EPF Rule:- सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीएफ हा एक महत्वपूर्ण फंड असून निवृत्तीनंतर या पीएफ खात्यात जमा झालेला पैसा हा खूप उपयोगी पडतो. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून पीएफ फंडाचे नियमन केले जाते.
आपल्याला माहित आहेच की तुमच्या मासिक पगारातून जे काही पीएफच्या अनुषंगाने पैसे कापले जातात ते तुमच्या पीएफ खात्यात जमा होतात व तुमच्या पगारातून कापले गेलेल्या पैशाइतकीच रक्कम तुमची नियोक्ता कंपनी देखील जमा करत असते. यामध्ये जमा झालेली रक्कम ही निवृत्तीनंतरच नाही तर एखाद्या आर्थिक संकटाच्या कालावधीत देखील आपल्याला खूप मोठा आधार देत असते.
काही विशिष्ट कारणांकरिता पीएफ मधून पैसे काढता येतात. यामध्ये ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे काही नियम असून त्यानुसार तुम्ही ईपीएफचे पैसे आगाऊ स्वरूपात काढू शकतात. नेमक्या आपण कोणत्या उद्देशाने पीएफ खात्यातून पैसे काढू शकतो याबद्दलची माहिती या लेखात घेणार आहोत.
या कारणांमुळे पीएफ खात्यातून पैसे काढता येतात
पीएफ खात्यामधून आगाऊ रक्कम काढायची असेल तर ती प्रामुख्याने मेडिकल, शिक्षण, लग्न समारंभ तसेच जमिनीची खरेदी, घराचे बांधकाम किंवा बेरोजगारी निर्माण झाल्यास पीएफ खात्यातील पैसे काढता येतात. परंतु याकरिता देखील काही नियम आहेत व त्या नियमांचे पालन करूनच पैसे मिळतात. त्यामध्ये जर लग्नासाठी पैसे काढायचे असतील तर ईपीएफ सदस्यत्वाची सात वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे व त्यानंतरच तुम्ही आगाऊ फायदा मिळवू शकता.
कोणाच्या लग्नासाठी तुम्ही पैसे काढू शकतात व किती पैसे काढता येतात?
या माध्यमातून तुम्ही तुमच्या स्वतःच्या लग्नाकरिता किंवा तुमच्या मुलांच्या किंवा मुलीच्या लग्नाकरिता किंवा तुमचा भाऊ किंवा बहीण यांच्या लग्नाकरिता पीएफ खात्यातून आगाऊ रक्कम काढू शकतात. पीएफ खात्याचा विचार केला तर यामध्ये दोन प्रकारे पैसे जमा होतात
त्यातील पहिला प्रकार म्हणजे स्वतःच्या पगारातून कापलेले पैसे म्हणजेच स्वतःची योगदान आणि तितकीच रक्कम कंपनीच्या माध्यमातून जमा केली जाते ज्याला आपण कंपनीचे योगदान असे म्हणतो. या जमा रकमेतून तुम्ही 50% पर्यंतचे पैसे लग्नासाठी काढू शकता. महत्त्वाचे म्हणजे याला जोडून तुम्हाला व्याजाचा लाभ देखील दिला जातो. परंतु सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जर लग्न आणि शिक्षणाकरिता पैसे काढायचे असतील तर ते तीन पेक्षा जास्त वेळा काढता येत नाही.