FD Rules : अनेक ग्राहकांची बँकांमध्ये बचत खाती आहेत, ग्राहक त्यांच्या सोयीनुसार बँकामध्ये एफडी देखील करतात. पण समजा तुमचा पैसा ज्या बँकेत जमा आहे ती बँक दिवाळखोर झाली तर तुमच्या पैशाचे काय होईल? तसेच बँका डबघाईला का येतात? आज याबद्दल जाणून घेणार आहोत.
जेव्हा बँकेचे दायित्व तिच्या मालमत्तेपेक्षा जास्त होते आणि गुंतवणूकदार त्यांचे पैसे काढू लागतात तेव्हा बँकेची आर्थिक स्थिती बिघडते. अशा परिस्थितीत बँकेची अवस्था बिकट होऊन ग्राहकांप्रती असलेली जबाबदारी पार पाडण्यात बँक असमर्थ ठरते. अशा परिस्थितीत बँक दिवाळखोर घोषित केली जाते. याला बँक बुडणे म्हणतात.
बँका का बुडतात?
बँका ग्राहकांच्या पैशावर चालतात. बँका ग्राहकांना त्यांच्या ठेवींवर व्याज देतात आणि कर्ज देऊन आणि उच्च व्याजदर असलेल्या रोख्यांमध्ये पैसे गुंतवून पैसे कमवतात. मात्र जेव्हा ग्राहकांचा बँकेवरील विश्वास उडू लागतो तेव्हा ते बँकेतून पैसे काढू लागतात. अशा परिस्थितीत बँकेसमोर मोठी आर्थिक स्थिती निर्माण होते.
म्हणजे अशा वेळी बँकेला ग्राहकांचे पैसे परत करण्यासाठी गुंतवलेले रोखे विकावे लागतात. त्यामुळे बँकेतील आर्थिक संकट अधिकच गडद होते. पण बँका बुडाल्या तर तुमच्या पैशांचे काय होते जाणून घेऊया…
बँक दिवाळखोर झाल्यास, ग्राहकांना त्यांच्या ठेवींवर ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कायद्यांतर्गत विमा संरक्षण मिळते. पूर्वी बँक ठेवींवर ठेव विमा 1 लाख रुपये होता, परंतु आता तो 5 लाख रुपये करण्यात आला आहे, म्हणजेच बँक कोसळल्यानंतरही, 5 लाख रुपयांची सुरक्षित रक्कम ग्राहकांना परत केली जाईल.
सोप्या भाषेत सांगायचे तर 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी बँकेत पूर्णपणे सुरक्षित राहतील आणि बँक दिवाळखोरीत निघाली तरी खातेदाराचे पैसे सुरक्षित राहतात.