सध्या जर आपण घर किंवा प्लॉट किंवा फ्लॅट घ्यायचा विचार केला तर सगळ्यात अगोदर म्हणजे आपल्याला आपला बजेट पाहने खूप गरजेचे असते. कारण घरांच्या किमती या गगनाला पोहोचले आहेत आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला प्लॉट घेऊन घर बांधायचे असेल तर खूप मोठी किंमत मोजावी लागू शकते. तसेच या व्यवहारांमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे कर देखील भरावे लागतात व त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो.
आपल्याकडे या प्रकारची आर्थिक तजवीज नसते. त्यामुळे आपण बऱ्याचदा गृह कर्जाचा विचार करतो किंवा इतर ठिकाणाहून पैशांची तजवीज करतो. परंतु यामध्ये एक आयडिया तुम्हाला खूप कामात येऊ शकते व ती म्हणजे जर तुम्ही पत्नीच्या नावावर घर घेतले तर याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होऊ शकतो.
कारण आपल्या देशामध्ये महिलांच्या नावावर घर खरेदी केले तर अतिरिक्त सोयी सवलती दिल्या जातात व त्यामुळे काही अनावश्यक असणाऱ्या पैशाची बचत आपल्याला करता येते. त्यामुळे या लेखात आपण पत्नीच्या नावावर घर खरेदी करून कोणते फायदे मिळतात याबद्दल माहिती घेऊ.
पत्नीच्या नावावर घर खरेदी केल्याने मिळतात हे फायदे
1- घर खरेदीवर मिळते करात सूट– तुम्ही जर तुमच्या पत्नीच्या नावावर किंवा तिच्या सोबत संयुक्तपणे घर विकत घेतले तर तुम्ही अतिरिक्त कर लाभाचा दावा करू शकता व अशा प्रकारे तुम्हाला वार्षिक दीड लाख ते दोन लाखांपर्यंत करसुट मिळू शकते. जर आपण 1961 च्या आयकर कायद्याच्या कलम 80c अंतर्गत विचार केला तर तुम्ही या माध्यमातून कर सवलतीसाठी दावा करू शकता.
यामध्ये लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे तुम्ही आणि तुमची पत्नी दोघेही त्या घरात राहत असाल तरच कर सुट मिळते. जर तुमच्या पत्नीचा उत्पन्नाचा वेगळा स्त्रोत असेल तर दावा केलेली एकूण वजावट घराच्या मालकीतील तिच्या वाट्यानुसार असते. समजा घर भाड्याने दिले असेल तरी पत्नी देय गृह कर्जाच्या मूळ रकमेवर कर कपातीचा दावा करू शकते.
2- मुद्रांक शुल्क अर्थातच स्टॅम्प ड्युटीत मिळते सुट– जर आपण आपल्या देशाचा विचार केला तर अनेक राज्यांमध्ये पत्नीच्या नावावर घर घेण्याचा एक फायदा म्हणजे तुम्हाला मुद्रांक शुल्कमध्ये अतिरिक्त सूट मिळू शकते. जर पत्नीच्या नावावर मालमत्ता असेल तर तुम्ही मुद्रांक शुल्कात एक ते दोन टक्के बचत करू शकतात.
परंतु यामध्ये लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे मुद्रांक शुल्क हे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहे. तर काही राज्यांमध्ये ते महिला व पुरुष या दोघांसाठी समान आहे. परंतु बऱ्याच राज्यांमध्ये पत्नीला मुद्रांक शुल्कात सूट देण्यात आलेली आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर दिल्लीत पुरुषांसाठी मुद्रांक शुल्क सहा टक्के आहे तर महिलांसाठी चार टक्के आहे.
3- होम लोनच्या व्याजामध्ये मिळते अतिरिक्त सूट– तुम्ही स्वतःसाठी घर घेत असाल तर तुम्हाला कर्जाची गरज असते व अशा परिस्थितीत जर पत्नीच्या नावावर घर घेणे फायदेशीर ठरू शकते. अनेक बँका पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठी गृह कर्जाच्या व्याजदरात एक टक्क्यांपर्यंत सूट देतात.
यामध्ये लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे प्रत्येक बँकेनुसार सवलत वेगवेगळे असू शकते. तसेच बँक गृह कर्ज देताना पत्नी आणि पतीचा सिबिल स्कोर देखील चेक करते. समजा जर पतीचा सिबिल स्कोर कमी असेल तर कर्ज नाकारण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या पत्नीच्या नावावर करण्याचा प्रयत्न करा.
अशाप्रकारे जर तुम्ही पत्नीच्या नावावर घर खरेदी केले तर तुम्हाला हे तीन फायद्यांच्या माध्यमातून लाखो रुपये वाचवता येऊ शकतात.