Farmer Success Story:- शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय हा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्राप्ती या व्यवसायातून शेतकऱ्यांना होत असते. दुधाचे उत्पादन हा पशुपालन व्यवसायातील प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असल्यामुळे त्या दृष्टिकोनातूनच पशुपालन व्यवसायाचे नियोजन केले जाते.
पूर्वी देशी जनावरांचे पालन मोठ्या प्रमाणावर व्हायचे परंतु आता पशुपालन व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे संकरित गाईंच्या पालनातून दुग्ध व्यवसायाने मोठ्या प्रमाणावर भरारी घेतली आहे. तसेच आताचे शेतकरी बाजारपेठेचा अभ्यास करून त्या पद्धतीने व्यवस्थित नियोजन करून देखील या व्यवसायामध्ये स्थिरस्थावर झालेले आपल्याला बघायला मिळतात.
शेतीसोबत पशुपालन व्यवसाय कमवून शेतीला जोड धंदा म्हणून सुरू केलेल्या पशुपालनातून लाखो रुपये शेतकरी कमावतात. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण वैजापूर तालुक्यातील बायगाव येथील दत्तू व नानासाहेब मुरलीधर जाधव या दोन शेतकरी बंधूंचा विचार केला तर हे एक एकत्रित कुटुंब असून दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून या कुटुंबाने खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेली आहे. नेमके जाधव यांनी कशा पद्धतीने दूध व्यवसायाचे नियोजन केले आहे याबद्दल आपण माहिती घेऊ.
दुग्ध व्यवसायातून वार्षिक तीन ते चार लाखाचे उत्पन्न
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, दत्तू मुरलीधर जाधव आणि नानासाहेब मुरलीधर जाधव हे वैजापूर तालुक्यातील बायगाव येथील रहिवासी असून त्यांचे एकत्रित कुटुंब आहे. या कुटुंबाने एकत्रित येत 2019 मध्ये एका गाईपासून दूध व्यवसायाची सुरुवात केली व आज या व्यवसायामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करत त्यांच्याकडे 14 गाई आणि सात कालवडी अशा प्रकारचे पशुधन असून या गायींकरिता 70 फूट लांब व 40 फूट रुंदीचे गोठा बांधून त्यांनी बंदिस्त पद्धतीने गाय पालन सुरू केलेले आहे.
या व्यवसायामध्ये जनावरांना वैरण देण्यापासून ते दूध काढणे तसेच शेण उचलणे, गोठ्याची स्वच्छता इत्यादी कामे सर्व कुटुंब एकमेकांच्या सहकार्याने पूर्ण करतात. दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीनचा वापर तसेच चाऱ्याकरीता कुट्टी मशीनचा वापर करत असल्यामुळे त्यांना मजुरांची आवश्यकता भासत नाही व त्यामुळे त्यांचा बराचसा खर्च वाचतो. सकाळी पाच ते आठ आणि सायंकाळी पाच ते आठ या वेळेत त्यांचे पूर्ण नियोजन हे गाईंच्या गोठ्याच्या दृष्टिकोनातून असते. जाधव यांच्याकडे पाच एकर शेती असून त्यामध्ये दोन एकर त्यांनी मोसंबीची बाग केलेली आहे.
एक एकर मध्ये नेपियर गवताची लागवड केली असून त्यासोबतच सुखा चारा म्हणून कडबा कुट्टी तसेच गव्हाचा भुसा, खरीप व रब्बी हंगामातील मकाचा मुरघास ते साठवून ठेवतात व त्याचा वैरणीसाठी वापर करतात. वैरणीमध्ये गाईंना दररोज टोटल मिक्स रेशन प्रमाणे सुखाचारा, नेपियर कुट्टी आणि मुरघास अशी एकत्रित चाऱ्याची वैरण सकाळ आणि संध्याकाळी दोन वेळेस दिली जाते.
रेतन निवड व कालवड संगोपनावर जोर
जाधव यांच्या गोठ्यामध्ये पाच ते सहा गाई विकत आणलेल्या आहेत व बाकीच्या गाई त्यांनी गोठ्यातच तयार केलेल्या आहेत. रेतनाकरिता डेन्मार्क तसेच बाएफ, एबीएस सारख्या दर्जेदार कंपन्यांच्या रेतन काड्यांचा वापर केला जातो. पशु तज्ञांच्या मदतीने योग्य वेळेत गाईंचे कृत्रिम रेतन केले जाते.
त्यांच्या गोठ्यामध्ये दोन वेळचे मिळून 130 लिटर दूध देणाऱ्या घरच्या कालवडी देखील आहेत. या व्यवसायासोबतच नानाभाऊ जाधव यांनी दोन वर्षापासून गावात आणि परिसरातील दूध संकलन करता यावे याकरिता अमृत दूध संकलन केंद्र देखील सुरू केला आहे. घरच्या पिकप गाडीच्या मदतीने ते दररोज एक हजार सहाशे लिटर दुधाचे संकलन करतात.
कसे आहे दूध व्यवसायातील अर्थकारण?
दररोज 130 लिटर दुधाचे उत्पादन होते. त्यांनी 100 ते 150 लिटर दरम्यान दुधाचे सातत्य कायम ठेवलेले आहे. दुधाला 33 ते 34 रुपयाचा दर मिळतो व या गाईंपासून दुधासोबतच दरवर्षी पंधरा ते अठरा ट्रॉली पर्यंत शेणखत देखील मिळते. यापैकी जवळपास नऊ ते दहा ट्रॉली शेणखताची ते विक्री करतात. शेणखत साडेसात हजार रुपये ट्रॉली या दराने विकले जाते. त्यामुळे दुधाचे उत्पादन आणि शेणखताचे उत्पादन या माध्यमातून ते एका वर्षाला तीन ते चार लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळवतात.
अशा पद्धतीने सगळ्यांच्या मदतीने व एकीने जर दूध व्यवसाय सुरू केला तर नक्कीच या माध्यमातून शेतकरी बंधू चांगली आर्थिक प्रगती साधू शकतात हे सिद्ध होते.