Sahyadri Farms Story:- एक सुविचार आहे की ‘इच्छा असेल तर मार्ग दिसेल’ माणसाच्या मनामध्ये काही करण्याची इच्छा असली तर मार्ग आपल्याला सापडत असतात. परंतु मार्ग सापडल्यानंतर त्या मार्गावर परिस्थितीशी झगडत वाटचाल करत राहणे व यशापर्यंत पोहोचणे खूप महत्त्वाचे असते.
या टप्प्यावर जो टिकतो तोच यशस्वी होतो. कारण कुठलेही ध्येय किंवा कुठलेही यश अगदी सहजासहजी आपल्याला मिळत नसते. यशाच्या मार्गावर चालताना असंख्य अडचणींचा डोंगर पार करून आपल्याला जावे लागते व यामध्ये जे टिकतात तेच यशस्वी होतात.
अगदी याच मुद्द्याला धरून जर पाहिले तर विलास शिंदे यांचे उदाहरण घेता येईल. विलास शिंदे यांनी मोठ्या कष्टाने आणि परिस्थितीशी झगडत आज सह्याद्री फार्म उभे केले व त्यांच्यासोबत इतर शेतकऱ्यांचे हित जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यांची यशोगाथा आपण या लेखात बघू.
विलास शिंदे यांची यशोगाथा
कृषी क्षेत्रातील सुवर्णपदक विजेते आणि पदव्युत्तर पर्यंत शिक्षण असलेले विलास शिंदे हे नाव आता अनेकांना परिचित असून त्यांनी अपयश आणि निराशेमुळे थोडीशी हार न मानता आज उत्तुंग असे यश मिळवलेले आहे. शेतकऱ्यांचे हित जपता यावे व त्यांच्या हिताकरिता काम करता यावे असे स्वप्न शिंदे यांचे होते व त्या प्रयत्नात असताना त्यांनी 2010 मध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक करून आणि सोबत शंभर शेतकऱ्यांना घेऊन शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून सह्याद्री फार्म सुरू केले.
सह्याद्री फार्म्स हे सहकारी संस्था आणि खाजगी मर्यादित कंपनीचे एकत्रितपणे स्वरूप असून ही कंपनी शेतकऱ्यांच्या मालकीची आहे. आज जर आपण सह्याद्री फार्मचे स्वरूप पाहिले तर नाशिक शहराजवळ मोहाडी येथे हा फार्म असून 100 शेतकऱ्यांचा सुमारे 25000 एकर जमीन कंपनीच्या मालकीची असून या फार्मच्या माध्यमातून दररोज एक हजार टन फळे आणि भाज्यांचे उत्पादन होते.
एवढेच नाही तर सह्याद्री फार्म हा भारतातील द्राक्षांचा सर्वात मोठा निर्यातदार आहे.आज जर एका आकडेवारीवरून सह्याद्री फार्मसचे काम बघायचे असेल तर 2018-19 मध्ये या सह्याद्री फार्मने 23 हजार मॅट्रिक टन द्राक्षे तसेच 17000 मॅट्रिक टन केळी आणि सातशे मॅट्रिक टन डाळींबाची निर्यात केली.
याबाबत माहिती देताना विलास शिंदे म्हणतात की त्यांच्या या सह्याद्री फार्मने गेल्या आर्थिक वर्षामध्ये 525 कोटी रुपयांची उलाढाल केली. एवढेच नाही तर हा फार्म देशातील टोमॅटोच्या सर्वात मोठ्या व्यापाऱ्यांपैकी एक आहे.
सह्याद्रीतील शेतकरी करतात वेगवेगळ्या द्राक्ष वाणाची लागवड
सह्याद्री फार्म्समधील शेतकरी क्रिमसन, सोनाका, शरद सिडलेस, थॉमसन, फ्लेम आणि एआरआरए इत्यादी अनेक द्राक्षांच्या वानांची लागवड करतात. हा फार्म 60% फळे व भाजीपाला निर्यात करतो आणि 40% भारतात विकतो. तसेच या फार्मच्या माध्यमातून रशिया,
अमेरिका आणि विविध युरोपे देशांसह 42 देशांमध्ये उत्पादने निर्यात करतो. एवढेच नाही तर सह्याद्री फार्मच्या माध्यमातून पांढऱ्या, लाल आणि काळा द्राक्षांच्या विविध 40 हेक्टर पेक्षा जास्त शेत जमिनीमध्ये लागवड करण्यात आलेले आहे
मोहाडी येथे शंभर एकर परिसरात आहे फळ प्रक्रिया प्रोजेक्ट
सह्याद्री फार्म बद्दल माहिती देताना विलास शिंदे म्हणतात की, त्यांची ही कंपनी प्रत्येक महिन्याला 38 हजार होम डिलिव्हरी करते. या फार्मचे ग्राहक मुंबई, पुणे आणि नाशिक येथे मोठ्या प्रमाणावर असून 2018 मध्ये कंपनीने 250 कोटी रुपयांची गुंतवणूक करून मोहाडी या ठिकाणी 100 एकर परिसरामध्ये फळ प्रक्रिया प्रोजेक्ट उभा केलेला आहे
व या कॅम्पसमध्ये एक फार्मर हब देखील आहे. या हबच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी कार्यामध्ये मदत करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या इनपुट सह पाठिंबा दिला जातो. आज त्यांच्या या सह्याद्री फार्ममध्ये बाराशे लोकांना रोजगार मिळालेला आहे.
एवढेच नाहीतर या फार्मच्या सभासद शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये 25 टक्के वाढ करण्यास देखील मदत झालेली आहे. विलास शिंदे म्हणतात की आज त्यांचे शेतकरी घाऊक बाजारात 35 रुपयांच्या तुलनेत त्यांच्या द्राक्षासाठी प्रति किलो सरासरी 67 रुपये कमावत आहेत.
विलास शिंदे यांनी कशी केली सुरुवात?
साधारणपणे 1998 मध्ये त्यांनी राहुरी कृषी विद्यापीठातून कृषी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले व 1998 मध्ये सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर शेती व्यवसाय करावा म्हणून ते गावी परतले व घरच्या शेतीमध्ये त्यांनी द्राक्ष, टरबूज आणि मका अशी पिके घ्यायला सुरुवात केली. या पिकांची विक्री ते स्थानिक जिल्ह्याच्या बाजारपेठेत करत असत.
परंतु त्यांना एकदा एका एकर शेतीतून महिन्यामध्ये दहा हजार रुपयांचा नफा मिळू शकला नाही. त्यानंतर त्यांनी दूध व्यवसाय करायचे ठरवले व खाजगी सावकार आणि बँकांकडून कर्ज घेऊन 200 गायी खरेदी केल्या. त्यानंतर त्यांनी त्यांच्या शेतामध्ये एक लहानसे पाश्चरायझेशन युनिट उभे केले व नाशिक शहरामध्ये दूध विकले.
न थांबता त्यांनी गांडूळ खत देखील बनवायला सुरुवात केली व गांडूळ खताची विक्रीला देखील सुरुवात केली. परंतु या सगळ्या व्यवसायातून त्यांना हवा तेवढा फायदा दिसून आला नाही. या सगळ्या प्रकारामध्ये त्यांच्यावर 75 लाख रुपये कर्ज झालेले होते. परंतु तरीदेखील न डगमगता 2004 मध्ये त्यांनी एक स्वमालकीची कंपनीची स्थापना केली व 12 शेतकऱ्यांना सोबत घेतले.
या माध्यमातून त्यांनी द्राक्ष पिकवायला सुरुवात केली व 2004 मध्ये त्यांनी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून युरोपियन बाजारपेठेत 72 मॅट्रिक टन द्राक्ष निर्यात केली. असे करत करत अनेक अपयश पचवत शेती उत्पादन विक्रीमध्ये मध्यस्थवरचे अवलंबित्व थांबवून त्यांनी थेट ग्राहकांपर्यंत उत्पादने पोहोचवण्यावर भर दिला व त्यासंबंधीचा निर्णय घेतला.
याच निर्णयाचा भाग म्हणून 2010 मध्ये त्यांनी 100 शेतकऱ्यांचा सह्याद्री फार्म सुरू केले. अशाप्रकारे अनेक नुकसान पचवत आणि हार न म्हणता परिस्थितीशी झगडात विलास शिंदे यांचा सह्याद्री फार्मची वार्षिक उलाढाल 525 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे