केंद्र सरकारच्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांना व्यवसाय उभारण्याकरिता विविध योजनांअंतर्गत कर्ज दिले जाते.तसेच काही योजनांच्या माध्यमातून अनुदान देखील मिळते.साहजिकच अशा योजनांचा फायदा घेऊन महिला किंवा पुरुषांना स्वतःचा व्यवसाय उभारता येतो आणि स्वतःच्या पायावर उभे राहता येते व आर्थिक दृष्टिकोनातून स्वावलंबी देखील होता येते.
जर आपण केंद्र सरकारच्या योजना पाहिल्या तर यामध्ये 2015 मध्ये सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री मुद्रा योजना खूप महत्वपूर्ण असून या योजनेच्या माध्यमातून देशातील छोटे व्यापारी तसेच रस्त्यावरील विक्रेते आणि छोटी दुकाने उघडणाऱ्या व्यवसायिकांना खूप मोठा फायदा झालेला आहे.
तसेच महिला उद्योजक घडवण्याच्या दृष्टिकोनातून देखील ही योजना महत्वपूर्ण आहे. या योजनेच्या अंतर्गत दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सुविधा उपलब्ध असून विविध व्यवसाय करिता कर्ज सुविधा मिळते.
मुद्रा योजना म्हणजे नेमके काय?
मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत कर्ज योजना असून केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत व्यक्ती तसेच एसएमई आणि एमएसएमई यांना कर्ज देण्यात येते. या माध्यमातून तीन प्रकारची कर्ज देण्यात येतात. एक म्हणजे शिशु,
किशोर आणि तरुण अशा तीन प्रकारांमध्ये कर्जाची विभागणी केलेली असते. यामध्ये जास्तीत जास्त दहा लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाते. या योजनेची वैशिष्ट्य म्हणजे या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी बँकेकडे कुठल्याही प्रकारची सुरक्षा म्हणजेच तारण देण्याची गरज नाही. हे कर्ज पाच वर्षासाठी फेडता येते.
मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्या व्यवसायासाठी कर्ज दिले जाते?
1- व्यवसायिक वाहनांसाठी– या योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर तसेच ऑटो रिक्षा, टॅक्सी, ट्रॉली,टीलर, मालवाहतूक करणारी वाहने तसेच तीन चाकी वाहने, ई रिक्षा यासारखी व्यावसायिक वाहतूक आणि खरेदी करण्यासाठी कर्ज मिळते.
2- सेवा क्षेत्र– सेवा क्षेत्रामध्ये सलून, जिम, टेलरिंगची दुकाने, वैद्यकीय दुकाने, रिपेरिंग शॉप, ड्राय क्लीनिंग आणि फोटोकॉपी चे दुकाने उघडण्यासाठी कर्ज मिळते.
3- अन्न आणि वस्त्र क्षेत्र– यामध्ये पापड तसेच लोणचे, आईस्क्रीम, बिस्किटे,जॅम, जेली आणि मिठाई बनवणे यासारखे अनेक उद्योगांचा यामध्ये समावेश होतो.
4- कृषी संबंधित– कृषी चिकित्सालय आणि कृषी व्यवसाय केंद्र, अन्न आणि कृषी प्रक्रिया युनिट, कुक्कुटपालन, मत्स्य पालन, मधमाशी पालन, पशुपालन, शेतमालाच्या प्रतवारीशी संबंधित व्यवसाय, दुग्ध व्यवसाय तसेच मत्स्य व्यवसायासाठी कर्ज मिळते.
किशोर आणि तरुण या गटातील व्यक्तींना कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1- ओळखीचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट
2- पत्त्याचा पुरावा म्हणून नवीनतम टेलिफोन बिल, मालमत्ता कर पावती, मतदार ओळखपत्र, विज बिल, आधार कार्ड आणि मालक किंवा भागीदारांचे पासपोर्ट
3- एससी / एसटी / ओबीसी/ अल्पसंख्यांक प्रमाणपत्र
4- 6 महिन्याचे बँकेचे स्टेटमेंट
5- आयकर रिटर्नसह मागील दोन वर्षाचा ताळेबंद
6- पुढील एक वर्षासाठीचा अंदाजित ताळेबंद
7- व्यवसायाचा प्रकल्प अहवाल म्हणजेच प्रोजेक्ट रिपोर्ट
8- दोन भागीदार किंवा मालक किंवा संचालकांच्या दोन फोटोकॉपी
मुद्रा फायनान्स मंजूर होण्यासाठी किती कालावधी लागतो?
साधारणपणे खाजगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि नॉन बँकिंग फायनान्स कंपनी अर्थात एनबीएफसी यांच्या माध्यमातून सुमारे सात ते दहा कामकाजाच्या दिवसात कर्ज मंजूर केले जाते. विद्यमान व्यवसाय आणि नोकरदार लोकांना मुद्रा योजनेअंतर्गत व्यवसाय कर्जासाठी अर्ज करण्याकरिता मागील वर्षाचा आयटीआर सादर करावा लागतो.
महिला वर्गाकरिता मुद्रा योजनेद्वारे कर्ज कसे मिळेल?
या योजनेअंतर्गत महिलांना बँका आणि एनबीएफसी आणि सूक्ष्म वित्त संस्थांच्या अंतर्गत कमी व्याजदरात तारण मुक्त व्यवसाय कर्ज मिळते. या योजनेअंतर्गत महिला उद्योजकांसाठी कमाल दहा लाख रुपयापर्यंत कर्ज मिळते व ज्याची परतफेड कालावधी पाच वर्षाचा असतो. विशेष म्हणजे महिला उद्योजकांसाठी मंजूर केलेल्या कर्जाच्या रकमेवर कमीत कमी किंवा शून्य प्रक्रिया शुल्क आकारले जाते.
महिलांसाठी आहे स्वतंत्र विशेष मुद्रा कर्ज योजना
युनायटेड महिला उद्योग योजना ही खास महिला व्यवसायिकांसाठी असून योजना मुद्रा कर्ज योजनेचा भाग आहे. या अंतर्गत महिलांना उत्पादन किंवा सेवेचे संबंधित व्यवसायात असलेल्या महिलांना या माध्यमातून अर्ज करता येतो. यामध्ये ज्या महिलांची संबंधित कंपनीत 50 टक्के पेक्षा जास्त आर्थिक भागीदारी आहे अशा महिलांना या श्रेणी अंतर्गत मुद्रा कर्जासाठी अर्ज करता येतो.
काय आहे मुद्रा कार्ड?
मुद्रा कार्ड हे एक डेबिट कार्ड असून जे मुद्रा कर्जदारांना त्यांच्या व्यवसायाच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जारी करण्यात आलेले आहे. तेव्हा मुद्रा लोन मंजूर केले जाते तेव्हा बँक कर्जदारांसाठी मुद्रा कर्ज खाते उघडते आणि डेबिट कार्ड देखील जारी करते.