आर्थिक

Business Idea: पेट्रोल पंप कसा सुरू करावा? लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया कशी आहे व नफा किती असतो? वाचा माहिती

Business Idea:- अनेक प्रकारचे व्यवसाय असतात व या व्यवसायांमध्ये काही व्यवसाय सुरू करण्यासाठी कमीत कमी गुंतवणूक आणि जागा देखील खूप कमी लागते तसेच कुठल्याही प्रकारच्या परवानगी घेण्याची गरज नसते. परंतु काही व्यवसाय असे असतात की याकरिता लाखो रुपयांची गुंतवणूक करणे गरजेचे असते व त्याकरिता जागा व इतर बाबींची पूर्तता तसेच परवाना देखील लागतो.

याच प्रकारातला एक व्यवसाय म्हणजे पेट्रोल पंप व्यवसाय होय.हा व्यवसाय एक चांगला नफा देणारा व्यवसाय आहेच परंतु यासाठी लागणारी गुंतवणूक देखील महत्त्वाची असून काही आवश्यक परवाने मिळवणे देखील गरजेचे असते. याचा अनुषंगाने या लेखांमध्ये आपण पेट्रोल पंप कसा सुरू करावा व त्यासाठीची प्रक्रिया कशी असते? याबद्दलची महत्त्वाची माहिती घेऊ.

 पेट्रोल पंप कुणाला सुरू करता येऊ शकतो?

सार्वजनिक व खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून पेट्रोल पंप सुरू करण्याकरिता परवाने दिले जातात व या कंपन्या म्हणजे बीपीसीएल, एचपीसीएल, आयओसीएल, रिलायन्स तसेच एस्सार ऑइल यांचा यामध्ये समावेश होतो. 21 वर्ष ते 55 वर्ष वयातील कोणत्याही भारतीय व्यक्तीला पेट्रोल पंप सुरू करता येऊ शकतो.

याकरिता काही शैक्षणिक अटी असून त्यामध्ये तुम्ही जर शहरी भागामध्ये पेट्रोल पंप सुरू करत असाल तर त्याकरिता  शिक्षणाची अट ही किमान बारावी पास आणि ग्रामीण भागात जर पेट्रोल पंप सुरू करायचा असेल तर त्याकरिता शैक्षणिक अट ही दहावी पास अशी आहे.

 पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी किती पैसे गुंतवावे लागतात?

जर नफ्याच्या दृष्टिकोनातून या व्यवसायाचा विचार केला तर हा मोठ्या प्रमाणावर नफा देणारा व्यवसाय आहे व त्यामुळे साहजिकच या व्यवसायातील गुंतवणूक देखील खूप मोठी असते. आपण काही रिपोर्टचा आधार घेतला तर त्यानुसार ग्रामीण भागामध्ये पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी किमान 15 लाख तर शहरी भागात सुरू करण्याकरिता किमान तीस ते पस्तीस लाख रुपये इतका खर्च येतो.

 पेट्रोल पंप कसे दिले जातात?

यामध्ये ज्या काही पेट्रोलियम कंपन्या आहेत ते त्यांच्या फिल्ड टीमच्या माध्यमातून जो काही रिसर्च तयार करण्यात येतो त्या माध्यमातून पेट्रोल पंप सुरू करायचा की नाही याचा निर्णय घेते. एखाद्या ठिकाण व्यवसाय करण्यासाठी योग्य असेल तर कंपनीकडून त्या पद्धतीचा निर्णय घेतला जातो.

याकरिता कंपन्यांच्या माध्यमातून वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली जाते व जे व्यक्ती पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत अशांकडून प्रस्ताव मागितले जातात. यासंबंधीची तुम्हाला अधिकची माहिती हवी असेल तर तुम्हाला ती  www.iocl.com या संकेतस्थळावर मिळू शकते. यामध्ये कंपनीच्या माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर जे काही अर्ज सादर होतात त्यातून लॉटरी पद्धतीने अर्जांची निवड केली जाते.

 पेट्रोल पंप व्यवसायासाठी किती जागेची आवश्यकता असते?

पेट्रोल पंप व्यवसाय सुरू करण्यासाठी साधारणपणे 800 ते 1200 स्क्वेअर मीटर इतकी जागा तरी लागते. राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गावर पेट्रोल पंप सुरू करायचा असेल तर  बाराशे स्क्वेअर मीटर जागेची गरज असते व शहरामध्ये पेट्रोल पंप सुरू करायचा असेल तर ८०० स्क्वेअर मीटर जागा लागते.

 पेट्रोल पंप व्यवसायात किती कमिशन मिळते?

या व्यवसायामध्ये जे काही पेट्रोल पंप मालक असतात त्यांना जे काही इंधन विक्री होते त्या माध्यमातून कमिशन देण्यात येते. साधारणपणे एक लिटर पेट्रोलच्या विक्रीमागे दोन रुपये 90 पैसे तर एक लिटर डिझेलचा विक्रीमागे एक रुपये 85  पैसे कमिशन दिले जाते. एका महिन्याला एक ते दोन लाख रुपये इतके कमिशन पेट्रोल पंप मालकाला मिळत असते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts