आर्थिक

पिककर्ज घ्यायचे तर आता लागेल हक्क सोडपत्र! कशाला म्हणतात हक्कसोडपत्र आणि तयार करण्यासाठी कुठली लागतात कागदपत्रे?

Crop Loan New Rule:- पिक कर्ज हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे असून पिक कर्ज शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध होणे हे शेतीच्या कामांसाठी खूप महत्त्वाचे असते. परंतु पीक कर्जाच्या बाबतीत बघितले तर बऱ्याचदा ओरड असते की बँकांच्या माध्यमातून वेळेवर शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून दिले जात नाही व याकरिता शेतकऱ्यांना बँकांच्या हेलपाट्या माराव्या लागतात.

यामुळे बऱ्याचदा शेतीच्या कामांवर विपरीत असा परिणाम होतो व शेती उत्पादनावर देखील याचा अप्रत्यक्षरीत्या परिणाम दिसून येतो. अगोदरच बराच त्रास पीक कर्जाच्या बाबतीत शेतकऱ्यांना आहे व त्यातच आता शेतीसाठी कर्ज मिळवण्यासाठी हक्क सोडपत्र द्यावे लागणार आहे.

म्हणजे शेतकऱ्यांना आता हक्क सोडपत्र तयार करण्यासाठी आठ ते दहा हजारांचा खर्च तर करावा लागेलच परंतु तलाठ्यांकडे चकरा मारण्याशिवाय पर्याय राहणार नाही. कारण नाबार्डने पीक कर्ज मिळवण्यासाठी सातबारा व आठ अ उतारा या जमिनीच्या मालकी उताऱ्यांची मागणी आता केली आहे व 8अ उताऱ्यावर जितके क्षेत्र नमूद आहे तेवढ्या क्षेत्राचा विचार करून आता शेतकऱ्याला पीक कर्ज मिळणार आहे.

हक्कसोडपत्र म्हणजे नेमके काय?

आपल्याला माहित आहे की,एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जर वडिलांचे निधन झाले तर त्यांच्या नावावर असलेल्या प्रॉपर्टीवर वारस म्हणून मुला मुली तसेच पत्नीचे नाव देखील मालमत्तेवर नोंद होते.

तसेच ज्या ठिकाणी बाकी भाऊ किंवा मुले लहान असतील तिथे एकत्र कुटुंबप्रमुख म्हणून मोठ्या भावाचे नाव लागत असते किंवा नोंद होत असते. अशा प्रसंगी आता अशा प्रकारचा जर 8अ किंवा सातबारा उतारा असेल त्या उताऱ्यावर इतर वारसांची नावे हिस्सेदार म्हणून जितकी नावे आहेत ते सर्वसाधारण जमिनीचे मालक समजले जातील व त्या सर्वांना विचारात घेऊन पीक कर्ज मंजूर केले जाईल.

या निर्णयामुळे आता शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. समजा एखाद्या व्यक्तीचे त्याच्या बहिनीशी असलेले नाते जर चांगले असेल तर ती सहजपणे हक्क सोडपत्र करून देईल. परंतु जर नात्यात कटुता आलेली असेल तर हक्क सोडपत्र तयार करणे हे खूप त्रासदायक ठरू शकते.

तसेच हक्क सोडपत्राची प्रक्रिया महसूल खात्याशी निगडित आहे व महसूल खाते म्हटले म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कुठलीही गोष्ट पूर्ण करण्यासाठी पैसा द्यावा लागतो. म्हणजे तुम्हाला हक्क सोडपत्र तयार करण्यासाठी दहा हजार रुपयांचा खर्च आणि वरून हेलपाटे मारल्याशिवाय हे हक्क सोडपत्र तयार होणार नाही.

हक्क सोडपत्र तयार करण्यासाठी कुठली कागदपत्रे लागतात?

1- जेव्हा एखाद्या जमिनीच्या उताऱ्यांवर आई किंवा बहिणींची नावे आहेत अशा सर्व क्षेत्राच्या तीन महिन्याच्या आतील सातबारा व 8अ चे उतारे आवश्यक असतात.

2- तसेच वडिलांचे निधन झाल्यानंतर तुमची नावे ज्या डायरीने नोंद झाली ती वारसाच्या डायरीची नक्कल लागते.

3- तसे जेवढे वारस आहेत तेवढे सगळ्यांचे आधारकार्डची झेरॉक्स व सर्वांचे फोटो आवश्यक असतात.

हक्कसोडपत्र तयार करण्याची प्रक्रिया कशी असते?

1- तुम्हाला जर एखादी जमीन किंवा स्थावर मालमत्ता खरेदी करायची असेल व त्याकरता जेव्हा आपण खरेदीखत बनवतो. अगदी त्या खरेदीखता इतकेच महत्त्वाचे कागदपत्र म्हणून हक्क सोडपत्र समजले जाते.

2- हक्क सोडपत्र पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर रजिस्टर करणे गरजेचे असते व आता किमान नोंदणी शुल्क दोनशे रुपये लागते.

3- तुमच्या तालुक्याच्या उपनिबंधक कार्यालयात जाऊन तुम्ही हक्क सोडपत्राचा दस्त तयार करू शकतात.

4- सगळ्या जमिनीची हक्क सोडपत्र एकाच दस्ताने करता येते व हे हक्क सोड पत्र आले की त्याच्या प्रतिसह इंडेक्स दोन जोडून गाव तलाठ्याकडे ज्यांनी हक्क सोडपत्र करून दिले आहे त्यांचे नाव जमिनीच्या मालकी हक्कातून कमी करण्यासाठी अर्ज करावा लागतो.

5- अशा प्रकारचा अर्ज तलाठ्याला प्राप्त झाल्या नंतर तो संबंधितांना नोटीस काढतो व त्यावर हरकत घ्यायला पंधरा दिवसांची मुदत देतो व त्यानंतर संबंधित वारसांची नावे तलाठी कमी करतो.

6- तसेच त्याला मंडळ अधिकारी यांनी मंजुरी देणे गरजेचे असते. मंडळ अधिकारी जेव्हा मंजुरी देतात त्यानंतरच ज्यांनी हक्क सोडपत्र करून दिले आहे त्यांची नावे सातबारा व 8अ उताऱ्यावरून कमी होतात.

 

 

 

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts