Poultry Farming:- शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून अनेक प्रकारचे व्यवसाय पूर्वापार करत आलेले आहेत. यामध्ये पशुपालन, शेळीपालन आणि कुक्कुटपालन व्यवसाय प्राधान्याने करण्याला शेतकऱ्यांनी पहिल्यापासून पसंती दिलेली आहे. परंतु आता या तीनही व्यवसायांचा विचार केला तर हे उदरनिर्वाह पूरते न राहता ते आता व्यावसायिक दृष्टिकोनातून केले जात आहे.
पशुपालन व्यवसाय असो की शेळी पालन किंवा कुक्कुटपालन यासारखे व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणावर संशोधन झाल्यामुळे आणि तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्याने आता हे व्यवसाय भरभराटीला आले आहेत. त्यामध्ये जर आपण कुक्कुटपालनाचा विचार केला तर कुक्कुटपालनातील परसातील कुक्कुटपालन संकल्पना आता काळाच्या ओघात नाहीशी झाली असून मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दृष्टिकोनातून कुक्कुटपालन व्यवसाय आता केला जात आहे.
कारण यामध्ये अनेक प्रकारचे संशोधन करून देशी व संकरित कोंबड्यांच्या जाती विकसित करण्यात आल्या असल्यामुळे अंडी व मांस उत्पादनासाठी व्यावसायिक दृष्टिकोनातून आता पोल्ट्री फार्मिंग म्हणजेच कुक्कुटपालन व्यवसाय केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक उत्पादन वाढवायचे असेल तर संकरित जातींचे संगोपन त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
या जातींचे गुणवैशिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून जर कुक्कुटपालनासाठी या संकरित जातींची निवड केली तर शेतकऱ्यांना नक्कीच खूप मोठ्या प्रमाणावर फायदा मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या लेखात आपण काही महत्त्वाच्या कोंबड्यांच्या संकरित जातींची माहिती घेणार आहोत.
या आहेत कोंबड्यांच्या नवीन संकरित जाती
1- कॅरीब्रो विशाल– कोंबडीची ही संकरित जात इज्जत नगर( उत्तर प्रदेश ) येथील केंद्रीय पक्ष संशोधन संस्था या ठिकाणी विकसित करण्यात आलेली असून तुम्हाला जर मांस उत्पादनाकरिता कुक्कुटपालन व्यवसाय करायचा असेल तर त्या कोंबडीचे पालन तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते.
या जातीच्या कोंबडीचे वैशिष्ट्ये म्हणजे ही कोंबडी 6 आठवड्यामध्ये 1.65 ते 1.7 किलो पर्यंत वजनाची होते व सातव्या आठवड्यामध्ये दोन ते सव्वादोन किलो पर्यंत तिचे वजन येते. या कोंबडीची ती खात असलेल्या खाद्याचे मांसात रूपांतर करण्याचे क्षमता ही 1.85 आहे.
2- कॅरीब्रो मृत्युंजय– कोंबड्यांची ही नवीन संकरित जात इज्जत नगर( उत्तर प्रदेश) येथील केंद्रीय पक्ष संशोधन संस्थेने विकसित केली असून तुम्हाला जर मांस उत्पादनाकरिता कोंबडी पालन करायचे असेल तर ही जात तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते.
या जातीच्या कोंबडीचे वैशिष्ट्ये म्हणजे या कोंबडीचे वजन सात आठवड्यामध्ये 1.8 ते दोन किलो पर्यंत होते. ही कोंबडी ती खात असलेल्या खाद्याचे मांसामध्ये रूपांतर करण्याचे क्षमता ही 1.95 इतकी आहे.
3- हिटकॅरी– ही नवीन कोंबडीची संकरित जात देखील इज्जत नगर( उत्तर प्रदेश) येथील केंद्रीय पक्षी अनुसंधान संस्थेने विकसित केले असून ही जात कॅरी्रेड आणि नेकेड नेक या दोन जातींची संकर आहे.
ज्या ठिकाणी जास्त आद्रता आणि उष्ण हवामान आहे अशा ठिकाणी पालनासाठी योग्य आहे. कोंबडीची ही जात अंडी उत्पादनाकरिता महत्त्वाची असून तिची अंडी उत्पादनाचे वय 172 दिवसाच्या असून एका वर्षाला ते 174 अंडी देते.
4- कॅरी देवेंद्र– ही जात देखील इज्जत नगर येथील केंद्रीय पक्षी संशोधन संस्थेने विकसित केली आहे. तुम्हाला जर अंडी व मांस उत्पादनाकरिता कोंबडी पालन करायचे असेल तर तुमच्याकरिता कॅरी देवेंद्र ही जात फायद्याचे ठरू शकते. या जातीची कोंबडी 12 आठवड्यामध्ये 1.7 ते 1.8 किलो वजनाचे होते. साधारणपणे 155 ते 160 दिवसाची झाल्यानंतर ती अंडी द्यायला लागते व एका वर्षात 190 ते 200 अंडी देते.
5- कॅरी सोनाली– केंद्रीय पक्षी संशोधन संस्था इज्जत नगर( उत्तर प्रदेश) या संस्थेने साधारणपणे 1992 मध्ये ही जात विकसित केलेली असून हे जात व्हाईट लेगहॉर्न नर आणि रोड आयलँड रेड मादी या जातींपासून संकर केलेली आहे व हीची अंडी तपकिरी रंगाची असतात. साधारणपणे 155 दिवसांनी ती अंड्यांचे उत्पादन द्यायला लागते व 72 आठवड्यामध्ये 280 अंडी देते.
अशाप्रकारे तुम्हाला देखील पोल्ट्री फार्मिंग करायचे असेल तर या नवीन पाच संकरित कोंबड्यांच्या जाती तुम्हाला चांगला पैसा मिळवून देऊ शकतात.