Business Success Story:- कुठलीही वेळ किंवा कुठलीही परिस्थिती बसून राहत नाही आणि कालांतराने वेळ आणि परिस्थितीमध्ये बदल होतो हे म्हटले जाते. परंतु हा बदल तेव्हाच होऊ शकतो जेव्हा आपण त्या बदलासाठी झटतो, कष्ट करण्याची तयारी ठेवतो व आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढून त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच हे शक्य होते.
नाहीतर “असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी”असे होत नसते. बदल करण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये बदल करून परिस्थितीशी दोन हात केल्यावरच परिस्थिती बदलता येत असते. हाच मुद्दा जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपण उत्तर प्रदेश राज्यातील कृष्णा यादव या महिलेच्या उदाहरणावरून समजून घेऊ शकतो.
या महिलेकडे एकेकाळी भाजीपाला विकत घ्यायला पैसे नव्हते. परंतु बिकट आर्थिक परिस्थितीशी दोन हात करत काहीही करून परिस्थिती बदलायची आणि आर्थिक समृद्धीच्या दिशेने वाटचाल करायची हे निश्चित करून त्यांनी लोणचे व मुरंबे विकायला सुरुवात केली व पाहता पाहता त्यांचा आज व्यवसाय पाच कोटी उलाढालीच्या घरात पोहोचलेला आहे. त्यांचीच प्रेरणादायी यशोगाथा आपण या लेखात पाहणार आहोत.
लोणचे आणि मुरांबा विकून केली व्यवसायाला सुरुवात
याबाबत सविस्तर वृत्त असे की,मूळच्या उत्तर प्रदेश राज्यातील कृष्णा यादव यांचे शिक्षण पाहिले तर ते जवळजवळ शून्यात जमा आहे. कारण ते कधी शाळेत गेल्याच नाहीत. परंतु त्यांचे लग्न बुलंदशहर मध्ये झाले व त्यांचे पती हे वाहतूक पोलीस होते. परंतु मध्यंतरीच्या कालावधीत काही कारणामुळे त्यांची नोकरी गेली व मात्र उदरनिर्वाहाचे संकट त्यांच्यासमोर उभे राहिले.
कृष्णा यादव यांच्या पतीने नोकरी गेल्यानंतर गाडी खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. परंतु त्यामध्ये देखील त्यांना मोठा आर्थिक फटका बसून नुकसान सहन करावे लागले व त्यानंतर मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली व माझे घर त्यांना विक्री करावे लागले.
त्यानंतर मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली की त्यांना भाजीपाला विकत घ्यायला देखील पैसे राहिले नाहीत. अक्षरशः त्यांचे पती व त्यांचे तीन मुलं हे चपाती सोबत मीठ खाऊन दिवस काढत होते व असेच दिवस ढकलत होते. त्यानंतर मात्र आता काहीतरी करावे लागेल या विचारात कृष्णा यादव असताना ते दिल्लीमध्ये त्यांच्या वडिलांकडे राहायला गेल्यावर त्या ठिकाणी नोकरी शोधायला सुरुवात केली.
परंतु नोकरी करायचे म्हटले म्हणजे शिक्षण लागते व त्यांच्याकडे शिक्षणाची कमतरता असल्यामुळे कुठेही नोकरी त्यांना मिळाली नाही. शेवटी या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी दिल्लीमध्ये त्यांनी एका शेतकऱ्याकडून जागा भाड्याने घेतली व त्या जागेमध्ये भाजीपाला पिकवायचा असे त्यांनी निश्चित केले.
नंतर त्यांनी भाजी पिकवायला सुरुवात केली व ती पिकवलेली भाजी विकल्यावर काही रक्कम ते मालकाला देत व काही पैसे ते स्वतःला ठेवत. या व्यवसायात देखील काहीही पैसा त्यांच्या हाती लागत नव्हता. परंतु कसेबसे दिवस ढकलत त्यांचे आयुष्य चालू होते.
अशा पद्धतीने केली व्यवसायाला सुरुवात
आयुष्याची ढकलगाडी सुरू असताना मध्यंतरीच्या कालावधीत त्यांनी कृषी विज्ञान केंद्रामध्ये लोणचे आणि मुरंबा बनवायचे ट्रेनिंग घेतली व तिथूनच खरं त्यांच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट मिळाला. यामध्ये लोणचे मुरंबा बनवण्यासोबतच ज्यूस आणि इतर पदार्थ बनवण्याची ट्रेनिंग देखील त्यांनी घेतले
व त्यासोबतच लहानपणी त्यांच्या आई आणि आजी जेव्हा लोणचे किंवा मुरंबा बनवायचे तेव्हा त्यामध्ये साखर किंवा तेल आवश्यक मसाले यांचे प्रमाण किती असावे हे त्यांना चांगले माहीत होते व तेच ज्ञान त्यांनी कामी आणले. मोठे कष्ट घेऊन त्यांनी मुरंबा आणि लोणचे बनवले.
परंतु त्यांची विक्री एका दिवसात होणे शक्य नव्हते व त्याकरिता रस्त्यावर टेबल टाकून त्यांनी पदार्थ विकण्याचा प्रयत्न देखील करून पाहिला परंतु ते अपयशी ठरले. परंतु हार न मानता त्यांनी एक आयडिया लढवली व रस्त्यावर एक टेबल टाकून त्यावर पाण्याचा माठ आणि स्टीलचा ग्लास ठेवला.
त्यामुळे येणारे जाणारे लोक त्या ठिकाणी पाणी प्यायचे व हीच संधी साधून कृष्णा यादव हे त्यांनी बनवलेली मुरंबा आणि लोणचे मोफत सॅम्पल म्हणून द्यायच्या. अशाप्रकारे यादव यांनी त्यांचे मुरंबा आणि लोणच्याचा श्रीकृष्ण ब्रँड लोकांपर्यंत पोहोचवला. हळूहळू लोकांना याची चव आवडली व मागणी वाढू लागली.
लावलेल्या स्टॉलवर दिवसेंदिवस गर्दी वाढायला लागली व त्यांचे उत्पादन विक्री मोठ्या प्रमाणावर व्हायला लागली. या प्रकारे त्यांच्या व्यवसायाने वेग पकडला व आज ते 200 प्रकारचे लोणचे, मुरंबा तसेच चटणी, विविध ज्यूस व सिरप विक्री करतात व त्यांचा व्यवसाय आज पाच कोटी रुपयांच्या घरामध्ये पोहोचलेला आहे.