आर्थिक

तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतीला किती निधी आला आणि कुठे खर्च केला? जाणून घेण्यासाठी वापरा ‘ही’ सोपी पद्धत

E-Swaraj Application:- ग्रामीण भागाचा विकास हा खूप महत्त्वपूर्ण असून ग्रामीण भागाचा जर सर्वांगीण विकास झाला तर पर्यायाने देशाचा विकास होतो. भारताला खेड्याचा देश असे म्हटले जाते व मोठ्या प्रमाणावर भारताची लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते. त्यामुळे या दृष्टिकोनातून ग्रामीण भागाचा विकास होणे खूप गरजेचे आहे व ग्रामीण भागाचा विकासाची जबाबदारी ही त्या त्या गावाच्या ग्रामपंचायतीची असते.

आपल्याला माहित आहे की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक कामे केले जातात व त्यासाठी आवश्यक असणारा निधी राज्य तसेच केंद्र सरकार व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिला जातो. जर आपण बघितले तर गावांच्या विकासासाठी केंद्र तसेच राज्य सरकार व इतर अशा मिळून सुमारे 1140 योजना राबवल्या जातात.

परंतु यामध्ये गावाची लोकसंख्या तसेच जिल्हा व भौगोलिक क्षेत्र यावर संबंधित गावासाठी कोणती योजना फायद्याची ठरू शकते हे ठरवले जात असते. परंतु गावच्या ग्रामपंचायतीसाठी नेमका निधी किती आला आणि कोणत्या कामांसाठी आला व ग्रामपंचायतीने किती निधी खर्च केला याबाबत मात्र आपल्याला काहीच कळत नाही.

या अनुषंगाने एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य असते की या गोष्टी आपल्याला माहीत असणे महत्त्वाचे असते. त्यामुळे या लेखामध्ये आपण ग्रामपंचायतींना आलेला निधी आणि झालेला खर्च कसा माहिती करून घ्यावा? याबद्दलची माहिती थोडक्यात बघणार आहोत.

ग्रामपंचायत कशा पद्धतीने करते निधीची मागणी?
प्रत्येक वर्षाच्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये ग्रामविकास समितीची एक बैठक घेतली जात असते. या बैठकीमध्ये शिक्षण तसेच गावातील सोयीसुविधा, आरोग्य इत्यादी बाबत चर्चा होते. या बैठकीमध्ये गावाच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे किती निधी शिल्लक आहे आणि कराव्या लागणाऱ्या कामांसाठी किती निधीची गरज भासेल?

याचा अंदाज बांधून एक अंदाजपत्रक तयार केले जाते व हे अंदाजपत्रक पुढे पंचायत समितीकडे पाठवले जाते आणि पंचायत समिती ते राज्य सरकारकडे मंजुरी करिता पाठवते. यामध्ये जवळपास केंद्र ते राज्य सरकार व इतर अशा मिळून साधारणपणे 1140 योजना एका गावासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

परंतु यामधून गावाची लोकसंख्या व जिल्हा तसेच भौगोलिक क्षेत्रानुसार कोणती योजना फायद्याची ठरेल हे ठरवले जाते. गावासाठी जर राज्य सरकारची योजना असेल तर शंभर टक्के निधी दिला जातो. परंतु जर केंद्र सरकारची योजना असेल तर गावाला केंद्राकडून 60%,राज्य सरकारकडून 40% असा निधी मिळत असतो.

इतकेच नाही तर पंधराव्या वित्त आयोगानुसार बघितले तर गावातील प्रत्येक व्यक्तीकरिता सरकार प्रतिवर्षी 957 रुपये गावाला देत असते. यामध्ये 50% स्वच्छता आणि पाणीपुरवठा व उर्वरित 50 टक्के इतर बाबींवर खर्च करण्यात येतो.

गावाला किंवा ग्रामपंचायतीला किती निधी मिळाला हे कसे माहिती कराल?
ग्रामपंचायत साठी सरकारने किती निधी दिला आहे?ग्रामपंचायतीचा सरपंच आणि ग्रामपंचायतीने तो निधी कोणत्या कामांकरिता आणि कशा पद्धतीने वापरला?हे तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल तर त्याकरिता तुमच्या मोबाईल वरील प्ले स्टोअरवर जाऊन ई ग्राम स्वराज्य हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यावे.

त्यानंतर या एप्लीकेशनमध्ये अगोदर राज्य त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये तुमचा जिल्हा, ब्लॉक पंचायतमध्ये तालुका आणि व्हिलेज पंचायतमध्ये तुमचे गाव अशा पद्धतीने नाव निवडावे व त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करावे.

तेव्हा तुम्ही सबमिट बटनावर क्लिक करता तेव्हा एक नवीन पेज ओपन होते व या नवीन ओपन झालेल्या पेजवर तुम्हाला तुमच्या गावच्या कोड नंबरसह आर्थिक वर्षाची माहिती दिसते.

यामध्ये तुम्हाला कोणत्या वर्षाची माहिती पाहिजे आहे या वर्षावर क्लिक करून तुम्ही त्या वर्षाची सगळी माहिती पाहू शकता. तसेच या ॲप्लिकेशनमध्ये असलेल्या ER डिटेल्स यामध्ये निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची माहिती, Aporoved activites मध्ये कोणत्या कामासाठी किती निधी मंजूर करण्यात आला याची माहिती तुम्हाला मिळते

आणि फायनान्शिअल प्रोग्रेस यामध्ये गावाच्या आर्थिक प्रगतीची माहिती तुम्हाला मिळते. यानंतर तुम्ही Receipt या पर्यायासमोर तुम्हाला गावासाठी किती निधी आला आणि expenditire यामध्ये तुम्हाला कोणत्या कामासाठी किती खर्च झाला याची तपशीलवार माहिती मिळते.

बऱ्याचदा सरकारकडून आलेला निधी जर खर्च झाला नाही तर तो निधी पुन्हा सरकार दरबारी परत जातो. या प्रकारे ग्रामपंचायतीला मिळालेला निधी जर परत गेला तर याचा अर्थ सरपंच अकार्यक्षम आहे असे मानले जाते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts