Superb Business Idea:- नोकऱ्याचे प्रमाण खूप कमी असल्यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी आता व्यवसायाकडे वळणे ही काळाची गरज आहे व आता असे तरुण व्यवसायांकडे वळू लागले आहेत हे देखील सत्य परिस्थिती आहे. तसेच बरेच तरुण व्यवसायांच्या शोधात असून अशा तरुणांना मात्र व्यवसाय कोणता करावा याबाबत बराच गोंधळ होत असल्याचे सध्या दिसून येते.
कारण व्यवसाय पाहिले तर अनेक छोटे-मोठे व्यवसायांची मोठी यादी तयार होते व व्यवसायाच्या स्वरूपानुसार लागणारे भांडवल याचा देखील विचार प्रत्येक जण करत असते. त्यामुळे व्यवसायाची निवड करताना कमीत कमी भांडवलामध्ये जास्तीत जास्त नफा देऊ शकणाऱ्या व्यवसायांच्या शोधात बरेच जण असतात.
या अनुषंगाने आपण या लेखांमध्ये अशाच एका व्यवसायाची माहिती घेणार आहोत जो तुम्हाला चांगला नफा मिळवून देऊ शकतो. तो व्यवसाय म्हणजे सिक्युरिटी गार्ड अर्थात सुरक्षा एजन्सी होय. या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही सुरक्षा एजन्सी उघडू शकतात व स्वतः नियोक्ता देखील बनू शकतात. कमी खर्चामध्ये तुम्हाला हा व्यवसाय चांगला नफा मिळवून देऊ शकतो.
सिक्युरिटी गार्ड एजन्सी व्यवसाय देईल लाखोत नफा
सध्या अनेक क्षेत्रांमध्ये सुरक्षा गार्ड अर्थात सुरक्षारक्षकांची मागणी दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत या व्यवसायाची मागणी प्रचंड प्रमाणात वाढणारी आहे. व्यक्ती श्रीमंत असो किंवा मोठा व्यापारी तो नेहमी त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सजग असतो व चांगल्या विश्वसनीय अशा सुरक्षा एजन्सी शोधत असतो.
या दृष्टिकोनातून हा व्यवसाय खूप फायद्याचा ठरू शकतो. या व्यवसायामध्ये तुम्ही अगदी छोट्या प्रमाणात देखील गुंतवणूक करू शकतात.अगदी मोठ्या प्रमाणात देखील गुंतवणूक करून हा व्यवसाय सुरू करू शकतात. तुम्हाला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला एका कंपनीची स्थापना करावी लागते व त्यानंतर ईएसआयसी आणि पीएफ नोंदणी देखील करावी लागते.
जीएसटी नोंदणी करणे गरजेचे असते व कामगार न्यायालयात कंपनीची नोंदणी करणे देखील आवश्यक आहे. विशेष म्हणजे हा व्यवसाय असा आहे की तुम्ही पैसा किंवा जागेची कुठल्याही प्रकारची चिंता न करता सुरू करू शकतात किंवा तुम्ही भागीदारीत देखील या व्यवसायाची सुरुवात करू शकतात.
या व्यवसायासाठी लागणारा परवाना कुठून मिळेल?
यामध्ये खाजगी सुरक्षा एजन्सी नियमन कायदा 2005 अंतर्गत सुरक्षा एजन्सी उघडण्यासाठी परवाना जारी केला जातो याला PSARA असे म्हटले जाते. याशिवाय तुम्ही खाजगी सुरक्षा एजन्सी चालवू शकत नाहीत.
याकरिता परवाना देण्यापूर्वी अर्जदाराचे पोलीस वेरिफिकेशन केले जाते व एजन्सी उघडण्यासाठी नियुक्त केले जाणाऱ्या सुरक्षारक्षकांच्या ट्रेनिंग करिता राज्य नियंत्रण प्राधिकरणाने प्रमाणित केलेल्या संस्थेशी करार करणे गरजेचे असते.
परवाना मिळवण्यासाठी किती खर्च येतो?
या व्यवसायाचा परवाना मिळवण्यासाठी लायसन्स फी भरावी लागते. समजा तुम्हाला जर फक्त एका जिल्ह्यासाठी सुरक्षा एजन्सीचा परवाना हवा असेल तर त्याकरिता पाच हजार रुपये शुल्क आकारले जाते. एकाच जिल्ह्यांमध्ये जर तुम्हाला सुरक्षारक्षकांची सेवा द्यायची असेल तर दहा हजार रुपये शुल्क लागते
व एका राज्यात स्वतःची एजन्सी चालवायची असेल तर मात्र 25 हजार रुपयांचे शुल्क भरावे लागते. त्यानंतर तुम्हाला परवाना मिळाल्यानंतर एजन्सीला पसारा कायद्याच्या सर्व नियमांचे पालन करावे लागते. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या या व्यवसायात हळूहळू वाढ करून चांगला पैसा मिळवू शकतात.
या व्यवसायात कशी आहे संधी?
सध्या मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होत असून शहरांमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे व त्या अनुषंगाने नवनवीन उद्योग देखील शहरांमध्ये सुरू होत आहेत.
या पार्श्वभूमीवर सुरक्षारक्षकांच्या मागणीत देखील वाढ होताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे तुम्ही ही मागणी लक्षात घेऊन जर स्वतःची सुरक्षा एजन्सी उघडली तर तुम्ही ही सुरक्षारक्षकांची वाढती मागणी पूर्ण करू शकतात व या माध्यमातून चांगला पैसा मिळवू शकतात.