Gold monetization Scheme:- बरेच व्यक्ती कमावलेल्या पैशांची बचत करतात व वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवणूक करून आर्थिक दृष्टीने भविष्य समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असतात. गुंतवणूक करण्याचे पर्याय पाहिले तर प्रामुख्याने म्युच्युअल फंड एसआयपी, शेअर बाजार आणि इतर अनेक गुंतवणूक योजनांमध्ये तसेच प्रामुख्याने बँकांमध्ये मुदत ठेव म्हणजेच फिक्स डिपॉझिट इत्यादी पर्यायांमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य दिले जाते.
तसेच गुंतवणूकदारांचा जर गुंतवणुकीचा एक आवडीचा पर्याय पाहिला तर ते म्हणजे सोन्याची खरेदी होय. बरेच जण सोन्यामध्ये देखील गुंतवणूक करतात. परंतु जर सोन्याच्या माध्यमातून तुम्हाला पैसे उभा करायचे असतील तर तुम्हाला ते एक तर सोने विकून पैसा उभा करता येतो किंवा त्यावर गोल्ड लोन घेऊन पैसा कमावता येतो.
परंतु सरकारची अशी एक योजना आहे की ज्या माध्यमातून तुम्ही तुमच्या घरातील सोन्याच्या माध्यमातून दर महिन्याला चांगला पैसा मिळवू शकतात. नेमकी ही सरकारची योजना काय आहे? याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.
काय आहे सुवर्णमुद्रीकरण योजना?
गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम अर्थात सुवर्णमुद्रीकरण योजना ही साधारणपणे 2015 मध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीला त्यांच्याकडे असलेले सोन्याचे दागिने, सोन्याचे बार किंवा कॉइन्स बँकेत जमा करता येतात व या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
या योजनेच्या माध्यमातून जे सोने बँकांकडे जमा केले जाते त्याला सरकारकडून व्याजाची गॅरंटी मिळत असते. या जमा केलेल्या सोन्यावर दरवर्षी व्याज मिळत असते. महत्वाचे म्हणजे सोन्याचा दर देखील बाजारभावाप्रमाणे वाढत जातो. जेव्हा ही योजना परिपक्व होते आणि तेव्हा जर सोन्याचे दर वाढलेले राहिले तर वाढलेल्या किमती बरोबरच तुम्हाला प्रत्येक वर्षाला व्याज देखील मिळते. या योजनेचा कालावधी किती आहे त्यानुसार यावर व्याज मिळत असते.
किती मिळते या माध्यमातून व्याज?
या योजनेमध्ये तुम्ही किती कालावधी करिता गुंतवणूक करत आहात त्यानुसार व्याज ठरत असते. या योजनेचे स्वरूप पाहिले तर ही योजना तीन भागांमध्ये विभागलेली आहे. यातील पहिला म्हणजे शॉर्ट टर्म बँक डिपॉझिट योजनेच्या माध्यमातून एक ते तीन वर्षाकरिता या योजनेचा लाभ घेता येतो.
यावर बँक आपल्या पद्धतीने व्याज देत असते. दुसरा प्रकार म्हणजे मिडीयम टर्म साठी पाच ते सात वर्षापर्यंत आपण सोने जमा करू शकतो व यावर वर्षाला 2.25 टक्के एवढे निश्चित व्याज मिळते. तिसरा प्रकार म्हणजे लॉन्ग टर्म असून या योजनेत आपण 12 ते 15 वर्षाकरिता सोने जमा करू शकतात व यावर तुम्हाला एका वर्षाला 2.50 टक्क्यांपर्यंत निश्चित व्याज मिळत असते.
अशा पद्धतीने घ्या या योजनेचा लाभ
तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर याकरिता तुम्हाला बँकेमध्ये जाऊन गोल्ड डिपॉझिट अकाउंट ओपन करणे गरजेचे आहे व त्यानंतर केवायसी पूर्ण करावी लागते. त्यानंतर बँकेकडून ग्राहकांसमोर सोन्याच्या शुद्धतेची तपासणी केली जाते आणि 995 गोल्ड फिटनेस सर्टिफिकेट देखील दिले जाते.
ही प्रक्रिया झाल्यानंतर बँकेच्या माध्यमातून संबंधित ग्राहकाला त्याच दिवशी अथवा 30 दिवसांच्या आत मध्ये शॉर्ट टर्म अथवा मिड टर्म डिपॉझिट योजनेचे सर्टिफिकेट देखील मिळते. या योजनेमध्ये जे तुम्ही सोने जमा करतात त्या सोन्यावर तीस दिवसानंतर तुम्हाला व्याज मिळायला सुरुवात होते. एक तोळे म्हणजेच कमीत कमी दहा ग्रॅम सोन्यापासून तुम्ही या योजनेत सुरुवात करू शकतात. जास्तीत जास्त कुठलेही प्रकारची मर्यादा नाही.
योजना परिपक्व झाल्यानंतर तुम्हाला पैसे मिळतात की सोने
या योजनेमध्ये जेव्हा योजना परिपक्व होते तेव्हा ग्राहकांना जमा केलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या बदल्यामध्ये रोख रक्कम मिळते. परंतु जर ग्राहकांनी अल्पमुदतीचा पर्याय निवडला असेल तर ग्राहकांना परिपक्वतेनंतर दागिने अथवा पैसे घेण्यासंदर्भातला पर्याय दिला जातो. याशिवाय मध्यम आणि दीर्घ मुदतीचा पर्याय निवडला असेल तर योजनेच्या परिपक्वतेवर सोने ऐवजी त्या सोन्याच्या किमती एवढे पैसे मिळतात.
( टीप– गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.)