Insurance Cover:- विमा ही एक महत्त्वाची आर्थिक संकल्पना असून यामध्ये आरोग्य विमा हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. कारण आरोग्य विषयक कोणती समस्या कोणाला कोणत्या वेळी उद्भवेल हे कुणाला सांगता येत नाही. त्यामुळे अचानकपणे पैशांसाठी धावपळ होऊ नये म्हणून आरोग्य विमा खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतो.
साधारणपणे कोरोना कालावधीनंतर आरोग्य विमा काढून ठेवणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येते. तसेच अनेक विमा कंपन्यांच्या माध्यमातून आकर्षक अशा आरोग्य विमा राबवण्यात येत असल्याने असा विमा घेणे देखील आता फायदेशीर ठरत आहे.
आरोग्य विमा देणाऱ्या एकूण 57 कंपन्या आहेत व या माध्यमातून अनेक प्रकारचे आरोग्य विमा दिला जातो. यामध्ये मॅटरनिटी इन्शुरन्स या प्रकारचा विमा किंवा संकल्पना खूप महत्त्वाची असून महिला वर्गाला या विम्याचा खूप मोठा फायदा होतो.
मॅटर्नीटी इन्शुरन्स म्हणजे नेमके काय असते?
त्यालाच आपण मातृत्व विमा असे देखील म्हणतो. हा एक आरोग्य विम्याचा प्रकार असून या अंतर्गत अनेक आरोग्य विमा देणाऱ्या विमा कंपन्या महिलांच्या प्रसुतीच्या अगोदरचा आणि प्रसूतीनंतरचा खर्च यामध्ये देत असतात.
अनेक कार्पोरेट कंपन्या देखील आरोग्य विमा योजनांच्या माध्यमातून महिला कर्मचाऱ्यांच्या प्रसूती काळातील जो काही खर्च येतो तो करतात. मातृत्व विमा हा एक ॲड ऑन इन्शुरन्स असून याला तुम्ही सामान्य आरोग्य विम्यासोबत घेऊ शकतात व या ऍड ऑन इन्शुरन्स अंतर्गत प्रसूतीचा सर्व खर्च यामध्ये समाविष्ट असतो.
मातृत्व विम्याचे फायदे काय?
महिलांच्या प्रसूतीच्या कालावधीतील जो काही खर्च येतो तो खर्च वाचावा म्हणून ऍड ऑन इन्शुरन्स घेतला जातो व या अंतर्गत विमा कंपनी हॉस्पिटलची फी तसेच वंध्यत्व उपचार,लसीकरण व काही प्रसंगी मूल दत्तक घेण्यासाठीचा खर्च देखील उचलते. एवढेच नाही तर काही मातृत्व विम्यामध्ये सरोगसीचा खर्च देखील दिला जातो.
अगोदर तुम्ही जर कुठल्याही प्रकारचा आरोग्य विमा घेतला तर त्यामध्ये मातृत्व विम्याच्या कव्हरेज करिता दोन ते चार वर्षाचा वेटिंग पिरियड होता. परंतु आता हा कालावधी नऊ महिन्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. या विम्याअंतर्गत महिलेला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर कॅशलेस उपचार मिळतात.
तुम्हाला हॉस्पिटलमध्ये प्रसूती करिता कोणत्याही प्रकारे रोकड देण्याची गरज भासत नाही. याकरिता तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये जाल तेव्हा फक्त विमा कंपनीला याबाबत माहिती द्यायची असते व त्यानंतर आवश्यक असलेली कागदपत्रे जमा करून प्रसूतीसाठीचा सर्व उपचार हा कॅशलेस पद्धतीने करता येतो. या फायद्यांशिवाय मातृत्व विम्याच्या माध्यमातून नवजात बाळाचा एक ते नव्वद दिवसापर्यंतचा खर्च देखील केला जाऊ शकतो.