आर्थिक

ऑनलाइन पद्धतीने कोणी पैशांची फसवणूक केली तर कुठे कराल तक्रार? वाचा तक्रार कुठे आणि कशी करावी?

सध्याचे युग हे इंटरनेट आणि डिजिटायझेशनचे युग असल्याने तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला असून अनेक अवघड कामे आता चुटकीसरशी अगदी घरात बसून हातातील मोबाईलच्या सहाय्याने करता येतात. या तंत्रज्ञानाच्या मदतीने आता तुम्हाला पैशांच्या संदर्भात कुठलाही व्यवहार करायचा असेल तर तुम्हाला बँकेत जाण्याची गरज भासत नसून तुमच्या हातातील मोबाईलच्या सहाय्याने तुम्ही यूपीआय प्लॅटफॉर्मच्या मदतीने एखाद्याला पैसे पाठवण्यापासून तर वीज किंवा इतर बिले,

मोबाईलचे रिचार्ज व कर्जाच्या हप्ते देखील भरू शकतात. परंतु एखाद्या चांगल्या गोष्टीला वाईट बाजू देखील असते व अगदी याच प्रमाणे याच तंत्रज्ञानाच्या मदतीने काही सायबर गुन्हेगार किंवा सायबर भामटे अनेक लोकांची बँक खाते रिकामी करतात.असे सायबर फ्रॉड करणारे गुन्हेगार अनेक प्रकारचे मार्ग वापरून अशा प्रकारची फसवणूक करतात.

सायबर क्राईमची प्रकरणे दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येत असून जर असं काही घडलं तर नेमकी तक्रार कुठे आणि कशी करायची याबद्दल बऱ्याच जणांना अजून माहिती नाही. त्यामुळे जर अशा पद्धतीने ऑनलाईन पैशांची फसवणूक  झाली तर त्या संबंधीची तक्रार कुठे आणि कशी करायची? याबद्दलची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास तक्रार कुठे कराल?

1- याकरिता तुम्हाला सगळ्यात अगोदर https://cybercrime.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

2- त्यानंतर खुल्या झालेल्या मुखपृष्ठावरील तक्रार दाखल करा या पर्यायावर क्लिक करा.

3- त्यानंतर अटी व शर्ती वाचा आणि मी स्वीकारतो या पर्यायावर क्लिक करावे.

4- या ठिकाणी क्लिक केल्यानंतर रिपोर्ट सायबर क्राईम वर क्लिक करा.

5- त्यानंतर नवीन वापरकर्त्यांसाठी येथे क्लिक करा हा पर्याय निवडा आणि तुमच्या राज्य, नाव, ई-मेल, फोन नंबर आणि इतर आवश्यक माहिती नमूद करा.

6- त्यानंतर तुमच्या रजिस्टर फोन नंबरवर जो ओटीपी येईल तो टाका आणि कॅप्चा कोड भरा. हे झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.

7- त्यानंतर फॉर्ममध्ये तुम्हाला ज्या सायबर क्राईम बद्दल तक्रार करायची आहे त्याचा संपूर्ण तपशील भरा. हा फॉर्म चार भागामध्ये विभागलेला असून यामध्ये सामान्य माहिती, सायबर गुन्ह्यांची माहिती आणि पूर्वावलोकन इत्यादी भागांचा समावेश होतो.

8- त्यानंतर सर्व संबंधित तपशील आणि गुन्हा घडला आहे यासाठी पुरावे म्हणून स्क्रीनशॉट किंवा फाईल समाविष्ट केल्याचे सुनिश्चित करा.

9- तुम्ही माहितीचे पुनरावलोकन आणि पुष्टी केल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा.

10- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फसवणूक झाल्यानंतरचा एक तास महत्त्वाचा असतो व फसवणूक झाली आहे असे लक्षात आल्यास सायबर पोलिसांशी संपर्क साधा. यामुळे तुमचे पैसे ज्या खात्यामध्ये गेले असतील ते खाते गोठवणे शक्य होऊ शकते किंवा गेलेले पैसे परत मिळणे शक्य होते.

 याशिवाय तुम्ही

जवळच्या पोलीस स्टेशनला भेट देऊन तक्रार नोंदवू शकता किंवा 1930 टोल फ्री नंबर डायल करून सुद्धा तुमची तक्रार नोंदवता येणे शक्य आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts