये देखील त्यांचे ड्रॅगन फ्रुट मोठ्या प्रमाणावर विकले जाते.
मुस्ताक गुजर यांनी कृषी सिंचन योजनेअंतर्गत मिळवले ठिबक साठी 80 टक्के अनुदान
ड्रॅगन फुटला पाणी व्यवस्थापन करता यावे याकरिता त्यांनी सिंचनाकरिता ठिबक सिंचन बसवावे म्हणून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून ठिबक सिंचनासाठी 80 टक्के अनुदान देखील मिळवले आहे.तसेच वेळोवेळी त्यांना उत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देखील तांत्रिक मदत मिळत आहे.
जर आपण फलोत्पादन विभागाचे त्या ठिकाणची उपसंचालक संतोष बक्षी यांच्या मताचा विचार केला तर त्यांच्या मते उना या ठिकाणचे जे काही वातावरण आहे ते ड्रॅगन फ्रुट च्या लागवडीसाठी खूप पोषक आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना आणि इतर बागायतदारांना देखील ड्रॅगन फ्रुट लागवडीकरिता प्रोत्साहित केले जात आहे.
या ठिकाणी ड्रॅगन फ्रुटची लागवड वाढावी याकरिता अनेक प्रकल्पांवर सध्या काम सुरू आहे. त्यामुळे नक्कीच या ठिकाणच्या शेतकरी आणि बागायतदारांची आर्थिक स्थिती मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून ड्रॅगन फ्रुटची भूमिका महत्त्वाची ठरेल अशी अपेक्षा त्या ठिकाणच्या शेतकरी आणि फलोत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे.