Bank of Maharashtra : दिवाळीपूर्वीच अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांना ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे यावेळी सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने देखील आपल्या ग्राहकांना दिवाळीपूर्वी खास भेट दिली आहे. या बँकेत एफडी करणाऱ्या ग्राहकांना मिळणाऱ्या व्याजदरात वाढ झाली असून हे नवे दरही १२ ऑक्टोबरपासून लागू करण्यात आले आहेत. तुम्ही देखील सध्या एफडी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे.
किती वाढ करण्यात आली ?
बँक ऑफ महाराष्ट्रने मुदत ठेवींमध्ये १.२५ टक्क्यांनी वाढ केली आहे. FD सोबतच बँकेच्या इतर काही योजनांवरही नवीन व्याजदर लागू होतील. यामध्ये 46 ते 90 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात 1.25 टक्के वाढ करण्यात आली आहे. नवीन दर लागू झाल्यानंतर एक वर्ष कालावधीच्या ठेवींवर 6.50 टक्के दराने व्याज दिले जाईल.
एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी उपलब्ध व्याजदरात 0.25 टक्के वाढ करण्यात आली आहे. जो आता 6.25 टक्के करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर मिळणाऱ्या व्याजात ०.५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना 200 ते 400 दिवसांच्या कालावधीसाठी 7.5 टक्के वार्षिक व्याज दिले जाईल. अल्प मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या ठेवींवर बँकेकडून चांगले व्याज दिले जात आहे.
या बँकांनीही एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे
बँक ऑफ बडोदानेही दिवाळीपूर्वी व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने एक वर्ष ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी FD योजनांवरील व्याजदरात 50 bps ने वाढ केली आहे. दोन वर्षे ते तीन वर्षे कालावधीच्या FD वर 7.25 दराने व्याज दिले जात आहे. यापूर्वी हा दर ७.०५ टक्के होता. या बँकेने ‘तिरंगा प्लस – 399 दिवस’ योजनेसाठी उपलब्ध असलेले व्याजदर कमी केले आहेत. जे आता 7.15 टक्के झाले आहे.