Mhada Lottery:- स्वतःचे हक्काच्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये अनेक जण प्रयत्नशील असतात. परंतु प्रत्येक व्यक्तींना वाढत्या महागाईच्या कालावधीमध्ये घर खरेदी करणे शक्य होत नाही. तसेच घराचे स्वप्न पूर्ण व्हावे याकरिता होम लोनचा आधार बरेच जण घेताना आपल्याला दिसून येतात.
तसेच मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता अजून एक पर्याय म्हणजे म्हाडा व सिडको यांच्या माध्यमातून राबवली जाणारी सोडत प्रक्रिया होय. म्हाडा म्हणजेच गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणामुळे अनेकांचे स्वप्न साकार व्हायला मदत होते.
कारण म्हाडाच्या माध्यमातून बऱ्याच जणांच्या बजेटमध्ये किंवा परवडेल अशा दरात घर मिळू शकते. परंतु यामध्ये एक लॉटरी प्रक्रिया राबवली जाते व लॉटरीमध्ये नाव आले तर घराचे स्वप्न पूर्ण होते. परंतु यासाठी ची एक निश्चित प्रक्रिया असते व यासाठी तुम्हाला काय करावे लागेल किंवा किती रुपये भरावे लागतील? या व यासोबत अनेक बाबी पूर्ण करणे किंवा माहीत असणे गरजेचे आहे. त्यासंबंधीचीच माहिती आपण या लेखात घेऊ.
म्हाडा लॉटरीसाठी पात्रता काय लागते?
1- जर तुम्हाला देखील म्हाडाच्या लॉटरीमध्ये अर्ज सादर करायचा असेल तर त्याकरिता सगळ्यात अगोदर तुमचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असणे गरजेचे असते.
2- दुसरे महत्त्वाचे म्हणजे अर्ज करणाऱ्या व्यक्ती हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
3- 25 ते 50 हजार रुपये ज्यांचे मासिक उत्पन्न असते असे अर्जदार हे कमी उत्पन्न गटाच्या माध्यमातून अर्ज सादर करू शकतात.
4- समजा अर्जदाराचे मासिक उत्पन्न जर 50 हजार ते 75 हजार रुपये प्रति महिन्याच्या दरम्यान असेल तर ते मध्यम उत्पन्न गटाच्या माध्यमातून अर्ज सादर करतात.
5- 75000 पेक्षा जास्त मासिक उत्पन्न असेल तर अशा अर्जदारांना अर्ज सादर करताना तो उच्च उत्पन्न गटाच्या श्रेणीमध्ये करावा लागतो.
अनामत रक्कम भरावी लागते परंतु ती नंतर परत मिळते का?
यामध्ये जी काही सोडत निघते किंवा अर्ज केले जातात ते वेगवेगळे उत्पन्न गटांमध्ये केले जातात व त्यानुसार प्रत्येक उत्पन्न गटाप्रमाणे ठेवीची रक्कम देखील आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने भरावी लागते. समजा तुम्हाला जर अल्प उत्पन्न गटाकरिता अर्ज करायचा असेल तर ठेव म्हणून तुम्हाला अंदाजे दहा हजार रुपयाची रक्कम आवश्यक असते
व यामध्ये अधिक पाचशे रुपये प्रोसेसिंग शुल्क लागते. परंतु सोडतीमध्ये जर तुमचा नंबर आला नाही तर दहा हजार रुपयांची ठेव रक्कम तुम्हाला तुमच्या बँक खात्यात परत मिळते. फक्त लक्षात घेण्यासारखे बाब म्हणजे तुम्ही जी काही 500 रुपयाची प्रोसेसिंग फी साठी रक्कम भरलेली असते ती मात्र तुम्हाला परत होत नाही.
अर्ज सादर करताना तुम्हाला कुठली कागदपत्रे लागतात?
म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक, जन्म प्रमाणपत्र तसेच मोबाईल नंबर, डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजेच महाराष्ट्राचा रहिवासी दाखला, पासपोर्ट आकाराचे फोटो आणि ईमेल आयडी इत्यादी आवश्यक असते.
माडाचे घर मिळावे यासाठी काही ट्रिक आहे का?
म्हाडाच्या माध्यमातून जे काही घराचा लाभ मिळतो तो लॉटरीमध्ये तुमचे नाव आले तरच मिळतो. त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न येतो की म्हाडाच्या लॉटरीमध्ये घर मिळावे यासाठी काही टिप्स किंवा काही ट्रिक वापरता येते का? तर याचे उत्तर नाही असे आहे. परंतु तुम्ही काही गोष्टी करून यातील स्पर्धा कमी करू शकतात.
म्हणजेच म्हाडाच्या माध्यमातून विविध उत्पन्न गटांकरिता घरांची उपलब्धता असते व यासोबतच काही विशिष्ट घटकांसाठी घरे आरक्षित असतात. उदाहरणार्थ गिरणी कामगार तसेच पत्रकार इत्यादी करिता. त्यामुळे जर तुम्ही अशा विशिष्ट अशा गटांशी संबंधित असाल तर तुम्हाला माध्यमातून अर्ज करता येऊ शकतो व सोडतीमध्ये तुमचे नाव येण्याची शक्यता वाढते.
लॉटरीमध्ये नाव आले नंतर काय?
सुदैवाने तुम्हाला लॉटरी लागली किंवा तुमचे लॉटरीमध्ये नाव आले तर तुम्हाला आठवड्याभरातच संबंधित कार्यालयांमध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे असते. तसेच घराची जी काही किंमत असेल त्या किमतीच्या दहा टक्के रक्कम तुम्हाला भरावी लागते.
त्यानंतर त्या कार्यालयाच्या माध्यमातून तुम्हाला प्रमाणपत्र दिले जाते व हे प्रमाणपत्र व यासोबत आवश्यक कागदपत्र थेट बँकेमध्ये जमा करणे गरजेचे असते व या माध्यमातून तुम्हाला गृह कर्ज मिळते.
लॉटरी लागली परंतु घराचा ताबा केव्हा मिळेल?
यामध्ये जेव्हा तुम्ही अर्ज केला आहे तो नेमका कोणत्या योजनेसाठी केला आहे व ज्या प्रकल्पामध्ये तुम्ही अर्ज केला आहे त्या प्रकल्पाची स्थिती सध्या काय आहे?
या सर्व गोष्टींवर अवलंबून असते. कारण बऱ्याचदा अनेक प्रकल्पांची कामे सुरू असतात व ते पूर्ण तयार झालेले नसतात. त्यामुळे तुम्हाला लॉटरी लागल्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यावर घराचा ताबा लगेच मिळणार की नाही हे संपूर्णपणे तुमच्या प्रकल्पाची स्थिती काय आहे यावर अवलंबून असते.
अशा पद्धतीने म्हाडा लॉटरीच्या माध्यमातून घर मिळण्याची साधारणपणे प्रक्रिया असते.