Food in Trains : तुम्ही देखील लांबच्या प्रवासासाठी ट्रेनचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. लांबचा प्रवास असेल तर बरेचजण रेल्वेकडून उपलब्ध असलेले जेवण मागवतात. पण, हे जेवण सर्वांच्या पसंतीस पडतं असं नाही. अनेकदा रेल्वेत खराब जेवण भेटते त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. अशास्थितीत आता रेल्वेकडून एक नियम जारी करण्यात आला आहे. त्याअंतर्गत प्रवाशांना खराब अन्न भेटले तर मोठा दंड आकारण्यात येणार आहे.
आता ट्रेनमध्ये खराब अन्न भेटल्यास 2.5 लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे. प्रवाशांच्या आरोग्याबाबत आता रेल्वे प्रशासनही जागरुक झाले आहे. अशास्थितीत ट्रेन आणि प्लॅटफॉर्मवर दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये दोष आढळून आल्यास मोठा दंड आकारण्यात येणार आहे. या अंतर्गत खराब जेवणाबाबतची तक्रार खरी असल्याचे आढळून आल्यास 2.5 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाईल आणि केटरिंग कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात येईल.
नवीन नियम काय सांगतो?
आता नॉनव्हेज ट्रे लाल असेल, तर व्हेज ट्रे हिरवा असेल. ट्रेनमध्ये व्हेजऐवजी नॉनव्हेज जेवण दिल्यास कंपनीचा केटरिंग कॉन्ट्रॅक्ट रद्द केला जाईल. जर खाद्यपदार्थात केस आढळून आल्यास, प्रमाण कमी असल्यास, विक्रेत्याने विनयशीलता दाखवली नाही, असभ्य भाषा वापरली असेल किंवा प्रवाशाशी हाणामारी केली असेल तर कंपनीला अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावला जाईल आणि केटरिंगचा करार देखील रद्द केला जाईल.
2017 च्या खानपान धोरणाऐवजी रेल्वे बोर्डाने 14 नोव्हेंबर रोजी नवीन धोरण लागू केले आहे. यामध्ये रेल्वे प्रवाशांना स्वच्छ, चविष्ट, ताजे आणि ब्रँडेड खाद्यपदार्थ गाड्यांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे. घाणेरडा गणवेश, वैयक्तिक स्वच्छता आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे केटरिंग कंपनीला चौथ्यांदा अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असून पाचव्यांदा चुकांची पुनरावृत्ती झाल्यास करार रद्द करण्यात येणार आहे.
नव्या धोरणात प्रवाशांच्या तक्रारीवरून कंत्राटदाराला आकारण्यात येणाऱ्या दंडाची चार श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. थंड-शिळे अन्न, अन्नाचे खराब सादरीकरण आणि विलंब यासाठी पहिल्या घटनेसाठी 5,000 रुपये आणि पाचव्या घटनेसाठी 25,000 रुपये दंडाची तरतूद आहे. तर उर्वरित श्रेणींमध्ये चार प्रकरणांमध्ये मोठा दंड आणि पाचव्या प्रकरणात करार रद्द करण्याची तरतूद आहे. खाद्यपदार्थात सरडा किंवा उंदीर आढळल्यास किंवा प्रवाशाला ते खाल्ल्यानंतर रुग्णालयात दाखल करावे लागल्यास पहिल्या प्रकरणात 5 लाख रुपये दंड आकारला जाईल आणि दुसऱ्यांदा करार रद्द केला जाईल.
नवीन केटरिंग पॉलिसीमध्ये विक्रेत्यांच्या गणवेशावर नावाची पाटी असेल. एकसमान स्मायली इमोजी असतील. कंपनीचे नाव आणि मोबाईल नंबर ट्रेवर असेल. त्यामुळे प्रवाशांना तक्रार करता येणार आहे. खाद्यपदार्थांच्या पाकिटांवर QR कोड आणि दर लिहिलेले असतील. तसेच खाद्यपदार्थ अधिक एमआरपीने आकारला जाणार नाही. ऑर्डर केलेल्या खाद्यपदार्थातील अतिरिक्त वस्तूंसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. या सर्व तक्रारी रेल्वेच्या सेंट्रलाइज्ड हेल्प अॅपवर करता येतील. याशिवाय रेल्वे एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना तक्रार करता येणार आहे.
नवीन धोरणात रेल्वे केटरिंगवरील विशिष्ट कंपनीची मक्तेदारी संपवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रत्येक मोठ्या रेल्वे मार्गावर दोन प्रकारच्या केटरिंग कंपन्यांना कंत्राट दिले जाणार आहे. याशिवाय कंत्राट घेणारी कंपनी दुसऱ्या कंपनीला सब-लेट करू शकणार नाही. रेल्वेच्या सूचनेनुसार कंत्राटदाराला स्वखर्चाने प्रमुख रेल्वे मार्गांवर अत्याधुनिक बेस किचन बांधावे लागणार आहेत. येथे ब्रँडेड पदार्थांसह अन्न शिजवले जाईल. त्यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून ऑनलाइन नजर ठेवली जाणार आहे.