Financial Management:- आपण बरेच व्यक्ती बघितले असतील किंवा आपल्याला स्वतःला देखील अनुभव असेल की आपण पैसे भरपूर प्रमाणामध्ये कमवतो. परंतु कायम आपण आर्थिक अडचणीतच राहतो. म्हणजेच आपल्याला अडचणीत पैसा लागत असतो तेव्हा आपल्याकडे पैसा राहतच नाही.
आपल्याला दुसरीकडे पैशांसाठी हात पसरावा लागतो. कधी कधी आपल्यापेक्षा कमी पगार असलेला किंवा कमी कमावणारा व्यक्ती देखील पैशांच्या बाबतीत स्वयंपूर्ण किंवा आर्थिक दृष्टिकोनातून समृद्ध दिसून येतो. त्यामुळे बऱ्याचदा प्रश्न पडतो की हे असे का होते? त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर जर शोधायचे असेल तर ते आपल्या स्वतःमध्येच असल्याचे आपल्याला दिसून येईल.
पैशांच्या बाबतीत असलेल्या काही चुकीच्या सवयीच आपल्याला आयुष्यभर किंवा कायम आर्थिक तंगीत ठेवत असतात. त्यामुळे अशा चुका सुधारणे खूप गरजेचे असते. जेणेकरून भविष्यात आपल्याला पैशांची अडचण भासणार नाही. त्यामुळे या लेखात आपण अशा कोणत्या चुका आहेत की त्या सुधारणे गरजेचे आहे? याबद्दलची माहिती बघू.
या चुका सुधारा आणि
आर्थिक समृद्ध रहा1- बचत न करणे– बचत हा श्रीमंत होण्याचा राजमार्ग आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. परंतु कित्येक लोकांना सवय अशी असते की पैसे कितीही कमावतात परंतु त्याचा खर्च इतका अफाट असतो की त्यांच्याकडे पैशांची बचत होऊ शकत नाही.
त्यामुळे असे न करता पैशांच्या दृष्टिकोनातून स्वयंपूर्ण आणि समृद्ध राहायचे असेल तर तुम्ही जे काही कमावता त्यातून बचत करणे गरजेचे आहे. अगदी तुम्ही सुरुवातीपासून कमवायला लागल्यानंतर बचत करणे गरजेचे आहे. तुम्ही जे काही कमावता त्यामधून कमीत कमी 20 टक्के बचत केली पाहिजे.
2- गुंतवणुकीकडे लक्ष न देणे– पैशांची बचत आणि त्या बचतीची गुंतवणूक खूप महत्त्वाची असते. समजा तुम्ही बचत करत आहात परंतु पैशांची गुंतवणूकच करत नाही तर तो पैसा वाया जाण्याची शक्यता असते.
आपल्याला माहित आहे की चांगल्या पर्यायांमध्ये गुंतवलेले पैसे वेगाने वाढतात व चांगली संपत्ती निर्माण करू शकतात. तुम्ही खूप पैसे कमावले व त्यांची गुंतवणूकच केली नाही तर मात्र आर्थिक समस्या उद्भवू शकते. त्यामुळे पैशांची बचत आणि गुंतवणूक या दोन गोष्टींवर प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
3- पैशांच्या नियोजनावर लक्ष न देणे– पैशांच्या खर्चाचे नियोजन करणे खूप गरजेचे आहे. याकरता तुमचा महिन्याचा बजेट व्यवस्थित बनवून ठेवणे महत्त्वाचे असून त्यानुसारच खर्च करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही नको त्या गोष्टींवर होणारा खर्च टाळू शकतात व कोणत्या ठिकाणी किती खर्च करायचा आहे तुम्हाला कळते.
5- आवक पेक्षा जावक जास्त– याचाच अर्थ तुमचे जेवढे उत्पन्न आहे त्यापेक्षा तुमचा खर्च जास्त होत असेल तर मात्र तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दबू शकतात. त्यामुळे तुम्हाला जर उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करण्याची सवय असेल तर ती त्वरित बंद करणे गरजेचे आहे.
6- नको त्या ठिकाणी गुंतवणूक करणे– बरेच व्यक्ती व्यवस्थित माहिती न घेता गुंतवणूक करतात व स्वतःचे नुकसान करून घेतात.कोणी सांगितले म्हणून कुठेही पैसे गुंतवणे बंद करणे गरजेचे आहे.
अशी केलेली गुंतवणूक तुमचे आर्थिक नुकसान करू शकते. याकरिता तुम्हाला ज्या ठिकाणी गुंतवणूक करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही घेणे गरजेचे आहे. तरच गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.
7- विमा पॉलिसी खरेदी न करणे– आयुष्यामध्ये जीवन विमा पॉलिसी घेणे खूप गरजेचे आहे. जीवन जगत असताना कुठली वेळ कोणत्या प्रकारची येईल याची आपल्याला काहीच कल्पना नसते.
त्यामुळे अचानक येणाऱ्या परिस्थितीशी आपल्याला तोंड देता यावे म्हणून जीवन विमा पॉलिसी घेऊन ठेवणे फायद्याचे ठरेल. त्यामुळे जीवन विमा वेळेत घ्यावा आणि कुटुंबाचे आर्थिक संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलावे.
8- कर्ज घेण्याची सवय– तुमचा जो काही खर्च आहे त्यावर मर्यादा ठेवणे गरजेचे आहे. स्वतःच्या खर्चावर मर्यादा न ठेवता खर्च करत सुटणे व खर्चासाठी कर्ज घेणे ही सवय खूप घातक ठरू शकते.
अशी सवय जर तुम्हाला असेल तर तुम्ही आर्थिक प्रगती करू शकत नाहीत.आवश्यक गोष्टीसाठी कर्ज घेणे गरजेचे असतेच परंतु कर्ज तेवढेच घ्यावे जितके आपल्याला सहजपणे फेडता येणे शक्य होईल. परंतु अनावश्यक गोष्टींचा खर्चासाठी कर्ज घेणे टाळावे.
9- सट्टेबाजीची सवय– बऱ्याचदा कमीत कमी वेळेत जास्त पैसे मिळावे याकरिता नको त्या गोष्टी करण्याची सवय असते. यामध्ये प्रामुख्याने सट्टेबाजीची सवय खूप घातक ठरते.
पैसा कमावण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात व त्यामुळे सट्टेबाजी सारख्या गोष्टींमध्ये पैसा वाया घालवणे टाळले पाहिजे व चांगल्या ठिकाणी पैसा गुंतवला गेला पाहिजे. त्यामुळे जुगार किंवा सट्टेबाजीची सवय असेल तर ती सोडणे खूप फायद्याचे ठरेल.
10- आरोग्य विमा– आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये कोणत्या वेळेस आरोग्याच्या समस्या उद्भवतील व किती खर्च करावा लागेल याची कुठलीही गॅरंटी आपण घेऊ शकत नाही.
त्यामुळे आरोग्य विमा घेऊन ठेवणे फायद्याचे ठरते. यामुळे तुम्ही हॉस्पिटलचा खर्च पूर्ण करू शकतात व तुमच्या वरील आर्थिक भार कमी होतो. तसेच आर्थिक अडचण आली तरी तुमची बचत आहे तशीच राहते.