मुंबई : महाराष्ट्राचे (Maharashatra) उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचे २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे बजेट आज (शुक्रवार ११ मार्च २०२२) विधानसभेत (Assembly) सादर केले आहे.
यावेळी महाराष्ट्र हे कृषी प्रधान राज्य असून या अर्थसंकल्पात (Budget) गावगाड्यासाठी झुकते माप असल्याचे समजत आहे. यामुळे या अर्थ संकल्पात ग्रामीण भागासाठी १० मोठ्या घोषणा झाल्या आहेत.
ग्रामीण भागासाठी १० मोठ्या घोषणा
१) देशी गायी, म्हशींची उत्पादकता वाढवण्यासाठी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी प्रत्येकी एक अशा एकूण तीन मोबाईल प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत.
२) मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा २ अंतर्गत १० हजार कि.मी. लांबीच्या रस्त्याकरिता ७५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. ६६५० कि.मी लांबीच्या पंतप्रधान ग्रामस सडक योजना टप्पा ३ चा प्रारंभ करण्यात आला आहे.
३) नियमित कर्जफेड करणाऱ्या २० लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयांचं अनुदान देण्यात येणार यासाठी १० हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. भूविकास बँकेच्या ३४ हजार ७८८ शेतकऱ्यांचे ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांची २७५ कोटी ४० लाख रुपयांची देणी देण्यात येणार आहेत.
४) १ लाख २० हजार अंगणावाडी सेविका व पर्यवेक्षिकांना ई शक्ती योजनेतून मोबाईल सेवा देण्यात येणार आहेत. बालसंगोपण अनुदानात ११२५ रुपयांवरुन २५०० पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
५) कोविडमुळे (Covid) विधवा झालेल्या महिलांना स्वंयरोजगार सुरु करण्यासाठी १०० टक्के व्याज परताव्याची पंडिता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक ही नवीन योजना सुरु करण्यात येणार आहे.
६) कौडगाव, शिंदाळा जिल्हा लातूर, साक्री जिल्हा धुळे, वाशिम, कचराळा जिल्हा चंद्रपूर आणि यवतमाळ येथे ५७७ मेगावॅट क्षमेतेचे सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. २५०० मेगावॅट क्षमतेचे नवीन सौर ऊर्जा पार्क निर्माण करण्यात येणार आहे.
७) पंतप्रधान आवास योजना अंतर्गत ग्रामीण भागातील ५ लाख घरकुल बांधणीसाठी ६ हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
८) कोयना, जायकवाडी आणि गोसीखूर्द येथे जल पर्यटन प्रकल्प सुरु करण्यात येणार आहेत.
९) जव्हार जिल्हा पालघर, फर्दापूर जिल्हा औरंगाबाद, अजिंठा, वेरुळ, महाबळेश्वर व लोणावळा येथे पर्यटन विकासाकरिता सुविधा निर्माण करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.
१०) महर्षी कर्वे, साने गुरुजी, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या गावातील शाळांची स्थिती सुधारण्यासाठी 1 कोटी निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.