Fish Farming:- कृषी क्षेत्राबरोबर पूर्वापार भारतातील शेतकरी पशुपालना सारखा जोडधंदा करत आले असून याव्यतिरिक्त शेळीपालन आणि मेंढी पालन सारखे व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणावर भारतात केले जातात. तसेच आता बदलत्या परिस्थितीनुसार कुक्कुटपालन, मत्स्यपालनासारखे व्यवसाय देखील व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर भारतातील शेतकरी करत असून वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापराने यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रगती केली आहे.
एवढेच नाही तर या जोडधंद्यांना आर्थिक दृष्टिकोनातून प्रोत्साहन मिळावे म्हणून देखील शासनाच्या अनेक योजना कार्यान्वित आहेत. यामध्ये जर आपण मत्स्यपालनाचा विचार केला तर या व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करण्यात येत असून याकरिता महत्वाचे म्हणजे शासनाकडून पिंजरा मत्स्यसंवर्धन संकल्पना पुढे येऊ लागली असून शासनाच्या मत्स्यपालन विभागाकडून ही योजना सध्या राबविण्यात येत आहे.
कसे आहे या योजनेचे स्वरूप?
जर आपण मत्स्यसंवर्धनाची बंदिस्त पिंजरा पद्धत पाहिली तर ही उच्च तंत्रज्ञानावर आधारित पद्धत आहे व या पद्धतीचा वापर करून जर शेतकऱ्यांनी मत्स्य पालन व्यवसाय केला तर यामधून माशांचे चांगले उत्पादन मिळू शकते. या योजनेच्या माध्यमातून पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन प्रकल्प उभारून या क्षेत्रात जास्तीत जास्त रोजगाराची निर्मिती करण्याचा उद्देशाने राज्यातील मत्स्य उत्पादनात वाढ करण्यासाठी या योजनेला चालना देण्यात आली आहे.
राज्यामध्ये जे काही जलाशय आणि तलाव आहेत व ते मत्स्यव्यवसाय आयुक्तालयाच्या अधिनस्त आहेत अशा तलाव किंवा जलाशयामधील पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्पांचे जबाबदारी ही मत्स्यव्यवसाय आयुक्तालयाची असेल तर जे तलाव किंवा जलाशय महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास महामंडळाच्या अखत्यारीत आहेत असे तलाव किंवा जलाशयांमधील पिंजरा मच्छसंवर्धन प्रकल्पांची जबाबदारी महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाची आहे.
या योजनेनुसार लाभार्थी निवडीबाबत प्राधान्यक्रम
1- त्यामध्ये स्थानिक मच्छीमारांची प्राथमिक मच्छीमार सहकारी संस्था
2- स्थानिक आदिवासी मच्छीमारांचे प्राथमिक मच्छीमार सहकारी संस्था
3- प्रकल्पग्रस्तांना पर्यायी क्षेत्र जमीन किंवा मोबदला देण्यात आलेला नाही अशा प्रकल्पग्रस्तांची प्राथमिक मच्छीमार सहकारी संस्था
अशा पद्धतीने लाभार्थी निवडीबाबत प्राधान्यक्रम आहे.
काय आहे अर्जदारांसाठी आवश्यक पात्रता?
या अनुदान योजनेतील लाभार्थ्यांनी आवश्यक असलेल्या पिंजरा संख्येच्या क्षमतेनुसार पिंजऱ्यांची उभारणी केल्यानंतर लाभार्थ्याला व्यवसाय वाढवायचा असेल तर विनाअनुदानित पिंजरा उभारणी करता अर्ज करणे आवश्यक राहील. त्यासोबतच विनाअनुदानित योजनेतील लाभार्थ्यांनी आवश्यक असलेल्या पिंजऱ्यांच्या संख्येच्या पूर्ण क्षमतेनुसार पिंजऱ्याची उभारणी केल्यानंतर सुद्धा सदर लाभार्थ्याला व्यवसाय वाढवायचा असेल तर त्याला अनुदानित पिंजरा उभारणी करता अर्ज करणे अनुज्ञेय राहील.
तसेच वैयक्तिक अर्जदार असेल तर त्याचे वय किमान 18 ते कमाल 60 वर्षे या वयोगटात असणे गरजेचे आहे. त्यासोबतच पदव्युत्तर पदवीधर, पदवी, मत्स्य विज्ञान क्षेत्रातील पदविका, त्यासोबतच शासनमान्य संस्था जसे की सीआयएफई, सीआयएफआरआय व मत्स्य महाविद्यालय इत्यादींच्या माध्यमातून अल्प कालावधी करिता प्रशिक्षण अशा प्रकारचे उच्च शिक्षण घेतले असेल तर अशा व्यक्तींना या योजनेत प्राधान्य दिले जाईल.
महत्वाचे म्हणजे यामध्ये वैयक्तिक लाभार्थी/ मच्छीमार सहकारी संस्था/ संघ मच्छीमार स्वयंसहायता गट/ संयुक्त दायित्व गट हे मत्स्यव्यवसाय विभागाचे थकबाकीदार नसावे. इत्यादी पात्रतेसाठी अटी आहेत.
अधिक माहिती करिता या संकेतस्थळावर साधा संपर्क
https://fisheries.maharashtra.gov.in/culture या संकेतस्थळावर तुम्ही संपर्क साधून या योजनेविषयी पूर्ण माहिती घेऊ शकतात.