Pm Vishwakarma Yojana:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना समाजातील कारागीर आणि कामगारांकरिता विश्वकर्मा योजनेची घोषणा केली होती. समाजातील या घटकांच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून आणि व्यवसाय वृद्धीकरिता विश्वकर्मा योजनेचे महत्त्व अनन्य साधारण असणार आहे.
पीएम नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने ही योजना लागू करण्यात येईल व त्यानुसार 17 सप्टेंबर रोजी ही योजना संपूर्ण देशात लागू झाली. त्यामुळे या लेखात आपण विश्वकर्मा योजना नेमकी काय आहे व तिचा लाभ कोणत्या व्यावसायिकांना मिळेल? इत्यादी बाबत महत्त्वाची माहिती घेणार आहोत.
कारागिरांसाठी महत्त्वाची आहे विश्वकर्मा योजना
विश्वकर्मा योजना शेवटच्या पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचावी याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून 13000 ते 15000 कोटी पर्यंत अर्थसहाय्य दिले जाणार आहे. समाजातील विशिष्ट शैलीतील कुशल कामगारांकरिता ही योजना राबवली जाणार असून या योजनेचे पूर्ण नाव पीएम कौशल सन्मान योजना किंवा पीएम विकास योजना असे आहे. विश्वकर्मा योजना ही 2023 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आली होती.
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा उद्देश हा कौशल्य प्रशिक्षण तसेच तंत्रज्ञान आणि आर्थिक सहाय्य करून संपूर्ण देशातील छोट्या व्यावसायिकांची व्यावसायिक क्षमता वाढवणे हा आहे व या अंतर्गत कुशल कारागिरांना लघु व सूक्ष्म उद्योग अर्थात एमएसएमईशी जोडणे हा देखील प्रमुख उद्देश आहे. जेणेकरून त्यांच्या उत्पादित मालाला चांगली बाजारपेठ मिळेल हा त्यामागचा उद्देश आहे.
पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
समाजातील सुतार, सोनार, शिल्पकार आणि कुंभार या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळणार असून या योजनेच्या माध्यमातून या कारागिरांच्या उत्पादनांचा आणि सेवांचा दर्जा वाढवण्यासाठी तसेच त्यांना देशामध्ये बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून मदत केली जाणार आहे तसेच जागतिक बाजारपेठेशी जोडण्याच्या कामे देखील ही योजना खूप महत्वपूर्ण ठरणार आहे.
किती कर्ज मिळू शकते?
जर एखाद्या व्यक्तीकडे पारंपारिक कौशल्य असेल तर पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याकरिता कर्जाची सुविधा मिळणार आहे. पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून तीन लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळू शकते.यामध्ये पहिल्या टप्प्यात व्यवसाय सुरू करण्याकरिता एक लाख रुपयांचे कर्ज तर व्यवसायाची वाढ करण्याकरिता दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपये पर्यंतचे कर्ज पाच टक्के व्याजदराने मिळेल.
18 पारंपारिक कामांचा या योजनेत आहे समावेश
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 18 पारंपारिक कामांचा समावेश करण्यात आला असून या 18 कामांमध्ये म्हणजेच ट्रेडमध्ये लोकांना प्रशिक्षण देण्याकरिता मास्टर ट्रेनरच्या माध्यमातून प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. या कालावधीत तुम्हाला प्रत्येक दिवसाला पाचशे रुपये स्टायपेंड देखील मिळणार आहे. याशिवाय पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र, ओळखपत्र तसेच मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षणाशी संबंधित कौशल्य अपग्रेड, पाच हजार रुपयाचे टूलकिट प्रोत्साहन आणि डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन देखील दिले जाणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक पात्रता धारण करणे गरजेचे असून जसे की..
अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेल्या 18 व्यवसायांपैकी कोणत्याही एकाशी संबंधित असणे आवश्यक. अर्जदाराचे वय हे 18 वर्षापेक्षा अधिक आणि पन्नास वर्षापेक्षा कमी असावे. तसेच संबंधिताकडे मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेड चे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. तसेच या योजनेमध्ये ज्या काही 140 जातींचा समावेश करण्यात आलेला आहे त्यापैकी कोणत्याही एका जातीचा असणे गरजेचे आहे.
लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, ओळखपत्र तसेच रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे फोटो तसेच बँकेचे पासबुक आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
अर्ज कसा करावा?
योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम या योजनेचे अधिकृत संकेतस्थळ pmvishwakarma.gov.in वर जाणे गरजेचे असून त्या ठिकाणी अप्लाय ऑनलाईन या लिंक वर क्लिक करून या योजनेत नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर तुमचा नोंदणीचा क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर संदेशाच्या म्हणजेच एसएमएसच्या द्वारे येतो. नंतर नोंदणी फॉर्म पूर्णपणे वाचून तो पूर्णपणे भरून घ्यावा. तसेच भरलेल्या फॉर्म सोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी व नंतर अर्ज सबमिट करावा.